काहीतरी बिघडू शकतं याचा सारखा विचार करत बसू नका..
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
काहीतरी बिघडू शकतं याचा सारखा विचार करत बसू नका.हे वाक्य आज खूप काही सांगून गेलं.मी पुन्हा पुन्हा हे वाक्य ऐकलं आणि खरच लक्षात आलं की आपण नेमकं याच्या विरूद्धच विचार करतो.सतत एखादी गोष्ट करताना ती बिघडेल की काय हाच विचार आपण जास्त करत असतो.का कोणास ठाऊक आपल्याला गोष्टी बिघडण्याची भीती वाटत असते.म्हणजे काहीतरी चांगलही होऊ शकतं हा विचार आपल्या मनात येतच नाही.
ते ‘Negative vibes’ सतत आजुबाजुला फिरताना दिसतात. आणि काहीतरी बिघडेल म्हणून बऱ्याचदा आपण तसा विचार करून करून त्या गोष्टी करतच नाही.सरळ सरळ अगदी सोडून देतो त्या गोष्टी.यामुळे गोष्टी कधीच साध्य होणार नाहीत. आणि त्या गोष्टींमधून जे घडणार असतं तेही घडणार नाही. मुळात कोणताच अनुभव अशाने घेता येणार नाही. कदाचित माहीत असेलच तुम्हाला… की आपण जसा विचार करतो अनेकदा तसच होतं.मग आपण नकारात्मक विचार केला तर गोष्टी तशा घडतात.
आणि सकारात्मक विचार केला तर गोष्टी सकारात्मक प्रतिसाद देतात.मी काय म्हणते…बिघडल तर बिघडूद्या.त्याने काही आभाळ कोसळणार नाही. आणि कशावरून काही बिघडू शकतं…?? ‘ते बिघडणार नाही’ कधी असाही विचार करून पहायला काय हरकत आहे…??
एक मुलगी…अगदी अशीच विचार करायची.काहीही करताना सतत हे बिघडूही शकतं…वगैरे असा विचार करायची. अशा विचाराने तिचं मन काही कधी थाऱ्यावर नसायचं. सगळ्या गोष्टींची तिला आवड होती. पण हे सगळं करताना काहीतरी बिघडू शकतं असच तिला वाटायच.आवड होती आणि तिच्यात ते आत्मसात करण्याचीही क्षमता होती. पण…..पण ते काहीतरी बिघडू शकतं नावाच भूत तिच्या मानगुटीवर अगदी ठाण मांडूनच बसलेल होतं.
यामुळेच ति तिच्या या सगळ्या आवडत्या गोष्टींना नकळतपणे मुकत चालली होती. मात्र हे तिच्या लक्षात काही आलं नाही. म्हणजे बघा….तिच्यात क्षमता आणि आवड असूनही केवळ त्या एका विचारामुळे तिच्या बाबतीत तसं झालं. सारखा असा विचार करून तिने पुढचं पाऊल टाकलच नाही.
अशीच अजून एक मुलगी…. तिलाही विविध गोष्टींमध्ये रस होता. तिच्याही मनात हा विचार यायचा. पण तिने स्वतःला निक्षून सांगितल होतं की असा विचार सारखा सारखा मुळीच करायचा नाही. काहीतरी बिघडलं तरी चालेल पण आपण जे करायच आहे ते करायचच.असच एकदा ति चित्र रंगवत होती. रंगांचा आणि तिचा फारसा संबंध नव्हता.कुठे कोणता रंग छान वाटेल तिला काही समजत नव्हतं.
पण तिला चित्र रंगवायची खूप इच्छा होती. म्हणून तिने ते चित्र रंगवायला सुरुवात केली. आणि बघता बघता चित्र रंगवूनही झालं.पण मग चित्र रंगवून झाल्यावर ति त्या चित्राकडे एकटक शांतपणे बघत होती.नंतर कळाल की तिला ते रंगवलेलं चित्र फारसं आवडलं नव्हतं.कुठेतरी काहीतरी त्या चित्रात बिघाड झालाय हे तिला जाणवलं.
आणि मग तिने तसच चित्र पुन्हा एकदा रंगवायला सुरुवात केली. पण यावेळी मात्र ते चित्र अगदी छान रंगवलं होतं.आणि तिला यातून एक मात्र लक्षात आलं होतं की…काहीतरी बिघडेल असा विचार केला असता तर…मी चित्र रंगवलं नसतं…आणि चित्र रंगवलं नसतं तर रंगांची नीट ओळख झाली नसती.कुठे चुकलय ते कळालं नसतं………
तर बघा मित्रांनो…दोन्ही गोष्टींमध्ये थोडा फरक आहे. (पहिल्या गोष्टीत) तिने केवळ तसाच विचार केला. आणि त्यामुळे घडणाऱ्या गोष्टी घडल्याच नाहीत. तिने अनुभवही घेतला नाही.तर..(दुसऱ्या गोष्टीत) तिने तसा विचार न करता…काही बिघडलं तर बिघडूदे..मी शिकेन..अनुभव घेईल… असा विचार केला.आणि तिने तो अनुभव घेतलाही.
तसं पाहायला गेलं तर ही केवळ काही उदाहरणं झाली. आपल्या आयुष्यात असा विचार आपण अनेकदा करत असतो.विविध प्रसंगी असे विचार आपण करतो. ते स्वाभाविकही आहे.आणि एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं खरचं खूप घातक ठरू शकतं.पण..मला एकच सांगायच आहे की..कोणत्याही प्रसंगी ‘काहीतरी बिघडू शकतं’याचा सारखा विचार करत बसण्यापेक्षा ‘काहीतरी घडू शकतं’ असा विचार करा. अनेकजण बोलतात की…लिहीणं , बोलणं सोपं असतं…पण ते प्रत्यक्षात करणं मात्र खूप अवघड असतं.
मान्य आहे की अवघड असतं…पण तेच अशक्य असतं असं मला वाटत नाही. तुमच्या Dictionary मधून काही काळासाठी तरी अशक्य शब्द काढून टाकायला शिका..मग कसं सगळच अवघड असलेलं सोपं वाटायला लागेल….. बघा..विचार करा आणि काहीतरी घडेल असाच विचार करा.बिघडेल असा नाही……!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


