काळजी करू नको म्हणणारेच जेव्हा अतिकाळजीत टाकतात..
मेराज बागवान
‘काळजी’ ही अशी गोष्ट आहे , ज्या मध्ये सर्व काही समावलेले असते. काळजी म्हणजे, आपुलकी, आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम. जेव्हा एखादी व्यक्ती आपली काळजी घेते, किंवा आपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो तेव्हा आपल्यासाठी आणि आपण कुणासाठी तरी आहोत हेच जणू त्यातून दिसून येत असते. काही जण असे असतात की ते आपल्याला सदैव म्हणत असतात , ‘मी आहे ना, मग कसली काळजी ,तू अजिबात काळजी करू नकोस’ . असे लोक, व्यक्ती नेहमी इतरांना मदत करीत असतात, आपुलकीने चौकशी करीत असतात आणि इतरांची नेहमी काळजी घेत असतात .पण ते जेव्हा इतरांची काळजी घेत असतात, तेव्हा दुसरीकडे ते असेही वागत असतात, ज्यामुळे आपण अतिकाळजीत पडतो.
जसे की , घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री, ते सदैव आपल्या कुटुंबियांसाठी दिन-रात झटत असतात.त्यांच्या इचछा-आकांक्षा , स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात.कोणी आजारी पडले तर , त्यांची खूप काळजी घेत असतात. आणि शेवटी, “काळजी करू नकोस, मी आहे खंबीर” असे म्हणत असतात, दाखवत असतात.पण कधी असे ही होते, हीच ‘काळजी करू नकोस’ म्हणणाऱ्या व्यक्ती , अचानक शांत होतात, कोणाशी मोकळेपणाने बोलत नाहीत, आतल्या आत सर्व गोष्टी दाबून ठेवतात आणि मग इतरांना मात्र ‘अतिकाळजीत’ टाकतात.कधी विचारले तर म्हणतात, “काही नाही, कुठे काय तेव्हा, मी असाच आहे, त्यात काय वेगळे” आणि आपल्या कुटुंबियांना मात्र पुन्हा काळजीत पाडत असतात.
मग कधी, अशा व्यक्ती खूप हसतात आणि दाखवतात की मला काहीच अडचण नाही, मी खूप ‘स्ट्रॉंग’ आहे. मग त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मात्र प्रश्न पडतो, ही अशी का करते आहे, हा असा का वागतोय? .काही विचारायला गेले तर , काहीतरी विनोद करून आपले बोलणे उधळून लावतात आणि जणू जीवाला घोर लावतात.
अशा सर्व व्यक्ती आपल्या अगदी जवळच्या असतात. मग त्या घरातील असतील, कार्यालयातील असतील किंवा मित्र-परिवार असेल. जेव्हा आपल्याला एखादी समस्या असते आणि आपण अशा व्यक्तींशी बोलतो तेव्हा ते म्हणतात, “सर्व काही छान होईल, काळजी करू नकोस.” पण दुसऱ्या क्षणी ते स्वतःच इतक्या अडचणीत असतात की , कधी कधी आपण आपल्या समस्या विसरून जातो आणि ह्या व्यक्तींच्याच काळजीत पडतो.
कधी घरातील व्यक्ती , कुटुंबियातील कोणी संध्याकाळी लवकर घरी आले नाही तर काळजी करीत बसतात आणि घरी आल्यानंतर त्यांची चांगलीच खरडपट्टी घेतात. पण कधी कधी हीच मंडळी , संध्याकाळी खूप उशीर झाला तरी घरी लवकर परतत नाहीत. आणि आपल्याला अतिकाळजीत टाकतात.हे झाले एक साधे उदाहरण , पण अशा अनेक घटना घडत असतात ज्यामध्ये, आपण अशा व्यक्तिंच्या काही वर्तनातून अतिकाळजीत पडतो.
काही व्यक्ती इतरांना खूप प्रोत्साहन देत असतात. सदैव सकारात्मक बोलत असतात ,त्यांच्या बोलण्याने जणू इतरांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आणि अशा सर्व प्रकारे ह्या व्यक्ती इतरांची नेहमी काळजी घेत असतात. पण दुसरीकडे, त्यांच्या मनात एक खूप मोठा गोंधळ सुरू असतो. मन त्यांचे विचलित होत असते. स्वतः ते खूप अडचणीत असतात. पण बोलून काही दाखवत नाहीत. आणि जेव्हा कधी आपल्याला कळते की , ही व्यक्ती खूप समस्यांमध्ये अडकली आहे तेव्हा आपल्या पायाखालची जमीनच जणू सरकते आणि आपण अतिकाळजीत पडतो.
जेव्हा जेव्हा काळजी करण्याऱ्या व्यक्तीच अतिकाळजीत टाकतात, तेव्हा खरेच समजत नाही की , हे काय चालले आहे. आपणच द्विधा मनस्थितीत अडकतो. कधी ह्या व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत तर कधी मनाची पर्वा करीत नाहीत. इतरांच्या आरोग्याची काळजी करता करता, इतरांचे मन जपत त्यांची काळजी घेत घेत स्वतःला मात्र पार विसरून जातात.आणि जवळच्या माणसांना देखील ते हे कधी जाणवू देत नाहीत. इतरांना त्रास नको म्हणून ते शांत बसतात , पण शेवटी आपल्याला काळजीत टाकतातच.
प्रत्येक व्यक्ती वरून दिसते तशी असतेच असे नाही.त्या व्यक्तीच्या मनात काय वादळ उठले आहे याची कल्पना देखील कित्येक वेळा आपण करू शकत नाही. म्हणूनच इतकेच सांगावेसे वाटते, कोणाला तरी ‘अति काळजीत’ टाकण्यापेक्षा, मनमोकळेपणाने बोलूयात, मन मोकळे करूयात. आणि अति काळजी करण्याऐवजी, “काळजी घेऊयात, आणि काळजी घेऊ देवुयात”.जेणेकरून , सर्वत्र प्रेम ,आपुलकी आणि फक्त सकारात्मकता पसरेल.
धन्यवाद !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


