काळजी काहीच नसते, तरीही काही व्यक्ती ‘मला खूपच काळजी आहे’ असं का दाखवतात?
गीतांजली जगदाळे
शुभमच नुकतंच लग्न झालं होतं. तसं लव्ह मॅरेज नसलं तरी अरेंज ही म्हणता येणार नाही. कारण मुलगी त्याच्या परिचयाचीच होती, त्याच्या बाबांच्या मित्राची मुलगी. तसे बऱ्यापैकी एकमेकांना ओळखायचे ते. दोन्ही कुटुंबामध्ये चांगले घनिष्ट असे संबंध अगदी पहिल्यापासूनच होते. पण तसं बघायला गेलं तर दोन्ही कुटुंबं एकमेकांपासून फार म्हणजे फार वेगळी होती. तन्वी ही शुभमची बायको. दोघे ही एकदम वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले.
शुभमच्या घरचे एकदम इमोशनल, घरात थोडं-फार तणावाचं वातावरण, अति शिस्त,तेच तन्वी च्या घरचं वातावरण याहून पूर्ण वेगळं म्हणजेच तिच्या घरी एकदम मोकळं वातावरण, ज्याचे -त्याचे निर्णय ज्याला -त्याला घेण्याचं स्वातंत्र्य आणि घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण. त्यामुळे आई बाबा यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आणि त्यांच्याशी मस्त मैत्री. शुभमच्या घरात खूप गोष्टी मोकळेपणाने बोलता येत नसतं. तेच तन्वीच्या घरात सगळ्या गोष्टी आई-बाबा दोघांना विश्वासात घेऊन अगदी सहजरित्या करता यायच्या.
पण जेव्हा तन्वी शुभमच्या घरी लग्न होऊन गेली तेव्हा काही दिवसांनी नेहमीची माहितीतीलच माणसं तिला वेगळीच वाटू लागली. शुभम आणि त्याच्या घरच्यांना देखील तन्वी थोडी प्रॅक्टिकल वाटू लागली. तेच तन्वीला शुभम आणि त्याच्या घरचे अगदी लहानशा गोष्टी सुद्धा खूप सिरिअसली घेऊन स्वतःला त्रास करून घेत असल्याचं वाटायला लागलं. पण आता आपलंच घर, आपलंच कुटुंबं, आपली माणसं म्हणून तिने सगळं स्वीकारून त्यांना आपलंस करून घेतलं.
शुभमच्या बाबांना मधुमेहाचा आजार होता. आता तुम्ही सांगा कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास त्याची पथ्य पाळणं, योग्य ते उपचार घेणं आणि योग्य तो व्यायाम करणं महत्वाचा की फक्त त्या आजारी माणसाला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे भासवण महत्वाचं? मला तरी वाटत जेव्हा आपण आपल्या माणसाची मनापासून काळजी घेतो, त्याला हवं नको ते बघतो तेव्हा आपलं प्रेम नक्कीच त्याच्यापर्यंत पोहचत असतं. कारण नुसतं मनात प्रेम आहे पण तुम्ही तो माणूस बरा व्हावा , नीट जगावा यासाठी काहीच करत नसताल तर त्या प्रेमाचा काय उपयोग? मग खरंच प्रेम आहे का असाही प्रश्न पडायला लागतो. तर इतकी वर्ष शुभम त्याच्या बाबांचा दवाखाना , औषध-पाणी सगळं नीट बघत होताच.
पण त्याबरोबरच त्याच्या बाबांना योग्य ते पथ्य पाळण्याची आणि थोड्या शारीरिक हालचालींची देखील आवश्यकता होती हे त्यांनी कधी लक्षात घेतलं नाही. शुभमच्या आईने ना कधी त्यांच्या गोड खाण्यावर लक्ष दिलं, ना त्यांना गरजेच्या गोष्टी जस की कारलं, जांभूळ खाण्यात यावं याकडे कधी लक्ष दिलं. मात्र मला यांची खूप काळजी आणि यांच्या आजारपणामुळे कसं टेन्शन येत हे बोलायच्या त्या कधीच विसरल्या नाहीत . आता याचा अर्थ असा नव्हता की त्यांचं त्यांच्या नवऱ्यावर प्रेम नव्हतं.
प्रेम नक्कीच होतं पण आहे त्यापेक्षा दिखावा करणं किंवा सतत किती प्रेम आहे , किती काळजी आहे हे भासवण, बोलून दाखवणं हा त्यांच्या स्वभावाचा भागच होता किंवा ते कदाचित त्यांना जास्त महत्वाचं वाटलं असावं.
पण तेच तन्वी आल्यानंतर आपल्या सासऱ्यांच्या औषध पाण्याबरोबरच सगळ्या पथ्यांची काळजी ती घ्यायला लागली, अगदी आपल्या बाबांसारखे आहेत असं समजून त्यांना रोज सकाळी मॉर्निंग वॉकला न्यायला लागली. तन्वीचा स्वभाव तिच्या घरच्यांप्रमाणेच कृतीतून भावना व्यक्त करण्याचा होता. म्हणजे प्रेम, काळजी हे बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून अगदी सहजतेने जाणवायचं. पण शुभमला या सगळ्याची सवय नसल्याने त्याला तन्वीचा स्वभाव अगदी कोरडा, रुक्ष वाटायचा. आता ज्या घरात प्रेम , काळजी हे कृतीतून, त्या माणसाच्या गरजा पूर्ण करून किंवा त्या माणसाला मदत करून न दाखवता फक्त शब्दातून मला तुझी खूप काळजी आहे असं दाखवलं जात तिथे त्याला हा अचानक झालेला बदल कसा काय स्वीकार असणार?
मुळातच शुभमला स्वतः ला सुद्धा कधीच वाटलं नाही की, आपल्याला ज्या माणसाबद्दल प्रेम आणि काळजी वाटते त्या माणसासाठी वेळ काढणं, त्याची काळजी घेणं, त्याच्या मतांचा आदर करणं, त्याला समजून घेणं, कधी चुकलंच तर त्या चुका कधी पोटात घालणं, तर कधी हक्काने त्या माणसाला रागावणं इत्यादी गोष्टीतून खरं प्रेम व्यक्त होतं असतं ना की फक्त प्रेम आहे, काळजी आहे म्हणल्याने ते सिद्ध होतं असतं.
आता वरील उदाहरणावरून आपल्या एक लक्षात येईल की काही लोकांचा स्वभाव अगदी असाच असतो, ते बोलताना खूप वेळा प्रेम आहे, काळजी आहे असा दावा करतात पण आपल्याला खूप वेळा त्याबद्दल शंका येते. आता काही लोक खोटं सांगतात यात काहीच शंका नाही. आपल्या फायद्यासाठी लोक काय भासवतील याची guarantee देता येत नाही. समोरच्याच्या मनात आपल्या बद्दल किती सहजतेने आपुलकी आणि विश्वास निर्माण होते, जर त्याला कळलं की आपल्या मनात त्याच्याबद्दल काळजी आहे.
आणि जर समोरच्याचा मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला तर आपल्याला त्या विश्वासाचा काहीतरी फायदा करून घेणं किती सोप्प आहे हे त्या माणसांना अगदी नीट माहित असतं आणि त्यामुळेच काळजी नसताना ही सतत ती असल्याचा ते दावा करत राहतात. कारण विश्वासाशिवाय फसवणूक करणं , गैरफायदा घेणं जवळजवळ अशक्यचं असतं. पण वरील उदाहरणाप्रमाणे, शुभमच्या आईसारखी ही काही लोकं असतात जी खरं प्रेम आणि काळजी करत असतात पण ते त्यांना बोलून दाखवणं जास्त महत्वाचं वाटतं. आणि त्या नादात जे करण्याची गरज असते ते राहजंच जातं.
आणि खरं सांगायचं तर त्यात त्यांचीही काही चूक नाहीए. आपण माणसे आहोतच अशी की तोंडाने ओरडून सांगितल्यावर आपला खूप वेळा विश्वास बसत असतो. जितक्या वेळा आपलं समोरच्याच्या बोलण्याकडे लक्ष असतं तेवढं लक्ष आपलं त्याच्या कृतीकडे कधीच देत नाही. जेव्हा आपल्याला त्याच्या बोलण्याचा संशय येऊ लागतो त्याक्षणी मात्र आपण त्याच्या कृतीचं निरीक्षण करायला लागतो. त्यामुळे कदाचित मानवी स्वभावानुसार शुभमच्या आईला सुद्धा तेच महत्वाचं वाटलं असेल.
प्रेम किंवा काळजी फक्त आहे असं बोलून दाखवणं उपयोगाचं नसतं, ते आपल्या कृतीतून ही दिसणं, जाणवणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्हीच विचार करा ना , समजा तुमच्याकडे एक कुत्र्याचं पिल्लू आहे. तुम्ही येता-जाता त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्याची खूप काळजी आहे असं म्हणत राहता. पण तुमच्या schedule नुसार तुम्ही त्याला थोडा ही वेळ देत नाही, त्याच्यापाशी बसून बोलत नाही, त्याला खायला टाकायला तुम्हाला वेळ नसतो, जमेल तेव्हा तुम्ही त्याच्या गरजांकडे लक्ष देता , त्याला बर नसेल तर वेळीच क्लिनिक मध्ये देखील तुम्ही त्याला घेऊन जात नसताल अगदी सगळं तुमच्या सोयीनुसार चालू असेल तर खरंच तुमचं प्रेम आहे का हो त्या पिल्लावर? आणि जरी असलं तरी त्या प्रेमाचा, त्या काळजीचा त्या पिल्लाला काहीतरी उपयोग आहे का?
प्रेम आणि काळजी जस बोलून दाखवणं महत्वाचं तसेच कृतीतून ही जाणवणं महत्वाचं आहे. या दोन्हीपैकी काहीही एक मिस असेल तरी समोरच्या माणसाला त्याचा doubt यायला लागतो. त्यामुळे भावना कोणतीही असो जेव्हा ती मनात असते तेव्हा कृतीतून ही ती दिसल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळेच असं म्हणतात की, ‘ ACTIONS SPEAKS LOUDER THAN WORDS’.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
