का अचानक मरण्यालायक विचार येतात, आणि मग काही अवधीनंतर स्वतःचीच चीड येते?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आयुष्य जगायला, त्याच्यावर प्रेम करायला कुणाला आवडत नाही. इवलीशी मुंगी असू दे किंवा एखादे नाजूक झाड, स्वतःच्या प्राणाची शिकस्त लावते उभारी घ्यायला, अजून जगायला. मग आपण तर माणसे आहोत. कितीही हाल-अपेष्टा कष्ट सोसावे लागले तरी माणूस जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
रस्त्यावर राहणारी ज्यांना राहायला जागा नसते, घालायला नीट कपडे नसतात, कित्येकदा पुरेसे जेवण मिळत नाही अशा अवस्थेत राहतात. कुठेतरी फिरून का होईना स्वतःची गुजराण करतात. अट्टल गुन्हेगार देखील शेवटपर्यंत स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी विनवण्या करत असतो. हे सर्व कशामुळे होते? याचं कारण आहे आयुष्य जगण्याबद्दल असलेल्या प्रेम, तशी इच्छा.
पण म्हणतात ना काळ बदलत चाललाय. जे खरच आहे. मरण हल्ली स्वस्त होत चाललंय. रोजच्या जीवनात जरा काही उलथापालथ झाली, घडी विस्कटली, तरी लगेच माणसाच्या मनात मरण्याचे विचार येऊ लागले आहेत.
त्याला कारणेही तशीच आहेत. लहानपणी अतिसुरक्षित वातावरणातील वाढणं, कधीही नाही न ऐकण्याची सवय, एकंदरीत आयुष्यात कोणतेही अडथळ्यांचा त्रासाचा सामना करण्याची कमी सहनशीलता या सर्व गोष्टी माणसाचं मन कमकुवत बनवत आहेत. यातूनच परीक्षेत मार्क कमी पडले, ब्रेकअप झालं, संसारातील वाद-विवाद यासारख्या अनेक गोष्टींमुळे मनात मरणाचे विचार येतात काही जण स्वतःचे जीवन यातून संपवतातदेखील.
पण यालाही काही अपवाद असतात. असं होतं की बऱ्याचदा आयुष्यात होणार्या त्रासदायक घटनांतून मरणाचे विचार येतात. जीवन संपवावं असं वाटतं. पण काही वेळ गेला की स्वतःला स्वतःची चीड येऊ लागते.
आपण अस कसं जीवन संपवायला निघालो असं वाटून स्वतःला आपण बडबडतो. हे असं का होतं? याच कारण आपला त्यावेळचा भावनावेग ओसरलेला असतो. जेव्हा आपण एखाद्या त्रासातून जातो तेव्हा आपण त्रास झाला त्या गोष्टीला मनातल्या मनात इतकं मोठं करतो की आपण हे सर्व सहन करू शकत नाही असं वाटतं आणि त्यातून मरणाचे विचार येतात. पण जसजशी वेळ जाते आपण हळू स्थिरावतो भावना वेग बराच ओसरतो. तेव्हा आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. या दरम्यान आपल्याला दिसून येते की अशाही काही गोष्टी आहेत ज्यासाठी आपण जगले पाहिजे. त्यामध्ये आपली मुलं असतील, आपली स्वतःची माणसं, आपली स्वप्नं असतील अशा असंख्य गोष्टी.
म्हणूनच रागात पहा रागवल्यानंतर त्यादरम्यान केलेला भांडाभांडी नंतर आपल्या लक्षात येते की आपण असं वागायला नको होतं, इतकं काही झालं नव्हत. कारण ही वेळच तशी असते ज्यात आपण गोष्टी नको तितक्या मोठ्या करतो म्हणून कितीही त्रास झाला तरी अगदी टोकाचा विचार न करता स्वतःला जरा वेळ दिला पाहिजे.
हा त्रास हे दुःख, आपल्या मनाची तगमग वेळेनुसार कमी होऊ शकते. त्याला नाकारायचं पण नाही आणि कवटाळायचं पण नाही. लक्षात घ्या समुद्राची लाट कितीही मोठी असली तरी सरतेशेवटी ओसरते. तसेच भावनावेग जर आपल्याला आवरता आला तर आपण यातून सुखरूप बाहेर पडू.
असं वाटतं की बरेच गोष्टीसहन शक्ती पलीकडे जातात. पण सहनशीलता ही मनाची नसून शरीराची आहे. म्हणूनच शरीरावर असंख्य वार झाले तरी व्यक्ती जगण्यासाठी धडपडते. पण मग सर्व सहन कराव का? नाही. जे वाईट आहे, उदा. डोमेस्टिक व्हायोलेन्स, शारीरिक हिंसा.
अश्या गोष्टी आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या आहेत. त्यावर आपण आवाज उठवला पाहिजे. इथे बरेच जण आवाज उठवला तर मानहानी होईल, समाजात बेअब्रू होईल आणि ते सहन करण्यासारखं नसेल असं वाटून गप्प राहतात. यातून स्वतःला त्रास होतो आणि तो त्रास पराकोटीला गेला की मग मरणाचे विचार येतात.
त्यामुळे काय सहन करायचं आणि काय करू नये हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. परीक्षेत मार्क कमी पडणं, एखादी व्यक्ती आपल्याला सोडून निघुन जाणं या गोष्टी त्रासदायक आहेत. नक्कीच आहेत. पण सहन करू शकत नाही अश्या आहेत का? आपण सहन करू शकतो कारण त्यातच आपला फायदा आहे. तरच आपण पुढचं आयुष्य जगू शकतो.
म्हणून आपल्या भावानांवर नियंत्रण ठेवणं, स्वतःला परिस्थितीला वेळ देणं गरजेचं आहे. असं केलं तरच लक्षात येईल की आयुष्य आपल्याला दुसरी संधी देत आहे. हे जगण्यासाठी नक्कीच आपण लढलं पाहिजे. वेळप्रसंगी मदत घेतली पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. या सर्व गोष्टी आपल आपल्या आयुष्यावरच प्रेम अधिक वाढवतील. आपली सहनशीलता वाढवतील आणि त्याचा अर्थ समजावून देतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Nice