Skip to content

काही माणसं कायम आपल्या सहवासात नसतात, पण त्याचं फक्त असणं मनाला उभारी देणारं असतं.

काही माणसं कायम आपल्या सहवासात नसतात, पण त्याचं फक्त असणं मनाला उभारी देणारं असतं.


मेराज बागवान


आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर कायम कोणीच नसते.म्हणजे प्रत्यक्षपणे तरी कोणीच नसते.काही माणसे नेहमी आपल्या सहवासात असतात. आपल्याला त्यांची जणू सवयच झालेली असते. ही माणसे म्हणजे कोणीही असू शकते.जसे की आपले आई-वडील,शिक्षक, भाऊ-बहीण, नवरा-बायको, मुले, मित्र-मैत्रिणी, शेजारी, सहकारी ,इतर नातेवाईक वगैरे..पण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी अशीही एक वेळ येते, जेव्हा आयुष्य अशा एका वळणावरती येते जिथे यातील काही माणसे आपल्या सहवासातून हळूहळू निघून गेलेली असतात.आपल्या आयुष्यात कुठेतरी असतात पण सहवासात मात्र नसतात.पण जरी अशी माणसे आपल्या कायम सहवासात नसतील तरी त्यांच फक्त आपल्या आयुष्यात असणं मनाला उभारी देणारं असतं.

आपल्या शाळेमधील कोणी मित्र असतो.शाळा जोपर्यंत होती तोपर्यंत नेहमी आपल्या सहवासात असणारा मित्र , शाळा संपली की अचानक दूर होतो.कारण कोणतेही असो. पण सहवास मात्र संपतो.मग अचानक काही काळानंतर त्या मित्राशी कोणत्यातरी स्वरूपात गाठ पडते.कोणत्यातरी कामी तो आपल्याला मदत करतो .आणि तो क्षण पुन्हा आपल्याला जाणीव करून देतो की, ‘हा माझा मित्र आहे ना मग काही चिंता नाही’ आणि कुठेतरी मनात एक सुखद दिलासा मिळतो.जो पुन्हा नव्याने जगण्याची उर्मी देतो.

कॉलेज मधील कोणी मैत्रीण असते.कॉलेज मध्ये असताना नेहमी आपली चेष्टा करणारी, पण काही नैराश्य आले तर समजून घेणारी आणि समजून सांगणारी देखील.मग पुढे, कॉलेज संपते.ती देखील कुठेतरी दूर उडून जाते. सहवास संपतो.मग पुढे आयुष्य जगत असताना अनेकवेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नैराश्य येतच असते.मग ही मैत्रीण आठवते.तिचे ते सकारात्मक शब्द आठवतात, तिचे प्रेरणादायी शब्द, तिची समजून सांगण्याची पद्धत फक्त आठवूनच मन आशेने भरून जाते आणि पुन्हा नव्याने कामाला लागते.

आपल्या घराच्या शेजारी देखील अनेक मंडळी राहत असतात.गरजेच्या वेळी उपयोगी पडलेली असतात.ही मंडळी देखील कधी तरी दूर जातातच.कधी बदली झाली म्हणून, तर कधी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळे.मग संपर्क हळूहळू कमी होतो.पण काळ भरकन निघून जातो आणि ही मंडळी दिसेनाशी होतात.मग असेच कधी विचार करीत असताना, त्यांचा विषय निघतो.प्रत्यक्ष जाऊन बोलावे, भेटावे असे वाटतेच असे नाही.पण ‘आठवण’ मात्र कायम मनात राहते.आणि मनात कुठेतरी खूप छान भावना जागृत होतात. मनातल्या मनात नकळत कृतन्यता व्यक्त केली जाते.आणि आपसूकच चेहऱ्यावर छोटेसे पण गोड असे ‘स्माईल’ येते.

‘शिक्षक’ , जे आई वडीलांसमान असतात.आई-वडीलांनंतर जे निरपेक्षपणे आपल्यावर प्रेम करतात, ते शिक्षकच असतात.ते देखील दूर जातात.शैक्षणिक जीवन संपले की संवाद, गाठी-भेटी हळूहळू लुप्त पावतात.ह्याच शिक्षकांनी आपल्याला करिअर मध्ये मदत केलेली असते.योग्य मार्ग दाखविलेला असतो. आयुष्याच्या शाळेत देखील अनेक अडी-अडचणी येतात, आणि त्या क्षणी शिक्षकांनी दिलेली शिकवण आठवते.आपण त्यांना ते खूप कमी वेळा बोलून दाखवितो, किंबहुना दाखवत देखील नाही.पण त्यांचे बोलणे आठवून खूप हायसे वाटते.

आपल्या घरात देखील अनेक माणसे असतात.मग ते नाते कोणतेही असो.आयुष्याच्या एका ठराविक टप्पावर आल्यानंतर ह्या सगळ्यांची खूप आठवण होते.मग ती व्यक्ती जिवंत असो वा नसो.आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप मोठा पाठिंबा दिलेला असतो. प्रसंगी आपल्यासाठी त्याग, कष्ट,हाल सोसलेले असतात.आपले चांगले व्हावे म्हणून सर्वोत्तम प्रयत्न त्यांनी केलेले असतात.पण तरी देखील आपल्या सहवासात ही माणसे कायम राहत नाहीत.कुठे ना कुठे ताटातूट होतेच.पण प्रेरणा देण्याचे काम ही माणसे करीत असतात,ज्यामुळे आपले आयुष्य बहरत असते, फुलत असते.

सार्वजनिक जीवनात वावरत असताना देखील, अनेक सहकारी भेटतात.व्यावहारिक जीवनात कसे वागले पाहिजे हे ते आपल्याला शिकवतात.प्रसंगी मार्गदर्शन देखील करतात.आणि आपली समस्या संपली की निघून जातात.आणि आपल्याला तर समजत देखील नाही , की , ही माणसे कुठे आज कधी निघून गेली आपल्या आयुष्यातून.पुन्हा मग अशा काही समस्या आल्या की ही माणसे आठवतात.त्या क्षणी ती आपल्यासाठी असतीलच असे नाही.पण त्यांनी केलेल्या मदतीची खूप प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

अशी ही वेगवेगळी माणसे….आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यायावर भेटणारी…कायम तर कधी नसतील अशी ही माणसे.पण जीवनाचा अर्थ शिकविणारी,जीवन म्हणजे काय हेच जणू आपल्याला सांगू पाहणारी ही माणसे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणी ना कोणी असतेच.ही माणसे आपली कायमची कधीच नसतात.पण कायम आपल्याला आयुष्यात शेवटपर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून असते. मनाच्या एका कोपऱ्यात अलगद असतात अशी माणसे.आपल्या आयुष्यात ‘स्पेशल’ अशी जागा बनवून गेलेली असतात.कधी यांची आठवण आली तर दुरूनच आपल्याला जणू सांगत असतात, “काळजी करू नकोस, मी कायम आहे तुझ्यासाठी.”

खरेच अशी माणसे आयुष्यात लाभण, हे आपलं भाग्यच असतं.आयुष्यात प्रत्यक्ष जरी जमत नसले तरी मनात कायम जपावीत अशी माणसे.त्यांना आपण ‘धन्यवाद’ जरी नाही देऊ शकत असू किंवा कृतन्यता जरी नेहमी व्यक्त करता येत नसेल तरी त्यांच्यातील असे काही खास गुण आपण देखील स्वतःमध्ये नक्कीच अंगी कारू शकतो आणि आपण देखील दुसऱ्या कुणासाठी तरी ‘स्पेशल’ बनू शकतो.

अशा ह्या ‘स्पेशल’ माणसांना एक ‘स्पेशल सलाम’!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “काही माणसं कायम आपल्या सहवासात नसतात, पण त्याचं फक्त असणं मनाला उभारी देणारं असतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!