Skip to content

“काही व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की ते किती जवळ आहेत!!”

“काही व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की ते किती जवळ आहेत!!”


मधुश्री देशपांडे गानू


“जिंदगी के सफर में गुजर जातें हैं जो मकाम…

वो फिर नही आते….वो फिर नही आते कुछ लोग एक रोज जो बिछड जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं.. उम्रभर चाहे कोई पुकारा करें उनका नाम..

वो फिर नही आते.. वो फिर नही आते..”

“आप की कसम” या हिंदी चित्रपटातील हे गीत. केवढं जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलेलं आहे या संपूर्ण गीतामध्ये. किती क्षुल्लक कारणावरून आपण जीवाभावाचे नातं क्षणात नष्ट करतो. स्वतःचा अहंकार कुरवाळत बसतो. ते नातं, ते माणूस पुन्हा जोडण्याचा आपण प्रयत्न ही करत नाही. पण मन मात्र खरं बोलत असतं आपलं. त्या व्यक्तीच्या दूर जाण्याने आपण दुखावलेलो असतो. तिचं आपल्याभोवती वावरणं, तिचा सहवास संपल्यानंतर जाणवतं की ती व्यक्ती आपल्या मनाच्य किती जवळ आहे. किती महत्वाची आहे आपल्यासाठी.

खरं तर माणूस एकटा येतो, एकटा जातो. आपण सारेच प्रवासी इथे‌. पण किती आटापिटा करतो आपला गोतावळा जपण्याचा. बाळ जन्माला आल्यापासून त्याला आई-बाबा, नातलग कळत जातात.  तेही या गोतावळ्यात आनंदाने अडकून जातं. आपल्या माणसांसाठी जीवाचं रान करतो आपण. त्यांच्यासाठी आयुष्यभर झटत असतो. आपल्या माणसांनी आपलं कौतुक करावं, आपली व्यथा, आपलं दुःख त्यांनी समजून घ्यावं यासाठी किती अट्टाहास असतो आपला.

आपलं कुटुंब, आपलं प्रेमाचं माणूस आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपलं जग यात सामावलेलं असतं. आपलं माणूस काही काळाकरता नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गावी गेलं तरी करमत नाही आपल्याला, बेचैन होतो आपण. लहान मुलांचं निरीक्षण करा. बाबा जर बाहेरगावी गेला तरीही लहान मुलं त्याचा शर्ट घालून बसतात. शब्दांनी व्यक्त करता येत नसेल त्यांना. पण बाबांची खूप आठवण येत असते.

मृत्यू अटळ आहे. तरीही अशी कायमची दुरावलेली माणसं तर फार चटका लावून जातात जीवाला. “आई” दैवत असतं आपल्यासाठी. आईला आपण नेहमीच गृहीत धरतो ना! काहीही झालं तरी आई आहेच आपल्यासाठी, हा केवढा विश्वास असतो आपला. कधी कधी आपण उद्धटपणे किंवा वाईट वागतो आईशी. अगदी भांडतो ही. ती कायमची निघून गेली तर मात्र जाणवतं की तिची जागा आता कोणीच, कधीच भरून काढणार नाही. तिच्यासारखं निस्वार्थ प्रेम, माया, काळजी कोणीच करणार नाही. ती किती जवळ होती आपल्या हे कळतं. मग आपण तिच्या वस्तू, साड्या सांभाळून ठेवतो. तिचा मायेचा स्पर्श या वस्तूंमध्ये शोधतो. खरंय ना!

तसेच “बाबाचं” बाबांप्रती नेहमीच आदरयुक्त भीती वाटत असते. आई सारखं आपण बाबांवरचं प्रेम फार दर्शवत नाही. पण बाबांची जागाही कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. त्यांचे कष्ट, कर्तव्य, कुटुंबासाठी झटणं हे ते गेल्यानंतरच लक्षात येत आपल्याला. मग कळतं आपलं आपल्या बाबांवर किती प्रेम आहे. आई वडिलांचा मायेचा हात जोपर्यंत तुमच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांना भरभरून प्रेम द्या. त्यांची सेवा करा.

कुटुंबातील सदस्य असोत, प्रियकर-प्रेयसी असोत, तुमच्याशी रोज संबंध येणारे तुमचे सहकारी असोत.. किती माणसं जोडलेली असतात आपण. प्रत्येक नात्याच्या मूलभूत गरजा, अपेक्षा असतात. त्याचप्रमाणे मर्यादाही असतात. निरतिशय प्रेम, माया, विश्वास, आदर, समजूतदारपणा हे काही नातं निभावण्याचे आयाम आहेत. कित्येकदा प्रियकर-प्रेयसीचे सुंदर नातं एखाद्या क्षुल्लक गैरसमजामुळे कायमचं तुटतं. मात्र हे प्रेमाचं माणूस निघून गेल्यावर कळतं की त्या व्यक्ती शिवाय आपण राहू शकत नाही. किती जवळची होती ती आपल्याला. मनातील प्रत्येक चांगली वाईट गोष्ट सांगायचं हक्काचं ठिकाण होतं. पण आपणच  एका गैरसमजापोटी हे सुंदर नात गमावलं. अशा वेळी अनेकदा नैराश्यही येतं.

एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा असा स्वभाव असतो, दृष्टिकोन असतो. अपेक्षा प्रचंड वाढल्या, नातं गृहीत धरलं, फक्त माझ्याच मनाप्रमाणे  घडलं पाहिजे हा अट्टाहास, संशय, अहंकार अशा अनेक चुकीच्या गोष्टींनी आपण आपली आवडती नाती तोडून टाकतो. आणि नंतर पश्चाताप होतो. आता त्याचा काही उपयोगही नसतो. मृत्युने कायमस्वरूपी दूर गेलेली माणसं असो किंवा काही कारणाने दूर गेलेली माणसं असो, या माणसांच्या तुमच्या आयुष्यातून जाण्याने जी पोकळी निर्माण होते ती कोणीही भरून काढू शकत नाही.

जीवन प्रवाही आहे. बदल हे होणारच. काही नात्यांचा प्रवास मर्यादित असतो. त्यांचं संपणं योग्य असतं. काळ सर्वात प्रभावी औषध आहे. नवीन नाती ही निर्माण होतातच की. पण तरीही जी खरंच तुमची प्रेमाची नाती आहेत ती जपून ठेवा. तुमच्या प्रेमाचं, विश्वासाचं, कौतुकाचं, मायेचं खत पाणी घालून त्यांना बहरू द्या. आपलं माणूस चुकलं तर माफ करा, माफी मागा. मनमोकळेपणाने व्यक्त व्हा. तुमच्या भावनांचा योग्य वेळी योग्य निचरा होऊ द्या. आज सर्वपित्री अमावास्या आहे. “माणूस गेल्यानंतर तो किती चांगला होता हे म्हणणारा समाज आपला.” अगदी काटेकोरपणे कर्मकांड करताना माणसाला जिवंतपणीच एक माणूस म्हणून प्रेमाने, सन्मानाने जगू द्या. त्याचप्रमाणे तुमची प्रेमाची व्यक्ती तुमच्या किती जवळ आहे हे समजायला ती दूर जाणच गरजेचं नाही. ती जवळ असतानाच दूर जाऊ नये याची तुम्ही पूर्ण काळजी घेतलेली असेलच.. बरोबर ना!!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!