Skip to content

“कर्तव्याचा हिशोब मांडणारी कुटुंबे उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.”

“कर्तव्याचा हिशोब मांडणारी कुटुंबे उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.”


मधुश्री देशपांडे गानू


“कुटुंब” म्हणजे परस्परांशी नात्याने बांधल्या गेलेल्या माणसांचा समूह. आपण जन्माला येतो तेव्हा आपसूकच आपल्याला काही प्राथमिक नाती मिळतात. लग्नानंतरही आपल्याला अनेक नाती मिळतात. एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब अशा कुटुंब संस्था आपल्याकडे अस्तित्वात आहेत. आई-वडील, बहीण-भाऊ हे आपले प्राथमिक नातेवाईक. आपण कोणत्याही कुटुंब पद्धतीत राहत असलो तरीही कुटूंबातील सदस्यांमध्ये सलोखा, सौहार्दता, प्रेम, विश्वास असणे फारच महत्त्वाचं आहे. कोणतीही कुटुंबसंस्था यानेच टिकून राहते.

कुटुंबात जेवढे सदस्य असतील त्या प्रत्येकाचीच स्वतःप्रति आणि कुटुंबाप्रती काही ठराविक कर्तव्यं असतात. आपण काही परिपूर्ण नसतो. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात गुणदोष आपल्या सगळ्यांमध्ये असतातच. ते स्वीकारून आपण आपली कौटुंबिक नाती जपत असतो. आणि या अपूर्णतेतही आपली कर्तव्यं चोख बजावण्यासाठी प्रयत्नशील असतो. अगदी ढोबळमानाने आई म्हटलं की आपल्याला घरकाम, स्वयंपाक आठवतो. बाबा म्हटलं की नोकरी व्यवसाय करून अर्थार्जनाचं कर्तव्य आठवतं. मुलं-मुली म्हणजे योग्य वयात योग्य ज्ञानार्जन आठवतं.

अशी मुख्य कर्तव्यं आपण पाहत असतो. आता काळ बदलत आहे. आई-वडील दोघेही अर्थार्जनाचे मुख्य कर्तव्य बरोबरीने बजावत असतात. आणि घरातील कामं ही सर्व कुटुंबातील सदस्य वाटून घेतात. घ्यायला हवीत. आता जसं आपल्या मुलीला तिने आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं म्हणून उच्च शिक्षण देतो त्याचप्रमाणे मुलालाही स्वयंपाक शिकवायला हवा. लिंगभेद न करता, “घर सगळ्यांचं आहे मग घरातील कामं ही सगळ्यांची आहेत” ही भावना हवी.

पण खरंच वास्तवात असं होतं का?? एक जरी व्यक्ती तिच्या कर्तव्याचा सतत डंका पिटत असेल तर?? सतत माझ्यामुळे तुम्हीं आहात ही भावना जोपासत असेल तर?? घरातील इतर सदस्यांना न्यूनपणाची जाणीव देत असेल तर??

अशी कितीतरी कुटुंब आपण आसपास पाहतो. अशा कुटुंबांमध्ये एकोपा नसतो. असमाधान अन्यायाची भावना असते.

अतिशय उच्चशिक्षित कुटुंब. सुशिक्षित आणि सुसंस्कृत. आई-वडील दोघेही नोकरीत उच्चपदस्थ. घरात दोन मुलगे, दोन सुना, दोन नातू. समाजाच्या दृष्टीने अतिशय सुखवस्तू आणि समाधानी दिसणारं कुटुंब. पण आई-वडील दोघेही प्रचंड हेकेखोर आणि अहंकारी. “फक्त आम्हांलाच अक्कल आहे आणि हे आमचं घर आहे.

आमच्या घरात तुम्ही राहात आहात, त्यामुळे आम्ही सांगू ते प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे” हा हट्ट. कोणताही निर्णय हे दोघे परस्पर घेणार आणि बाकी सदस्यांनी तो ऐकलाच पाहिजे ही अट. “तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही”  हा हेका. बाहेरून आलेल्या सुना हे सतत कसं सहन करणार? नातवंडं कसं सहन करणार? येता जाता स्वतःच्या कर्तव्याची टिमकी वाजवणार. आर्थिक नाड्या ही यांच्या हातात. कोणीही पैसा कमावला तरी यांनाच द्यायचा.

स्वतःसाठी काही ठेवायचं नाही. घरातील सदस्यांना स्वतःसाठी हौसमौज करण्याची परवानगी नाही. अशा भयंकर परिस्थितीत कुटुंबात काय समाधान आणि शांतता नांदणार??  सुनांना फक्त कामासाठी आणल्यासारखे वागवायचं. मुलांना बोलायची मुभा नाही. सतत घालून पाडून बोलायचं. अशा कुटुंबात शेवटी व्हायचं तेच झालं. मुलं सरळ वेगळी झाली. आई वडील म्हातारपणी एकटे पडले. कर्तव्य म्हणून सुनांनी त्यांचं म्हातारपण सांभाळलं.

पण त्यात ओलावा, माया कुठेही नव्हती. फक्त समाजाच्या भीडेखातर सुनांनी आपलं कर्तव्य कोरडेपणाने पार पाडलं. नातवंडांचे प्रेम, सुख कधीच लाभलं नाही. तुम्ही प्रेम लावलं नाही तर तुम्हांला प्रेम कसं मिळणार?? म्हणूनच हल्ली वृद्धाश्रम भरून वाहत आहेत. एका हाताने टाळी वाजत नाही. दोन्हींकडे चुका असतातच.

थोड्याफार फरकाने अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. लग्न झाल्यावर सासू सुनेला सतत स्वतःच्या कर्तव्याचा पाढा वाचून दाखवते. घरातील कोणी एक सदस्य दुसऱ्या सदस्याला सतत हीन वागणूक देतो. यामुळे नातेसंबंध कायमचे दूरावतात, तुटतात. मग नातं कोणतंही असो.

खरंतर कुटुंब छोटे असो वा मोठे, प्रत्येक जण आपापल्या परीने कुटुंबासाठी काहीतरी हातभार लावत असतो. आणि प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजता येत. त्यावरून तर आपल्या माणसाची कधीच किंमत करू नये. अशाने सतत घरात कुरबुरी, वाद, भांडणं, चिडचिड, रुसवे-फुगवे होत राहतात. संपूर्ण घरावर एक उदासपणा व्यापून राहतो.

आज काल नवरा-बायको हेही नातं तकलादू झालंय. दोघेही करिअर ओरिएंटेड. उशिरा लग्न होतात म्हणून मतही ठाम. स्वतःचा अहंकार कुरवाळणारे नवरा-बायको सतत एकमेकांना स्वतःच्या कर्तव्याची, श्रेष्ठतेची आठवण करून देतात. स्पर्धा असल्याप्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढतात. सामंजस्य, संयम, प्रेम, विश्वास, आदर या सगळ्याचा अभाव. यामुळे लग्नं टिकतात कमी आणि मोडतात जास्त…

आज लग्नसंस्था, कुटुंबसंस्था खिळखिळी व्हायला हा मीपणा, अहंकारी वृत्ती, कर्तव्याचा सतत ढोल बडवणे हेच जास्त कारणीभूत आहे. अशा कुटुंबातील अशांततेमुळे बाहेरील माणसं याचा गैरफायदा घेतात. तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ शकते, कारण कुटुंबातील व्यक्तींवर विश्वास नसतो.

एकत्र असो वा विभक्त कुटुंब संस्था नीट टिकवायची असेल तर कुटुंबात एकसूत्रता, एकोपा, प्रेम, परस्परांवर विश्वास असायलाच हवा. दुनियेच्या कोलाहलात स्पर्धेत जर मी हरले/ हरलो, अयशस्वी झाले/ झालो तर माझं कुटुंब मला समजून घेईल हा विश्वास असणं आज खूप गरजेचं आहे. नाहीतर छोट्याशा अपयशानेही आजची तरुण पिढी नैराश्याच्या गर्तेत जात आहे.

आत्महत्या स्वस्त झाल्या आहेत. सतत स्वतःच्या कर्तव्याचा डंका न वाजवता स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना मानाने, प्रेमाने वागवा. आणि “एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे आपलं कुटुंब आनंदी, सुखी बनवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!