Skip to content

कधी-कधी असं वाटतं बरं झालं काही लोक आपल्यापासुन दुर गेली.

कधी-कधी असं वाटतं बरं झालं काही लोक आपल्यापासुन दुर गेली.


मयुरी महेंद्र महाजन


वर्ष उलटून ,नवीन वर्ष लागले न जाणो असे, कितीतरी वर्ष मागे सरत उलटून गेलेत, काहींची साथ सरलेल्या वर्षातच सरून गेली, काही मात्र नवे चेहरे ,नवीन माणसं तितक्याच नवलाईने भेटत गेली, काही हात सुटले, म्हणून नवीनही काही जुळत जातातचं, काही रक्ताने नातेवाईक असतात, काही मात्र मनाशी जोडलेल्या आठवणीने जोडले जातात, या सर्व कारकिर्दीत बरीच लोक आपल्या पासून दूर गेलेले असतात, या सर्व जीवनाच्या रंगमंचावरती सगळीच माणसे आपल्या वाट्याला चांगली येतील, असं कधी होत नाही, कारण आपल्या वाट्याला येणाऱ्या माणसांसाठी कुठेतरी choice असला तरी प्रत्येक ठिकाणी मात्र तसाच choice नसतो ,म्हणून कारण नसताना कुणाशी तरी जुळवून घ्यावे लागते ,

जेव्हा अशी माणसं दूर जातात, तेव्हा असं वाटतं ,बरं झालं काही लोक आपल्यापासून दूर गेली, खरं तर माणूस आपल्यातून निघून जातो ना ,तेव्हा कुठे त्या माणसाची किंमत कळते ,कारण आज कालच्या फायदा तोट्याचा विचार करून नाती जपणारी माणसे भावनेने शून्य होताना दिसत आहेत , आपल्या चांगुलपणा वरती संशय घेणारी व चांगल्या गोष्टीला चांगलं न म्हणणारी माणसं पावला-पावलावर भेटतात, कारण येथे वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टीला विरोधक जास्त आहेत,

जीवनाच्या प्रवासात ज्यांच्याकडे जावेसे वाटते ,त्यांच्याकडे जायला जमत नाही, ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते, त्यांच्याकडे जावेच लागते, जी माणसे हवीशी वाटतात, ती मात्र कधी भेटत नाही ,जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही, या जीवनाच्या झगमगाटात आपण माणसे मोहात अडकलेलो आहेत, म्हणून काहीही सोडावेसे वाटत नाही,जसे की जाताना माणूस काही सोबत नेणार नाही, असं म्हणणारा माणूसच मात्र असताना काहीही सोडत नाही ,मोहमायेच्या फेर्‍यात सतत काहीतरी सुटून जाणार आहे ,आपण मात्र अडकून पडलेल्या याच भोवऱ्यात गटांगळ्या खात असतो,

प्रत्येकासाठी आपल्या माणसांचा सहवास, आपली माणसे सोबत असणं खूप गरजेचं आहे, पण त्यातही किंवा इतर ठिकाणी सर्वच मंडळी आपल्या हिताचे बघणारी असतील असे नाही,काहींचा चेहरा वेगळा आणि वागण्याचा मोहरा वेगळा असतो, अशी माणसे आपल्या मनात कपटीपणा ठेवतात ,त्यांना इतरांच्या भावनांची माणसांची कधीच किंमत नसते, आपण मात्र आपला चांगुलपणा कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी अशी माणसे त्यावर कधीच विश्वास ठेवत नाही, कारण मनी वसे तसे स्वप्नी दिसे, त्यांना मात्र जगाचे चित्र आपल्याच मनाप्रमाणे दिसत असते, त्यासाठी कधी कधी असं वाटतं बरं झालं काही लोक आपल्यापासून दूर गेली,

आपल्यापासून दूर गेलेली माणसे दूर असतानाही आपल्याला आठवतात, त्याचं कारण विशेष आहे, ते म्हणजे आपण आजही त्यांना आपली माणसं समजतो, कारण बघाना ,काय गरज आहे इतक्या कोटींच्या लोकसंख्येच्या जगात आपण आजही त्याच माणसाची आठवण काढत बसतो, कारण आजही माणसाला माणसाची आठवण येते ,त्या मध्ये माणूस जिवंत आहे, अजूनही…. माणूस कुठेतरी विकासाच्या टप्प्यावरती हरवत चाललेला आहे, घराची इमारतींची उंची वाढत चालली, परंतु माणुसकीची घटत चालली का ??हा मोठा प्रश्न आहे,

जेव्हा माणूस माणूसपणातून निघून जातो, तेव्हा तो विदारक कृत्य करायला लागतो, कधी कधी माणसे इतक्या क्रूरपणे वागताना दिसतात, की यापेक्षा प्राणी आणि पशु परवडले, असं वाटायला लागतं, इतकी माणसं बेधुंद झालेली आहेत,

दुरून डोंगर साजरे असं म्हणतात, ते या ठिकाणी लागू होते ,काही माणसे दूर असल्यावरचं चांगली वाटतात, सोबतिच्या सहवासापेक्षा त्यांच्या दूर असल्यावरच तो आभास छान वाटतो, कारण काही माणसांना पूर्णपणे जाणून घेणे ,त्यांच्या विरहाला किंवा आपल्या अपेक्षांच्या अपूर्णत्वाला ,हा तिढा सोडवायचा असेल तर काही आपल्यापासून दूर गेलेलीचं चांगली असतात….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “कधी-कधी असं वाटतं बरं झालं काही लोक आपल्यापासुन दुर गेली.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!