काहींना तुमच्यातलं चांगलं सहन होत नसेल, त्यामुळे तुमचा गोंधळ होत असेल तर हे उपाय करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्यापैकी सर्वांनी आपल्या लहानपणी राजा राणीच्या गोष्टी वाचल्या असतील. ज्यामध्ये एक राजा असतो त्याच मंत्री मंडळ असत. ज्यामध्ये वेगवेगळी माणसं असतात. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट असत. वेळोवेळी ती राजाला राज्याचा कारभार सांभाळताना, त्यासंदर्भात निर्णय घेताना मदत करत असतात.
मंडळ जरी एक असल तरी सर्वांचं एकमेकांशी अगदी छान पटतय, ते एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने वागत असं मात्र घडत नसे. कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे होते. सर्वच काही अगदी निस्वार्थी, चांगल्या स्वभावाचे अस नसत. पण त्यातही, ज्याच्या मनात कपट नाही, ज्याने आपलं आयुष्य राज्याच्या हितासाठी वाहिल आहे, आपल्या राजासाठी वाहिलं आहे अशी एकतरी व्यक्ती असेच.
तो वेळोवेळी आपल्या वागण्यातून, आपल्या चांगुलपणातून हे दाखवून देई की त्याच्यासाठी राजा, आपली प्रजा किती महत्त्वाची आहे. अकबर बिरबल, तेनालीरामन यांच्या गोष्टीतून हे आपण पाहत आलेलो आहोत. हा चांगुलपणा राजाला आवडत असे आणि साहजिक ती व्यक्ती त्याची खूप खास होऊन जाई. राजाच्या मनातही त्या माणसाविषयी आदर असे, त्याच्या शब्दाला मान असे, अटीतटीच्या प्रसंगी हीच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते असा एक विश्वास निर्माण होई.
पण हे काही लोकांना आवडत नसे, त्यांना ते सहन होत नसे. त्या माणसाचे चांगले गुण, त्यातून त्याला मिळणारा आदर ह्या गोष्टी त्यांना खपत नसत. मग त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करणे, तो कसा वाईट आहे हे राजाला पटवून देणे, गैरसमज निर्माण करणे अश्या गोष्टी केल्या जात. जिथे त्या माणसाची चांगली नाती आहेत ती बिघडवण्यावर भर असे. अर्थात या चांगल्या माणसांकडे चांगल्या स्वभावासोबतच अतिशय तीक्ष्ण अशी बुध्दी होती, ते चतुर होते त्यामुळे अशी परिस्थिती ते चांगल्या पद्धतीने हाताळत. कोणी काहीही केल तरी त्यांच्या स्वतः वरचा विश्वास डळमळीत होत नसे.
राजा राणीचा काळ गेला, त्या गोष्टी जरी आता जुन्या झाल्या असल्या तरी त्यातली माणसं मात्र अजूनही आपल्याला दिसून येतात. प्रत्येक काळात अशी माणसं असतातच. नाण्याच्या दोन बाजू असतात तशी चांगली, वाईट दोन्ही पद्धतीची माणसं असतात. काळानुसार माणसाचे चेहरे बदलतील, पण स्वभाव मात्र दिसून येतात. आणि परत इतिहासाची पुनरावृत्ती होते.
एखादा माणूस चांगला असला, तर ते अनेकांना आवडत नाही. त्यांना हे चांगले गुण सहनच होत नाहीत. कारण अगदी स्पष्ट असत. चांगल्या स्वभावाची माणसं इतरांना हवी हवीशी असतात. इतरांशी त्यांचे संबंध चांगले असतात. आणि हेच तर नको असत. त्यामुळे या माणसाला कसं चुकीचं ठरवता येईल, याचं मोरल डाऊन कसं करता येईल अश्या गोष्टी करण्यावर अनेकांचा भर असतो.
अकबरसारखी हुशार लोक ही परिस्थिती हाताळतात. पण हे सर्वांना जमत नाही. चांगल्या मनाची माणसं ही तितकीच निरागस असतात. त्यांना हे डाव पेच, छक्के पंजे समजत नसतात आणि नीट हाताळता येत नसतात. त्यामुळे ज्या व्यक्ती त्यांच्या विरुध्द काहीतरी करत असतात, त्यांच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करतात तेव्हा अनेक गोंधळ निर्माण होतो.
जसं की स्वतः वर शंका घेणे, आत्मविश्वास कमी होणे. माझीच काही चूक असेल का? मी इतकं चांगल वागून अस होत आहे म्हणजे मी कमी पडत आहे का असे विचार येऊन वाईट वाटत. या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण काही उपाय केले पाहिजेत. जाणीवपूर्वक यावर विचार केला पाहिजे. ते उपाय कोणते ते पाहू:
१. सर्वात आधी आणि महत्त्वाचं म्हणजे, आपला स्वतःवर असलेला विश्वास कोणत्याही परिस्थिती मध्ये कमी होऊ द्यायचा नाही. आपलं मन जर स्वच्छ असेल, निर्मळ असेल तर कोणी कितीही समस्या निर्माण करुदेत आपण त्यातून बाहेर पाडू शकतो. जर आपलं व्यक्तित्व खराब करण्यासाठी काही केल जात असेल, दुसऱ्यांच्या नजरेत आपल्याला चुकीचं ठरवलं जात असेल तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारण्याआधी आपण स्वतः ला हा प्रश्न विचारला पाहिजे की “मी खरच अस करू शकतो का?” आपला आपल्यावर विश्वास असला तर आपण दुसऱ्याला ते पटवून देऊ शकतो.
२. जी लोक फक्त आपलं वाईट चिंततात, ज्यांना आपलं चांगल असण पटत नाही त्यांना आपल्या आयुष्यात आपण महत्त्व देण्याचं, त्यांच्या वागण्या बोलण्याला गृहीत धरून त्यानुसर वागण्याची काही गरज नसते. आपल्या आयुष्यात जर ते काही मोल देत नसतील तर त्यांचं वागणं ही मनाला लावून घेण्यात अर्थ नसतो. त्यामुळे अश्या माणसांना महत्त्व न देणे, त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे योग्य.
३. गप्प बसू नका, स्वतःसाठी लढायला शिका. चांगल्या लोकांची ही एक कमजोरी असते की ते गप्प बसण्यावर जास्त भर देतात. त्यांना कोणत्याही वादात पडायचे नसते. वाद करण हे योग्य नाहीच आहे. पण स्वतःसाठी बोलण म्हणजे वाद करण असत नाही. आपलं शांत बसणच अश्या लोकांना अजून काहितरी चुकीचं करण्यासाठी प्रोत्साहन देत असत.
अस जर व्हायला नको असेल तर आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी आपली बाजू मांडली पाहिजे. मी कसा आहे हे सर्वांना माहीत आहे अस जरी आपल्याला वाटत असले तरी आपण बोलल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही की परिस्थिती काय आहे. त्यामुळे कोणी दुसरं आपल्यासाठी बोलेल ही अपेक्षा करण्याहून आपण स्वतः बोललं पाहिजे.
४. माणसं ओळखायला शिका. आपण कितीही शिकलो तरी अनुभव हाच आपला गुरु असतो. आपल्याला जे अनुभव येतात त्यातून आपण शिकत जायचं असत. त्यामुळे असे जेव्हा अनुभव येतील. त्यातून आता काय काय गोंधळ निर्माण झाला हे समजेल त्या आधारावर पुढे माणसं पारखायला शिका. चांगल असण वाईट नाही, पण कोणाशी किती चांगल वागायचं, समोरची व्यक्ती चांगली वागते म्हणून ती खरच तशी आहे का हे नीट ओळखून घ्या. कोणालाही स्वतःचा फायदा घेऊ देऊ नका.
हे असे उपाय करून अश्या लोकांना आणि अश्या परिस्थितीला हाताळू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
