Skip to content

काही लोकांना सवय असते, जे नाहीये त्याचाच सतत विचार करत बसतात.

काही लोकांना सवय असते, जे नाहीये त्याचाच सतत विचार करत बसतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


गिरीश एक दहा वर्षाचा मुलगा. आई-वडिलांचा एकुलता एक व लाडका. पहिल्यापासून त्याला हवं ते आणून दिल जायच. परंतु त्याला एक सवय होती. त्याच्याकडे किती आणि काय आहे याहूनही जास्त त्याच्याकडे काय नाही आहे याकडे त्याचे जास्त लक्ष असायचे. उदाहरण द्यायचे झाले तर कंपास आणून दिली तर डबल कप्प्याची नाही म्हणून तक्रार. चांगलं जॅकेट आणून दिलं तर त्याला खिसे नाहीत म्हणून नाराजी. त्याचा हा स्वभाव वाढत्या वयानुसार वाढतच गेला.

तो सतत त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही याचा विचार करत बसायचा आणि दुःखी व्हायचा. एकमजली घर बांधलं तर त्यात त्याला दुसरा मजला नाही. बाजारातून काही सामान आणलं, सर्व मोजक्या दरात मिळालं तरी एक गोष्ट मिळाली नाही त्यासाठी नाराज होणे, त्यावर विचार करणे.

याचा परिणाम असा झाला की गिरीशमध्ये कधी समाधानी वृत्ती दिसली नाही. तो सदानकदा असमाधानी वृत्ती घेऊन वावरत असे. चेहऱ्यावर एक प्रकारचा अपूर्णतेचा भाव घेऊन असे. गिरीशसारखी अनेक लोक आजूबाजूला वावरत असतात. अशी लोक आपल्याकडे जे आहे, चांगला आहे त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करून, त्याला कमी महत्त्व देऊन जी गोष्ट नाही त्याच्याकडे लक्ष देत राहतात.

ज्याच्यामुळे स्वतःचा आनंद ते घालवून बसतात. एलईडी टीव्ही असला तर त्याच्यामध्ये एक आवडीचा चैनल नाही म्हणून नाराजी. परीक्षेमध्ये 90 टक्के मार्क पडले तरी उरलेले 10 टक्के पडले नाहीत यासाठी वाईट वाटून घेणे याचा सतत विचार करत राहणं, बाजारात गेल्यावर सर्व गोष्टी मिळाल्या त्याला महत्त्व न देता ती वस्तू घ्यायची राहिली त्याचा विचार करत राहणं. प्रोजेक्ट चांगला झालेला असूनही presentation साठी जास्त वेळ मिळाला नाही याचं वाईट वाटून घेण. या सर्व गोष्टी माणसाला असमाधानी बनवत राहतात आणि ज्या गोष्टी आहेत त्याचाही ती व्यक्ती नीट आनंद घेत नाही.

ग्लास पाण्याने अर्धा भरून ठेवला आणि जर विचारलं काय काय दिसतय तर ग्लास अर्धा भरलेला अर्धा रिकामा म्हणणे किंवा अर्धा भरलेला आहे असे म्हणणे हे कुठेतरी सकारात्मकता दाखवून देत. वास्तविकता दाखवून देत. पण सुरुवातीला ग्लास रिकामा आहे म्हणणं किंवा त्याकडे आधी लक्ष जाणं, त्यावर अधिक भर देण ही गोष्ट त्या व्यक्तीची मानसिकता नाही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची म्हणजेच नकारात्मक आहे हे दिसून येते.

ही असमाधानी वृत्ती, नसलेल्या गोष्टींचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेणे कुठेतरी बदलायला हवं की नको? ज्यातून आपली प्रगती होईल आपण पुढे जाऊ शकतो समाधानी होऊ शकतो. तो बदल कसा करायचा? त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. काही नवीन आरोग्यदायी विचार स्वतः मध्ये रुजू करावे लागतील.

१. जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा: असं कधीच होत नाही की माणसाकडे कधीच काही नसतं. स्टीफन हॉकिंग या माणसाने जवळपास अख्ख आयुष्य एका wheel chair वर काढलं. पाहायला गेलं तर त्यांना शरीर देखील हलवता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्येपण एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांची विचारशक्ती.

ही व्यक्ती जर नाव कमवू शकते तर आपण का नाही? आपण आपल्याला चांगले ब्रँडेड कपडे मिळाले नाहीत यासाठी रडतो पण असे अनेक लोक आहेत ज्यांना ऊन पावसापासून वाचण्यासाठी देखील कपडे नसतात. निदान तेवढे तरी आपल्याकडे आहेत हे महत्वाचं नाही का? हॉटेलमध्ये जाण्यासाठी पैसे नाहीत अस म्हणताना ज्यांना दोन वेळेचं खायलाही मिळत नाही त्या तुलनेने आपल्याकडे तेवढं तरी आहे आपण पोटभर जेवू शकतो असा विचार केला पाहिजे. कारण हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. स्वतःला सतत सांगा की माझ्या कडे असणाऱ्या गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे, समाधानी आहे.

२. दुसऱ्याशी तुलना करणे टाळा: अनेकदा दुसऱ्याशी तुलना करून आपण आपल्याकडे असलेला आनंद घालवतो. म्हणून दुसऱ्याशी तुलना करणे टाळा आणि जर करत असाल तर त्या व्यक्तीने ते मिळण्यासाठी काय मेहनत केली आहे याचा देखील विचार करा.

३. ज्या गोष्टी नाहीत त्यांना गरजेचे आहे तितकेच महत्त्व द्या: आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा फक्त आनंद घ्यायचा त्यांच्याबाबत फक्त समाधानी राहायचं आणि नाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असं अजिबात नाही. आपल्याकडे जे काय कमी पडत आहेत याचा पण विचार जरूर केला पाहिजे पण तो आपल्या प्रगतीसाठी केला पाहिजे आणि प्रगती करत असताना ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे डोळेझाक न करता त्यांचा आनंद घेत नवीन गोष्टी ज्या आता आपल्याकडे नाहीत त्या मिळवायच्या आहेत.

तीन खोल्यांचं घर आहे यासाठी कृतज्ञ राहून घराची वाढ कशी करता येईल त्यासाठी मला काय मेहनत करायला पाहिजे यावर विचार करा. अशी वृत्ती राहिली तर माणूस समाधानी राहू शकतो. साध्या घरात राहणारी माणसं पण मनापासून आनंदी जीवन जगताना दिसतात आणि अतिश्रीमंत लोक देखील बऱ्याचदा असमाधानी दिसतात. अस का होत? कारण हे सर्व विचारांमध्ये आहे. म्हणून आपल्या विचारांना योग्य वळण लावणं गरजेच आहे.

मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. माणसाच आयुष्य हे परिपूर्ण कधीच नसतं. काही ना काही कमतरता ही असतेच. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात नेहमी समाधानी राहावं, कृतज्ञ राहाव. कारण या चांगल्या गोष्टीही जर आपल्या आयुष्यात नसत्या तर आपल आयुष्य कसं गेलं असतं हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

म्हणून जे आहे त्यात आनंदी राहायला शिका. सर्वात महत्वाचं आपण जिवंत आहोत आपल्याकडे काही तरी करण्याची, विचार करण्याची शक्ती आहे क्षमता आहे याहून जास्त महत्त्वाचं काय असू शकतं? म्हणूनच नाही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायला शिका ज्यातून तुमच आयुष्य अधिक सुखकर होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!