Skip to content

कित्येक दिवस मनात दाबलेल्या गोष्टी मानसिक संतुलन बिघडवतात.

कित्येक दिवस मनात दाबलेल्या गोष्टी मानसिक संतुलन बिघडवतात.


गीतांजली जगदाळे


आपल्या जीवनात बऱ्याच वेळा अशा काही घटना, प्रसंग येतात जे आपण दर वेळी कोणाशी share करतोच असे होत नाही. काही गोष्टी आपण आपल्यापर्यंत, आपल्याच मनात साठवून ठेवत असतो. आणि मनात दाबून ठेवलेल्या गोष्टी नक्कीच सकारात्मक असण्यापेक्षा नकारात्मक असण्याची शक्यता जास्त असते.

शक्यतो सकारात्मक गोष्टी कोणी दाबून ठेवत नाही, आणि ठेवल्या तरी त्याचा त्रास होत नसतो.पण त्या उलट त्रासदायक घटनांचा आपल्याला मनात साठवून ठेवल्याने भरपूर त्रास होत राहतो. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला कोणाकडे व्यक्त कशा कराव्यात हेच कळत नाही किंवा कधी-कधी काही लोकांच्या स्वभावानुसार ते स्वतः पर्यंत ठेवणं पसंत करतात.

कारणं काही का असेनात, पण आपल्या भावना विशेषतः टेन्शन किंवा दुःख/ त्रास देणारे प्रसंग, विचार,किंवा घटना आपण मनात दाबून असतो तेव्हा त्याचा खूप गंभीर परिणाम आपल्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर होत असतो.आपल्या शरीराचं आपल्या मानसिक आरोग्याशी खूप जवळच नातं असत. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्याला घाम येतो, खूप टेन्शन मध्ये असल्यास डोकेदुखीचा त्रास जाणवतो इत्यादी.

आपले tensions , आपले problems किंवा अशा कोणत्याही गोष्टी ज्या आपल्या मनाला त्रासदायक असतात त्या आपण फार काळ मनात दाबून ठेवत असू तर त्याने उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी सारखे शारीरिक आजार आणि Anxiety , Depression इत्यादी सारखे मानसिक आजार होण्याची शक्यता असते.

मनात दाबलेल्या घटना, विचार या ओल्या जखमेप्रमाणे असतात. कितीही दिवस किंवा काळ लोटला तरी त्या जखमा मनात दाबून ठेवल्यामुळे अगदी ताज्या आणि ओल्याच राहतात. आणि त्यामुळे ती व्यक्ती सतत एकप्रकारचं ओझं मनात घेऊन वावरत असते. अशा गोष्टी मनात दाबून धरण्याच्या सवयीमुळे त्यांना कधी मोकळं वाटत नाही. आणि जीवनात येणाऱ्या सुखद क्षणांचा देखील मोकळ्या मनाने १००% आनंद लुटता येत नाही.

अशी कल्पना करा की, एखादा बॉक्स आहे, ज्यात तुम्ही अधून-मधून काही ना काही सामान भरत असता, कधी ना कधी तो बॉक्स भरतो आणि जड होतो, त्याच प्रमाणे आपण जेव्हा गोष्टी मनात साठवत जातो तेव्हा मन ही अशाच प्रकारे जड होत जातं आणि आपल्याला कोणत्याही गोष्टींमध्ये पूर्ण मनाने सहभागी होता येत नाही. त्यामुळे व्यक्त होणं खूप गरजेचं असत. आणि आपण बऱ्याचदा त्रासात असणाऱ्या व्यक्तीला मन मोकळं करण्याचा सल्ला देत असतो.

व्यक्त न झाल्याने गोष्टी मनात साठून जो त्रास होतो, त्याने माणूस बऱ्याच वेळा दुखी-कष्टी असतो आणि मानसिक रित्या असं जास्त दिवस राहिल्यास आपण शारीरिक आणि मानसिक आजारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळे ज्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या जातात त्या कुठेतरी व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.

जिथे आपल्याला एखादी जवळची व्यक्ती अशी वाटते की हिच्याकडे आपण व्यक्त होऊ शकतो तर तिथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. जर कोणाला नसेलच कोणाकडे व्यक्त व्हायचं, तर तुम्ही एखाद्या डायरी/ वही ची मदत घेऊन तिथे व्यक्त होऊ शकता. जेव्हा आपण व्यक्त होतो, आपले विचार, आपल्या भावना सांगतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या गोष्टीशी सामना करत असतो.

आणि सामना केल्याशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही. त्यामुळे अशा गोष्टी व्यक्त कराव्यात आणि त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न करावा. आता प्रत्येकाला लगेच सोडता येईलच असं नाही, पण प्रयत्न केल्यास आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

जेव्हा असे विचार, घटना/ प्रसंग घडतात, जे तुम्हाला त्रासदायक असतात आणि ते तुम्ही कोणाशी share करत नाही, तेव्हा त्याने तुमचा फायदा तर काहीच होत नसतो पण नुकसान मात्र खूप होत असत. म्हणजेच काय तर एकदा घडलेली घटना फक्त घडली त्याच वेळेला तुम्हाला त्रास देत नाही तर, आयुष्यभर त्रास देण्यात यशस्वी होत असते.

आणि तिला एवढी पॉवर द्यायची की नाही हे आपल्याच हातात असत. आपण जर ती गोष्ट व्यक्त करून, त्याबद्दलचे आपले विचार स्वीकारून, व्यक्त केले तर नक्कीच या गोष्टींवर मात करायला आणि त्यांनी होणारा त्रास कमी करायला आपण यशस्वी होऊ.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “कित्येक दिवस मनात दाबलेल्या गोष्टी मानसिक संतुलन बिघडवतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!