कित्येक नैराश्य भावना सांजवेळ झाली की मनाची जागा व्यापतात, असं का होत असेल…?
हर्षदा नंदकुमार पिंपळे
संध्याकाळची वेळ होती.साधारणपणे घड्याळात साडेसहा वगैरे वाजले असतील.सावी नुकतीच ऑफिस मधून घरी जायला निघाली होती.नेहमीप्रमाणे तिने पार्किंगमधून स्कूटी बाहेर काढली आणि ती घरच्या दिशेने निघाली. वसंत ऋतू चालू होता.तसा नाही म्हंटल तरी कित्येकांना वसंत ऋतू हा फार सुखावणारा ऋतू वाटतो.आणि हल्ली तर पावसाच काहीच सांगता येत नाही. तो अगदी केव्हाही कुठेही सहज येतो.
अगदी पावसाला साजेसं असच त्या दिवशीचं वातावरण होतं.सोसाट्याचा वारा सुटला होता. आकाशात मळभ दाटलं होतं.ढग काळेकुट्ट दिसत होते.सूर्यही दिसेनासा झाला होता. कदाचित त्या ढगांच्या पल्याड तो लपला असावा.सगळीकडे अंधार अंधार झाला होता. काही कळ्यांची फुलं झाली होती तर काही कळ्या गळून पडल्या होत्या. काही पावसाचे टपोरे थेंबही खाली पडत होते.खरं तर असं पावसाळी वातावरण म्हणजे सावीसाठी निव्वळ सुख असतं.पण त्या दिवशी सावी मात्र काही चांगल्या मूडमध्ये दिसत नव्हती.एरवी अशा वातावरणात सावी एकेक क्षण वेचून मनपटलावर कोरून ठेवायची. पण त्या दिवशी मात्र स्कूटी चालवतानाही सावीच लक्ष भलतीकडेच होतं.तिच्या मनात कसली चलबिचल चालू होती तेच कळत नव्हतं.
तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलाय असं वाटतं होतं. तिचा तो मलूल झालेला चेहरा मला अजिबात बघवत नव्हता.म्हणून आम्ही घरी पोहोचल्यानंतर लगेचच मी तिला प्रश्नांनी घेरायला सुरुवात केली. तिला विचारलं की… काय गं सावी, दिवसभर तर तू एकदम ठणठणीत होतीस.मग आत्ता अशी अचानक एकदम मलूल का दिसतेस…? आणि तुझा लाडका पाऊसही आज अधूनमधून बरसतोय तरीही तू अशी हिरमुसलेली का दिसतेस…? बाहेरचं वातावरण नाही म्हंटल तरी थोडं फार सुखावणारं आहे.पण तुझं काय….??? इतकी निराश का झाली आहेस…?रोजची सांजवेळ तर तुझ्या आवडीची असते.एखाद्या सांजवेळेच कौतुक ऐकावं तर ते तुझ्याकडूनच गं….!
मी इतकी बोलत होते पण सावी मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हती.क्षणभर वाटलं की माझच चुकलं.तिला अशा वेळी मी उगाचच प्रश्नांनी हैराण केलं जे की मी करायला नको होतं.
मला राहवलं नाही आणि मी तिथून निघणार तितक्यात सावीने मला मधुराssssss………अशी हाक मारली.एरवी मधु मधु म्हणून माझ्या मागे फिरणारी आज थेट मधुरा बोलली याचच मला विशेष आश्चर्य वाटलं.आम्ही बोलत होतो आणि ती बोलता बोलता सहज बोलून गेली.
ती म्हणाली की… “प्रत्येक संध्याकाळ ही सारखी नसते गं…रोज हवीहवीशी वाटणारी संध्याकाळ कधीतरी नकोशी वाटतेच.नको वाटते तीच सांजवेळ…. तीच कातरवेळ !
दिवसभर मन कामात मग्न असतं त्यामुळे निराशा सहसा आजुबाजूलाही फिरकत नाही. पण ही सांजवेळ……….बिलकूल स्वस्थ बसू देत नाही. सतत कोणत्या ना कोणत्या नकारात्मक विचारांचा वावर मनात प्रकर्षाने जाणवतो.यावेळी नैराश्याच्या भावना मनाची संपूर्ण जागा व्यापून टाकतात.
मागचं सगळं काही आठवत राहतं.मनाची हुरहूर अचानकपणे वाढायला लागते.
आकाशातील ढग पाहिले की वाटतं मनावरही असच नैराश्याच मळभ दाटलय.तो सूर्य जेव्हा क्षितीजापल्याड जातो तेव्हा वाटतं आपल्याही हातातून काहीतरी सुखद-सुंदर निसटून जातय.सूर्य पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो पण हातातून निसटून जाणाऱ्या त्या सुखद सौंदर्याच काय…?
न जाणे मनात शंका-कुशंका घर करू लागतात.अगं पण इतकच कळत नाही की या अशा निराशाजनक भावना नेमक्या या सांजवेळीच का मनाला घेरतात.मधुरा…,Do you have any idea..? तुला काही माहीती आहे का…? ………
पहा…..सावीसारखच असच काहीसं तुमच्याही बाबतीत होत असेल. तर असं का होत असेल ते आपण जाणून घेऊयात.
*संध्याकाळची चाहूल लागताच सूर्यही निरोपाची तयारी करतो.पक्षी-पाखरे आपल्या घरट्याकडे परत फिरतात.अगदी गाय- शेळी यांसारखे प्राणीदेखील गोठ्याच्या दिशेने मार्गस्थ होतात.कित्येकांची घरी जायची तर हीच वेळ असते.इतकच नाही तर झाडे-वेलीही अगदी शांत शांत वाटतात.आकाश अगदी मोकळं असतं.खरं सांगायच तर सगळच रितं-रितं,सुनं-सुनं भासायला लागतं.आणि अशा या सुन्न वातारणामुळे आपण कुठेतरी यात एकटे पडलोय अशी जाणीव आपल्याला होत असते. अशा भावना आपल्या मनात घर करू पाहत असतात. याचवेळी आपल्याला आपल्या जुन्या आठवणी आठवत राहतात.
आकाशात मळभ दाटतात तेव्हा नकोनकोसं होतं.या मळभाचा थेट मनावर परिणाम होतो. मन क्षणात निरस होतं.सकाळचा तरतरीत असणारा उत्साह यामुळे क्षणात मावळतो.नैराश्याच मळभ अशावेळी सहज मनाभोवती घिरट्या घालून जातं.
हिरव्यागार झाडांकडे पाहून ताजतवानं होणारं मन मळभाकडे पाहून नैराश्याच्या खाईत सहज शिरकाव करतं.
दिवसभर काम करून मेंदू-शरीर आणि मन संध्याकाळी मरगळलेल्या अवस्थेत जातात. त्यांच्यावर कामाचा सगळा ताण आलेला असतो.त्यामुळे अशा थकलेल्या अवस्थेत, अशांत अशा मेंदूमुळे/शरिरामुळे मनात एक प्रकारे औदासिन्य निर्माण होत जातं.
निसर्गाचा आणि आपल्या मनाचा संबंध आहे. निसर्गातील बदलांचा आपल्या मनावर थेट परिणाम होत असतो.त्यामुळे संध्याकाळी निसर्गात होणाऱ्या विविध बदलांमुळे आपलं मन चलबिचल होत राहतं.मन हतबल होऊन जातं.हळुहळू होत जाणारा अंधार, रिता होणारा आसमंत, बुडणारा सूर्य सगळं काही थेट आपल्या मनावर परिणाम करतं.प्रकाशामध्ये जितकं आपल्याला प्रसन्न उत्साही वाटत असतं तितकं आपल्याला अंधारात, मळभ आलेल्या वातावरणात अजिबात प्रसन्न वाटत नाही. निराशा आणि निरुत्साहीपणा अशावेळी वाढतच राहतो.
दिवसभर कामामुळे आजुबाजूला घडणाऱ्या घटनांच काहीच वाटत नाही. मन अशावेळी कामात गर्क असतं.त्यामुळे आपण सहसा त्या गोष्टींकडे नकळतपणे दुर्लक्ष करतो.पण संध्याकाळी पुन्हा त्याच गोष्टी आवर्जून आठवतात.आणि त्याच गोष्टींमुळे नैराश्याची चाहूल लागायला सुरुवात होते. कारण अनेकदा आपण घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या भूतकाळाशी किंवा आपल्या आयुष्यातील गोष्टींशी संबंध जोडत असतो.काही गोष्टींमध्ये तर आपण इतके अडकतो की मन हळवं झाल्याशिवाय राहत नाही. मनात निराशेची पाखरं भिरभिरल्याशिवाय राहत नाही.
थोडक्यात काय तर….मन मेंदू-शरीर थकून जातं.दिवसभराचा सगळा शीण नकोसा होतो.दिवसभरात साचलेल, दुर्लक्ष केलेलं सगळं बाहेर येऊ पाहतं.सुन्न वातावरण, दाटलेलं मळभ,आणि पसरलेला अंधार नकोसा वाटतो.म्हणूनच कित्येकदा नैराश्याच्या भावना सांजवेळ झाल्यावर मनाची जागा व्यापून टाकतात. कारण नकारात्मक वातावरणातच नैराश्याच्या भावना जास्त आकर्षित होतात.
मित्रांनो एक तरी संध्याकाळ अशी असतेच.पण म्हणून प्रत्येक संध्याकाळ अशीच असेल असं मुळीच नाही. एक संध्याकाळ नैराश्याची तर एक संध्याकाळ आशेचीही असूच शकते.
so…अशी नैराश्याची संध्याकाळ आली तर हसत हसत झेलायला शिका.पुढची एक संध्याकाळ नक्कीच सुखावणारी असेल या आशेवर, या विश्वासावर जगायला शिका….
कारण…,आयुष्य खूप सुंदर आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
