Skip to content

“काल पर्यंत मी तेच तेच आयुष्य जगत होतो, आज नेमका जगण्याचा सूर गवसला.”

“काल पर्यंत मी तेच तेच आयुष्य जगत होतो, आज नेमका जगण्याचा सूर गवसला.”


मधुश्री देशपांडे गानू


कांटो से खींच के आंचल

तोड़ के बंधन बांधी पायल

कोई ना रोको दिल की उड़ान को

दिल वो चला……

आज फिर जीने की तमन्ना हैं

आज फिर मरने का इरादा हैं…

अगदी चपखल गाणं आहे ना आजच्या लेखा साठी! अगदी मनासारखे जीवन जगायला मिळाले, छोटीशी आशा का असेना तरीही माणसाला जगण्याचा नेमका सूर गवसतो. अर्थात याची जाणीव मात्र व्हायला लागते. नाहीतर सरधोपट, रूटीन आयुष्य आपण सगळे जगत असतो. रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो. हे ऋतू चक्र अव्याहत चालूच असतं. आणि आपण त्याचाच एक भाग असतो ना!

मनुष्यजन्म मिळणं ही एक पर्वणी वाटते मला. अत्यंत प्रगत बुद्धिमत्ता, वाणीची देणगी, अगणित गोष्टी साकारण्याचे कौशल्य फक्त मानवात आहे. आपण फक्त जन्माला आलो, वाढलो, जगरहाटी प्रमाणे शिक्षण-नोकरी-लग्न-मुलं-संसार-निवृत्ती आणि आपला कार्यभाग संपला. एवढेच आणि इतकंच जीवनाचे ध्येय नसतं माणसाचं. नक्कीच त्याच्या जन्माला एक नेमका हेतू, एक कारण, एक साध्य असतं.

पण टिपिकल समाज रचना, कौटुंबिक, सामाजिक संस्कार यामुळे आपण त्याच मळलेल्या वाटेवर चालत राहतो. आपली आवड, आपला छंद, खरंच आपल्याला नेमकं काय आवडतंय हेच लक्षात येत नाही. आणि हा सारासार विचार करण्याची संधीही बऱ्याच जणांना मिळत नाही. परिस्थिती, वास्तवाचे चटके, एखादी घटना आयुष्याची दिशाच बदलून टाकतात. मग मनातलं मनापासून हवं असलेलं सगळं मागे टाकून मळलेली वाटच निवडावी लागते. तोच वास्तववादी निर्णय असतो.

आज अनेक डॉक्टर , इंजिनियर झालेल्या मुलांची खरी आवड नक्कीच वेगळी असेल. पण पालकांचा दबाव, पालकांच्या प्रचंड अपेक्षा, पैसा हेच सर्वस्व मानणारा समाज, कधी भिडस्तपणा या सगळ्यांमुळे आपली आवड मारून हेच हमखास यशस्वी मार्ग मुलं निवडतात. सगळे मिळते पैसा, मान, यश, स्थिरता पण मनातल्या खर्या इच्छा मारूनच. आणि मग हेच खरे आयुष्य अशी मनाची समजूत घालून टाकतो आपण.

कालच श्री. कपिल देव यांची मुलाखत पाहिली. ते म्हणाले की आई-वडिलांना वाटायचं याने बँक, रेल्वे मध्ये सरकारी नोकरी करावी. म्हणजे आयुष्य सुरक्षित होईल. लग्नासाठी मुलीकडचे विचारत,” क्रिकेट खेळतो ते ठीक आहे पण जगण्यासाठी काय करतो??” अशा परिस्थितीतही त्यांनी तेच-तेच करण्याचं निश्चयाने टाळलं. आणि स्वतःचं पहिलं प्रेम क्रिकेट याला सर्वस्व वाहून घेतलं. त्यांना तर त्यांच्या जगण्याच्या योग्य वेळीच, योग्य वयात त्यांचा नेमका सूर गवसला. सरधोपट मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. म्हणून भारताला सर्वात प्रथम विश्वचषक त्यांनी मिळवून दिला. आज संपूर्ण देशाला अत्यंत अभिमान आहे या महान व्यक्तिमत्त्वाचा.

आज अनेक स्त्री-पुरुष रोज तेच-तेच रुटीन जीवन जगत आहेत. नोकरी, घरकाम, मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न. यामध्ये दिवस, वर्षं कशी सरतात ते कळतही नाही. पण तरीही मला असं वाटतं की जर तुमची खरंच इच्छा असेल, passion असेल तर तुम्हीं कोणत्याही वयात तुमच्या जीवनाचा नेमका सूर पकडू शकता. तो तुमच्यातच लपलेला असतो. फक्त तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असते.

आज ८० वर्षांच्या आजी अतिशय उत्तम भरतनाट्यम करतात, हे आपण पाहतोयं. कितीतरी अशिक्षित स्त्रिया आज मध्यम वयातही स्वतःचा छोटासा पण यशस्वी उद्योग चालवत आहेत.

आमचे एक स्नेही आहेत. रिलायन्स समूहातील घसघशीत पगाराची नोकरी सोडून ऐन पस्तिशीत त्यांनी Agro-tourism वर आधारित शेती आणि रिसॉर्ट सुरू केलं. त्याचबरोबर शेळीपालन, गोशाळा अशी जोड दिली. ऑरगॅनिक पद्धतीने अत्यंत उत्तम शेती आज ते करत आहेत. आज यशस्वी आणि नेमका सूर गवसल्यामुळे आनंदी आणि समाधानी आहेत.

स्वतःची स्वप्नं, आवड, छंद जोपासणं आणि त्याचाच व्यवसाय करणं म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणं यासाठी अंगी धाडस असावं लागतं. समाजात फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि नऊ ते पाच नोकरी करणाऱ्यांनाच मान आहे. तुम्हीं काहीतरी वेगळा मार्ग चोखाळत असाल तर तुमच्याकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते.

पण “आपला नेमका सूर गवसायला हवा असेल तर फक्त स्वत:वरच लक्ष केंद्रित करायचं.” “लोक काय म्हणतील?” हे आपल्यासाठी अस्तित्वातच नसतं ना! आणि तुमचा हा नेमका सूर तुम्हाला गवसला ना की त्याचा सारखा आनंदाचा क्षण दुसरा कुठला नाही. स्वतःचे आत्मभान येणे, स्वत्वाची जाणीव होणे यासारखं काहीच नाही. आणि मग तुम्हीं त्या नेमक्या सूराने भारले जाता. आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करता. मग तुम्ही स्वतःची कोणाशीही तुलना करत नाही.

“Law Of Attraction” आता तर सर्वांनाच माहित आहे. तुम्हीं जितका सातत्याने सकारात्मक विचार स्वतःसाठी कराल, तो साकार होण्यासाठी सृष्टीतील ऊर्जा तुम्हांला मदत करते. फक्त हा विचार, हा सूर नेमका आणि वास्तववादी हवा.

चला.. तर मग आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणताही नकारात्मक विचार न करता, फक्त सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिका. आणि नक्कीच तुमची इच्छा, स्वप्नं, तुमची आवड, तुमचा  नेमका सूर तुम्हांला सापडेल याची खात्री आहे. सर्व सूज्ञ वाचकांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““काल पर्यंत मी तेच तेच आयुष्य जगत होतो, आज नेमका जगण्याचा सूर गवसला.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!