कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा मिळते.
लालचंद कुवर
(उरळीकांचन) पुणे.
असं म्हणतात की, ‘ झाडं जर तोडायचीच ठरलीत तर , वेडीवाकडी , काटेरी झाडे झुडपे यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही पण कोणाच्या अध्यात मध्यात नसलेली सरळ मार्गे वाढणारी झाडे …… ! तीच आधी आणि नेहमी छाटली जातात , त्यांच्यावरच वारंवार आघात होत राहतात. ” हे दु्दैव म्हणावं की मोठी शोकांतिका !
हिच वृत्ती जळी स्थळी काष्ठी पाषाणी अर्थात अत्र तत्र सर्वत्र माणसांच्या बाबतीतही पाहायला मिळते.
आज घरादरात, समाजात अगदी कामाच्या ठिकाणी सुध्दा , जे तिरसटराव असतात, त्यांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही .
का ? चटके बसतील म्हणून !
का ? टिकाव लागणार नाही म्हणून !
का ? …….. …………. !
कदाचित असे खुप ‘ का ‘ असतील !
पण
तुम्ही सरळ मार्गी चालतायात , बस ! तुम्हालाच जास्त पळवल जाणार, अगदी दमछाक होई पर्यंत !
तुम्ही चांगलं काम करतायत ,
तर आणखी जादा काम , तुमच्याच माथी मारलं जाणारं !
तुम्ही सर्वांचं ऐकून घेतायत , तर तुम्हालाच आणखी उपदेशाचे जादा डोस पाजले जाणार !
सर्वांशी चांगले वागतायत , तर चांगुलपणाची बिदागी म्हणून तुम्हालाच अडचणीत आणलं जाईल , आणि तुमची प्रतिमा कशी मलिन होईल याची पुरेपूर दक्षताही घेतली जाईल !
तुम्ही सर्वांशी चांगलं बोलतायत , तर तुमच्याच बोलण्याचा व्यवस्थितपणे विपर्यास केला जाईल ! सत्य आणि खरं बोलण्याच साहस तुमच्या अंगी असेल, तर सत्य बोलण्याची किंमत तुम्हाला वेळोवेळी चुकवावीच लागेल !
तुम्हा कोणत्याही कामाला कधीच ‘ नाही’ म्हणत नाही, मग तुमच्याच समोर कामाचा ढीग उभा केला जाईल. तुम्हाला ‘ नाही ‘ म्हणणं जमत नाही मग औताच्या बैलाप्रमाने तुमच्याच मानेवर सदा न कदा जोखड ठेवलं जाईल.
मग प्रश्न असा निर्माण होतो की , जर पावलोपावली माझ्या चांगुलपणाची अणि सदवर्तनाची परीक्षाच समाजाकडून घेतली जाणार असेल ! आणि पारितोषिक म्हणून शिक्षाही मला मिळत असेल ! तर मग का म्हणून मी माझा चांगुलपणा टिकवुन ठेवावा ?
का ? एकदा आर या पार !
नाहीतर जशास तसे !
नाही का ! उत्तर देता येणार ?
कारण तुकाराम महाराजांनी ही त्यांच्या अभंगातूनही हेच सांगितलं आहे,
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।,”
वरील अभंगातून समाजाला हाच संदेश दिलेला आहे की , बाबांनो , वेळ पडली तर आम्ही स्वतःची लंगोटीही देऊ (इतके आम्ही उदार आहोत) पण कोणी एखादा आम्हाला फारच नेभळट समजून आमच्या लंगोटीलाच हात घालू पाहत असेल तर खबरदार – आम्ही अशा नाठाळाचे टाळके सडकायलाही कमी करणार नाही.
पण खरच , सज्जन गृहस्थ , हा नाठाळच्या माथी काठी मारु शकतो ? कदापी नाही ! कारण शेवटी संस्कार आणि जडणघडण , हेच तुमचं वर्तन अणि जीवनाची दशा व दिशा ठरवत असतात.
मग आणखी किती युगे , हा समाज चांगल्या लोकांना पिळणार आहे ?
हा, शेवटी परमेश्र्वराकडे एक प्रार्थना करु शकतो,
“नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा “.
आज जरी चांगुलपणाची कितीही शिक्षा मिळत असली ! तरी निसर्गाचा नियम आहे, तुम्ही आज काय पेरताय तेच भविष्यात उगवणार आहे . म्हणुन चांगले आचार विचार पेरत रहा. फक्त त्या चांगल्या वागण्यात अतिरेक असू नये.
कारण तुम्ही आज करत असलेल्या कर्मा वरूनच समाज तुम्हाला भविष्यात ओळखणार आहे. तीच तुमची अजरामर ओळख ठरणार आहे.
‘मरावे परि किर्ती रुपी उरावे ‘
मग कोणती” किर्ती “घेऊन , माझं समाजात अस्तित्व राहणार आहे? हे सर्वस्वी आज माझ्या हातात आहे.
म्हणुनच
किती ही बिकट परिस्थिती येवू दे. दाही दिशांनी संशय कल्लोळ माजू दे .
गड्या , हार मानू नकोस !
फक्त तुझी सद्गुणांची , सदवर्तनाची ढाल मजबुत ठेव!
शेवटच्या क्षणापर्यंत !
समाप्त
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

