काही चेहरे अक्षरशः घायाळ करतात, अशावेळी कसा कंट्रोल ठेवावा.
हर्षदा पिंपळे
नेहमीप्रमाणे श्रेयसने खिडकीतून बाहेर डोकावलं आणि त्याच्या नजरेस ‘ती’ पडली. तिचा चेहरा पाहून त्याला काही ओळी सहज सुचत गेल्या.जसं की…….
तुझ्या त्या मोहक अदा
डोळ्यांच्या, ओठांच्या…
गुलाबी गालावरील
न सावरणाऱ्या बटांच्या…!!
न राहून राहून त्याला सतत खिडकीतून बाहेर डोकवावस वाटत होतं.कामात वगैरे लक्ष लागणं दूरच राहीलं होतं.तो सतत खिडकीतून बाहेर पहात होता. तिचा तो चेहरा त्याला सतत पहावासा वाटत होता.ते डोळे , त्या केसांच्या बटा त्याला मोहून टाकणाऱ्या होत्या. आणि खरच तो घायाळ होऊन पुरता त्या चेहऱ्यावर भाळला होता.त्याच त्या चेहऱ्याविषयीच कुतूहल हे वाढतच चाललं होतं.कंट्रोल कसं करायच त्याला काही कळतच नव्हतं.
पहा…आपलं आयुष्य हे इतकं विस्तीर्ण आहे.आणि या आयुष्यात माणसांचीही तितकीच गर्दी आहे. कितीतरी चेहऱ्यांशी आपण कायमस्वरूपी जोडले गेलेले असतो.पण काही चेहरे अनेकदा अनोळखीच असतात. त्यातल्या त्यात काही चेहरे पाहिले की तनामनात एक वेगळच वारं संचारतं. ते चेहरे पाहिले की नेमकं काय होतय तेही कळेनासं होतं.
आणि कोणाला कोणता चेहरा कसा वाटेल काही सांगता येत नाही. प्रत्येक जण प्रत्येक चेहऱ्याच वर्णन करताना वेगवेगळ्या शब्दात करतो.चेहरा म्हंटल की चेहऱ्यावरील हावभाव, शैली या गोष्टी येतात. त्या अनेकदा आपल्याला घायाळ करून जातात.
कुणाच्या लवलवणाऱ्या दाट पापण्या , टपोरे डोळे , मासोळीसारखे नक्षीदार डोळे, कुणाचे काळेभोर लांबसडक केस , उंच कपाळ , चाफेकळी नाक , डाळींबासारखे दात ,गोबरे गोबरे गाल , नाजूक-गुलाबी ओठ ,गुलाबी ओंजळी , त्या तितक्याच दाट – काळ्या भुवया वगैरे वगैरे गोष्टी एका चेहऱ्यात असतात. असे चेहरे समोर आले की मन घायाळ होऊन जातं.अशावेळी मनावरचा ताबा सहज सुटायला लागतो.कारण घायाळ झालेलं मन स्वस्थ बसू देत नसतं.ईतकच नाही तर तरूणांच्या चेहऱ्याचही तितकच कुतूहल……!
त्यांच सरळ असणारं नाक , पिळदार मिशा , त्या डोळ्यातील नजरा , ते भुवया उंचावणं , डोळे वगैरे वगैरे अनेक गोष्टी मनाला भुरळ पाडणाऱ्या असतात.
थोडक्यात काय तर त्या मोहणाऱ्या अदा, दिलखेचक नजरा , तो नाकावरचा राग , ते हसणं – मुरडणं सगळं काही मनाला एका क्षणात घायाळ करतं.अशा वेळी त्या चेहऱ्यावरून आपल्या नजरा इकडे तिकडे लवकर फिरकतही नाहीत.
त्या एका चेहऱ्याकडे मन ओढलं जातं.त्यावेळी आपली अवस्था एका चुंबकासारखीच झालेली असते.
अशावेळी मनाला आवर घातला पाहिजे. कारण अनेकदा उगाचच छोट्या मोठ्या गोष्टी होऊन बसतात.
मुळातच हा असा चेहरा आपल्याला कुठेही दिसू शकतो.गर्दीत किंवा अगदी कुठेही….!
त्यामुळे आपण आपल्यावर आधीच काही बंधन घालणं अपेक्षित आहे. काही गोष्टी नैसर्गिक आणि नियंत्रणाबाहेर असल्या तरी त्यावर ताबा हा ठेवलाच पाहिजे ह्याची स्वतःला जाणीव करून द्या. थोडीफार शिस्त आधीच स्वतःला लावून घ्या.वेळेच-काळाच थोडफार भान बाळगा.तो घायाळ चेहरा सोडून इतरही गोष्टी आजुबाजुला आहेत याची एक चिमटा स्वतःलाच काढून आठवण करून द्या.
स्वतःच्या नजरेवर नियंत्रण ठेवणं गरजेच आहे.हे लक्षात घ्या.साधं आणि सरळ आहे. आपणच आपल्या भावनांना, आपल्या आकर्षणाला थोडीशी मुरड घातली पाहिजे. दुसरं तिसरं कोणी नाही तर हे आपल्याच हातात असतं.समोरच्या चेहऱ्यावर किती काळ नजर फिरवायची हे आपल्या हातात असतं.
आयुष्यात असे घायाळ करणारे चेहरे नाही म्हंटलं तरी काही अंशी बऱ्याच प्रमाणात नजरेस पडतात. त्यामुळे या गोष्टी घडणारच असं समजून त्या क्षणी ‘move on’ चा पर्याय वापरून पहा.कारण move on केल्याशिवाय पुढील कोणत्याच गोष्टी पूर्ण होणार नाहीत. आपण त्या एकाच घायाळ चेहऱ्यात गुंतून पडायच की पुढे जायच हे प्रत्येकाने ठरवावं.
त्या उत्कटतेवर कंट्रोल ठेवणं तसं अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही. त्यामुळे एका क्षणानंतर आपली वाट शक्यतो बदलण्याचा प्रयत्न करा.
नैसर्गिक असलं तरी थोडफार नियंत्रण तर ठेवायला हवचं नं…?
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


