“काही काळ सर्व बंद व्हावं आणि आपणच चालत राहावे.”
मधुश्री देशपांडे गानू
“पंछी बनू उडती फिरूं मस्त गगन मे आज मैं आजाद हूं दूनिया की चमन में”
“चोरी चोरी” चित्रपटातील हे गाणं किती सुंदर आहे ना! मस्त मोकळ्या निरभ्र आकाशाखाली शेतातून वाट काढत नायिका हे सुंदर गीत गाते. पाहून सुद्धा आपल्याला छान वाटतं. मस्त मोकळी ताजी हवा, आजूबाजूला पसरलेला सुंदर निसर्ग, हिरव्या रंगांच्या अनेक छटा, नानाविध रंगांची, आकाराची फुललेली फुले, स्वच्छंद विहरत असलेले पक्षी, निसर्गाचा स्वतःचा असा सुरेल नाद आणि आपल्या मनातील शांतता…
सर्वस्वाने आपण निसर्गाचा भरभरून आनंद घेत असतो. नकळत मन उल्हासी, उत्साही, आनंदी होतं. चित्तवृत्ती फुलून येतात. असं वाटतं, असंच निसर्गाच्या सानिध्यात चालत राहावं. माणूस म्हणून असलेल्या सर्व चिंता, विवंचना, स्वप्नं, सुख-दुःख सगळं सगळं विसरून फक्त निसर्गाशी एकरूप व्हावं.
किती सुंदर आहे हे सारं! म्हणून तर आपण सहलीला जाण्याचा अट्टाहास करतो. वर्षातून एक दोनदा तरी मस्त, मुक्त, तणाव विरहित जगता यावं, नवीन ऊर्जा परत भरून घ्यावी, नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावं यासाठी. मन आणि शरीर दोन्ही रोजच्या धबडग्यात, रुटीनला कंटाळतं, थकतं. त्याला विश्रांती हवी असते.
आपल्या माणसांबरोबर मनसोक्त वेळ हवा असतो. मोबाईल रिचार्ज करतो तसंच स्वतःलाही रिचार्ज करायचं असतं. यासाठी जाणीवपूर्वक ठरवून वेळ काढावा लागतो. नाही, तो काढावाच. याने तुम्ही स्वतः तर ताजेतवाने होताच पण तुमची प्रेमाची नातीही पुन्हा नव्याने बहरतात. त्यांनाही याची गरज असते. म्हणून तर मित्र-मैत्रिणींची गेट-टुगेदर होतात ना! एकमेकांना भेटून जो आनंद होतो, जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कशानेही लाभत नाही.
माणूस म्हटलं की जीवनात सगळे भावनिक चढ-उतार आले. काळजी, ताणतणाव, चिंता, विवंचना, भविष्याचा विचार, भूतकाळातील दुःखद घटनांच्या सावल्या सगळं बरोबर घेऊन आपण “आज” ला सामोरे जात असतो. हे सगळं ओझं कधीतरी उतरवून मोकळं व्हावं, असं वाटत असतं. नको हे सारं! असं वाटतं. पण आपण रूटीनमध्ये इतके अडकलेले असतो की बाहेर पडता येत नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या, कुटुंबातील माणसांप्रति जबाबदाऱ्या, सामाजिक जाणीवा, जबाबदाऱ्या असं सगळं त्याला निभवावं लागतं. यातून त्याची सुटका नाही. सतत कोणतंतरी नातं निभवावं लागतं.
एक उदाहरण घेऊ. एक मध्यमवयीन स्त्री. लग्न झालेली आणि नोकरी करणारी. तिला रोज सकाळी उठल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखी नाचावं लागतं. स्वयंपाक पाणी, सगळ्यांचे डबे, स्वतःचं आवरून नोकरी, मग संध्याकाळी घरी येताना भाजी, किराणा खरेदी, आल्यावर परत रात्रीचा स्वयंपाक, यामध्येच सणवार, व्रत वैकल्ये, कुळाचार, आले गेले पैपाहुणे, वेगवेगळ्या अनेक नात्यांच्या अपेक्षा, आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून…
स्वतःसाठी कधी वेळ मिळणार? स्वतःच्या आवडीनिवडी कधी जोपासणार? सतत कुटुंबाला काय हवं नको याचाच विचार. कित्येक बायकांना स्वतःच्या आवडीनिवडी काय आहेत हेही विसरायला झालेलं असतं. मग मुलं मोठी झाली की बायकांना एक विचित्र रिकामपण येतं. विशेषतः गृहिणी असणाऱ्यांना. फक्त कुटुंबासाठी राबायचे एवढंच त्यांना माहीत असतं. अशावेळी आणि नेमके रजोनिवृत्तीच्या काळात विचित्र रिकामपण , एकटेपण येतं. आत्मविश्वास हरवतो. काय करायचं समजत नाही.
माझी कोणालाही किंमत नाही असं सतत वाटतं. नैराश्य येतं. अशावेळी तिला खूप एकटं वाटतं. असं वाटतं नको ते नात्यांचे बंध. माझी घुसमट होतेयं. सगळं रुटीन, नात्यांच्या अपेक्षा, काम सगळं बंद व्हावं आणि मी एकटीनेच असावं. जगाच्या, घरातल्या कोलाहलापासून दूर. मी आणि एकांत. “फक्त मी.” मलाच शोधावं पुन्हा एकदा. माझं स्वत्व, माझ्या आवडीनिवडी, माझे छंद पुन्हा शोधावेत. परत मीच मला बालपणीची मिळावी. मुक्त, स्वच्छंद पक्षाप्रमाणे उंच भरारी घ्यावी.
सगळं सगळं बंद व्हावं रहाटगाडगं या जगाचं आणि मी एकटीने चालत राहावे. वाट फुटेल तिकडे. आनंदाच्या शोधात, शांततेच्या शोधात. थोडा वेळ तरी मला मिळावा माझा स्वतःचा असा. मी फक्त एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून नव्याने जगेन. रिचार्ज होईन. कोणत्याही नात्याचं लेबल नको. मी फक्त माझ्या बरोबरच आनंदी स्वच्छंदी. मीच मला सापडेन नव्याने आणि नवीन ऊर्जा मिळेल मला पुन्हा माझ्याच माणसांकडे परतायला.
आता हे आपण एक उदाहरण घेतलं. स्त्री-पुरुष दोघांनाही असच वाटत असतं. संसाराच्या जबाबदार्यांच्या ओझ्याखाली दबून जाताना स्वतःचा विचार पुरुषही नाही करत. बायका वेळोवेळी बोलून मोकळ्या होतात पण बहुतेक पुरुष मोकळेपणाने मनातील भावना, व्यथा बोलून दाखवत नाहीत. त्यांनाही या स्पेसची, स्वतःची स्वतःला तेवढीच गरज असते. पण हे एकटेपण, एकांत थोडा वेळ छान वाटतो, हो ना!
परत कधी एकदा आपण आपल्या घरकुलाकडे परततोयं ,आपल्या कुटुंबाकडे, प्रेमाच्या माणसांत जातोयं असंच वाटतं. प्रत्येकाने काही काळ तरी सर्व काही विसरून स्वतःसाठी काढलाच पाहिजे. मग तुम्ही मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला जा किंवा एकटे ट्रेकिंगला जा. आणि ताजेतवाने होऊन पुन्हा नवीन जोमाने या सुंदर आयुष्याला सामोरे जा. आत्मविश्वासाने, आनंदाने….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


