Skip to content

कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही.

कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये तपश्चर्या, आराधना, ध्यानधारणा यांचा खूप मोठा इतिहास आहे. यांना खूप महत्त्व आहे. अनेक ऋषीं मुनींच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. एखादी सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे ऋषी वर्षानुवर्षे तप करत आणि हे तप करावं कुठे लागे तर अरण्यात, एखाद्या गुहेमध्ये, पर्वतांवर. हे तप वाटत तितकं सोप नसे.

एकाच आसनमध्ये अनेक वर्ष बसून राहणं ही पाहायला साधं वाटलं पण ते नव्हत. आणि निसर्गाच्या सानिध्यात असताना तर अजूनच आवाहन करणार. कारण ऊन, वारा, पाऊस तसेच जंगलातील प्राणी, पक्षी या सगळ्यामध्ये स्वतःला टिकवण आपली आराधना पूर्ण करणं. मनुष्याची सहनशक्ती किती असू शकते, त्याची मर्यादा किती अफाट आहे हे सांगण्यासाठी याहून चांगलं उदाहरण कोणतं असू शकत.

भगवान महावीर, भगवान बुध्द ज्यांनी महान तत्वज्ञानाचा प्रसार केला त्यामागे देखील त्यांची दीर्घ तपश्चर्या आहे. या सर्वांना महान का मानलं जातं? कारण त्यांच्या दीर्घ तपातून त्यांनी जगाला जी अमूल्य देणगी दिली ती चिरकाल टिकणारी आहे. हे तप करताना त्यांना त्रास झाला नसेल का? नक्कीच झाला असणार.

कारण ही सर्व पण शेवटी माणसच होती. पण मग कोणती अशी गोष्ट होती ज्यातून ही मंडळी त्या उच्च अश्या आत्म वास्तविककरणाच्या टप्प्याला पोहोचली? तर ती होती त्यांची सहनशीलता. आपण आपल्याला मुंगी चावली तरी आपण रडू आल्यासारखं करतो. त्यांनी तर काय सहन केलं असेल आपलं कल्पना देखील करू शकत नाही. पण या सहनशिक्तीनेच त्यांना ते तेज मिळवून दिलं. त्यांच्यामध्ये ती अंतिरिक शांती आली.

अगदी रोजच्या जीवनातील जरी उदाहरण पाहिली तरी आपल्या हे लक्षात येईल. झोपपट्टीतील मुल, बांधकाम वरची मुल त्यांचा तर ऊन वारा, पाऊस, धूळ माती यांच्याशी जवळचा संबंध असतो. कामाच्या निमित्ताने ती सारखी फिरत असतात. जिथे जागा मिळेल तिथे राहत असतात. तरी त्यांना कधी आपण जास्त आजारी पडलेलं पाहिलं नसेल? कोणत्याही वातावरणात त्यांचा त्यांचा खेळ, बागडण चालूच असत.

याउलट आपण आपल्या मुलांना किती जपतो, बाहेर पडल्यावर काही त्रास होऊ नये म्हणून औषध तसे कपडे एक ना शंभर गोष्टी. इतकं करून मुल आजारी पडतातच. का इतका फरक जाणवतो? रस्त्यावर राहत असली तरी तीही लहान मुलचं असतात. तरी त्यांना का बर इतका त्रास जाणवत नाही? याच कारण त्यांची सहनशक्ती.

इतकी वर्ष त्या परिस्थितीत राहून त्यांची प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायची सहनशीलता वाढते. त्यांच्यात तो resiliance येतो आणि म्हणून जरी आजारी पडली तरी लगेच त्यातून बरी देखील होतात. म्हणूनच म्हटल जात की अती जपण पण नुकसानकारक ठरू शकत. कारण त्यामुळे मुलाची नवीन, त्रासदायक परिस्थितीला सामोरे जायची, त्या त्रासाशी लढण्याची सहन शक्तीच विकसित होत नाही.

जेव्हा माणूस खूप त्रास सहन करतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही आतून मजबूत होत. तसच त्या त्रासाला सामोरे जायची सहनशीलता वाढते, दुसऱ्याच्या बाबतीतील संवेदनशीलता वाढते. असा माणूस तक्रार करत नाही तर त्यातून कसा मार्ग काढायचा यावर विचार करतो. कारण जर आपण एखादी गोष्ट सहनच करू शकत नसू तर त्यातून कस बाहेर पडायचं यावर विचार तरी कसा करणार?

Rebt चे जनक अल्बर्ट एलिस यांना अगदी लहान वयातच किडणीचा आजार झाला होता. त्यानंतर ही ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. तरीही त्यांनी या गोष्टीचं कधी भांडवल केलं नाही. उलट त्यांच्या या त्रासच त्यांना ही जगविख्यात उपचारपद्धती विकसित करायला प्रेरक ठरला.
मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव ज्यांनी नटरंग सारखी कादंबरी लिहिली. त्यांची आत्मकथा नक्की वाचण्यासारखी आहे. त्या माणसाने शिक्षणासाठी बापाकडून अपरिमित मार खाल्ला. वयाच्या १५-१६व्या वर्षी ते घरातून पळून गेले फक्त शिकण्यासाठी. त्यानंतरच त्यांचं कार्य सर्वांना ठाऊक आहे.

Victor frankle ज्यांनी नाझी छळछावणीतून बाहेर पडून जगाला आपल्या अस्तीत्वाचा अर्थ कसा शोधायचा हे शिकवलं त्यांचं उदाहरण मी नेहमी देते. त्यावेळी नाझी सैनिकांनी काय केलं होत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तरीही त्यातून काही जण वाचली त्यातलेच हे एक होते. हे कशामुळे झालं? तर सहनशीलता.

ही सर्व मंडळी तक्रार करत बसली नाहीत. तर त्यातून बाहेर पडून जगालाही खूप काही शिकवून गेली. सोन जितकं तापत तितकच ते तेजस्वी होत. म्हणून आपणही जर आपली सहनशीलता वाढवली जरी त्रास होत असेल तरी तो न टाळता, त्यापासून पळून न जाता तो सहन करत त्यावर मार्ग काढला तर आपण त्या स्व च्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो आणि हेच आपलं तप असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “कमालीचा त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, त्यानंतर तो कोणाकडेही तक्रार करत नाही.”

  1. खूप छान लेख होता खूप आवडला करण मी ही त्याच परस्थीतून जात आहे बर वाटल वाचून धान्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!