काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागत.
गीतांजली जगदाळे
काही नाती तुटू नयेत म्हणून बोलणं बंद करावं लागत… असं काय होत नक्की की नातं टिकवण्यासाठी बोलणंच बंद करावं लागत? खरं तर बोलणं, संवाद साधनं या गोष्टी तर नात्याचा पाया असतो. या गोष्टींवर नातं अधिकाधिक अतूट बनत जात, फुलतं, आणि व्यक्ती एकमेकांच्या जास्त जवळ येतात, एकमेकांच्या सुखदुःख्खात सहभागी होतात, त्याचे साक्षीदार बनतात. मग नातं टिकवण्यासाठी तेच बोलणं, संवाद साधनं बंद केलं तर नातं टिकणार तरी कसं?
कधी कधी जीवनात असे प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती येते जिथे आपला जवळचा माणूस ज्याच्याशी आपलं घट्ट नातं असत तो काही कारणांनी आपल्याला दुरावतो मग ते गैरसमज असू शकतात किंवा आणखी काही . पण त्या ज्या काही गोष्ट असतील त्या जेव्हा एकमेकांकडे व्यक्त होऊन ही काही साध्य होत नाही , ना गैरसमज दूर होतात ना नात्यातला दुरावा कमी होतो, पण शब्दाला शब्द मात्र वाढत जातात आणि आहे त्यापेक्षा परिस्थिती खराब होते आणि त्याचबरोबर नातं ही तुटण्याची वेळ येते.
पण जेव्हा हे असं घट्ट आणि पक्क असणार नातं तुटायची वेळ येते तेव्हा मात्र मानसिकरीत्या एकमेकांमध्ये अडकलेली ती दोन माणसे इतक्या सुंदर नात्याचा अंत होऊ नये म्हणून न बोलण्याच ठरवतात. म्हणजे कमीतकमी त्या नात्याच्या चांगल्या आठवणी तरी आयुष्यभर लक्षात ठेवता येतील असा विचार करतात.
यातून चांगलं काही होतं नाहीए तर अजून खराब तरी होऊ नये म्हणून या निर्णयाला पोचतात आणि कधी कधी खरंच न बोलणं याने ही नातं टिकत. ते म्हणतात ना, ‘काही गोष्टींवर वेळ हेच औषध असत’ , त्याचप्रमाणे जेव्हा ती ठराविक वेळ निघून जाते तेव्हा काही गोष्टी उलगडून आपोआप दुरावा कमी होऊन नातं परत रुळावर यायला ही मदत होते.
त्यामुळे उगाच ताणत बसण्यापेक्षा काही गाठी तशाच आहे त्या जागेवर सोडल्याने आणि नंतर काही दिवसांनी येऊन सोडवायचा प्रयत्न केल्याने लगेच सुटतात ही. अशा वेळी काही वेळ निघून जाऊ देणं हेच शहाणपणाचं ठरतं.
शब्द हे जसे वरदान आहेत तसेच एका बाजूने शाप ही आहेत. शब्दांमुळे आपल्याला व्यक्त व्हायला मदत होते पण व्यक्त होताना कधी कधी याच शब्दांची निवड जर चुकली तर त्यातून खूप मोठे वाद ही होऊ शकतात, कित्येकांची मन दुखावली जाऊ शकतात. शब्दांमध्ये इतकी ताकद असते की शब्द हे एखाद्या आजाऱ्याला बरं व्हायला मदत ही करू शकतात आणि तेच शब्द एखाद्याच्या मनावर गंभीर जखमा ही करू शकतात. म्हणून च संवाद साधनं हे जस नातं फुलवण्यासाठी, टिकवण्यासाठी आवश्यक असत तसेच तेच नातं टिकवण्यासाठी तोच संवाद कधी कधी बंद ही करावा लागू शकतो.
त्यामुळेच जमेल तितका माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, काही वेळा समजून घ्यायचा प्रयत्न करून ही काही माणसे कळणार नाहीत पण त्याही वेळेला त्या माणसाच्या मताचा, निर्णयाचा स्वीकार करायचा प्रयत्न करा (जे पटत नाही त्याचा स्वीकार करणं सोप्प नाही त्यामुळे नेहमीच करा असं म्हणणार नाही पण काही वेळेला तरी ते नक्कीच शक्य होईल आपल्याला).
जमेल तितका संवाद साधा, गप्पा मारा, एकमेकांना समजून घ्या म्हणजे बोलणं बंद करण्याची वेळ येऊ नये असाच प्रयत्न नेहमी ठेवा पण तरीही कधी काही झालं ज्यामुळे तुम्हाला ती गरज वाटायला लागली तर एकमेकांना थोडा वेळ द्या, थोडं अंतर ठेवून स्वतःसाठी थोडा वेळ घेऊन आणि समोरच्याला ही थोडा वेळ देऊन शांत व्हा आणि मग बघा आपलं वेळ नावाचं औषध काही दिवसांनी नक्कीच त्याच काम करेल आणि कदाचित तुम्हाला परत संवाद चालू करावासा वाटेल.
तर शेवटी नातं टिकणं हे महत्वाचं! त्यासाठी संवाद चालू असणं काय आणि बंद असणं काय दोन्हीही गरजेचं !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


