“कधीही आपल्या दु:खांचा बाजार मांडू नका.”
मधुश्री देशपांडे गानू
“हंसते हसते कट जाए रस्ते जिंदगी युंही चलती रहे..
खुशी मिले या गम बदलेंगे ना हम दुनिया चाहे बदलती रहें”
किती सुंदर गाणं आहे ना! अर्थ ही किती छान! सुख आणि दुःख काही वाट्याला आलं तरी आयुष्य पुढे पुढे चालतच राहतं.
मानवी जन्म आणि हे मौल्यवान आयुष्य एकदाच मिळतं. आयुष्याला सामोरं जाताना ऊन सावली सारखं सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतंच असतं. पण माणसाची मोठी गंमत आहे ना! म्हणजे ९९ आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. पण एक दुःख देणारी गोष्ट आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवत असते.
आणि आपण ती कुरवाळत बसतो. कोणी एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक गोष्ट सांगितली आपला चटकन विश्वास बसतो. पण एखाद्याचे यशस्वी होण्यामागचे सातत्य, प्रयत्न आपल्या गावीही नसतात. तो यशस्वी झाला तरी आपण पटकन विश्वास ठेवत नाही. मानवी स्वभावच आहे हा. गदिमांनी म्हणून ठेवलं आहेच “एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे”.
काही दिवसांपूर्वी एक सुंदर गोष्ट ऐकली होती. एका संग्रहालयामध्ये एक संगमरवरी सुंदर मूर्ती असते. ती पाहायला देशविदेशातले लोक येत असतात. आणि जगभर तिचं कौतुक होतं. त्याच संग्रहालयातील फरशाही संगमरवराच्या असतात. त्या फरशांना फार असूया वाटते. राग येतो. मग ते त्या मूर्तीला विचारतात.
“एकाच शिल्पकाराने एकाच डोंगरातून आणलेल्या दगडातून तुला आणि आम्हाला बनवलं. पण तुझं मात्र कौतुक! तुझं कौतुक करण्यासाठी लोक आम्हाला पायदळी तुडवून जातात. हे फार दुःखदायक आहे.” त्यावर ती मूर्ती उत्तर देते. “तुम्हांला ही मूर्ती बनवण्यासाठी आणलं होतं पण तुम्ही हातोडी आणि छन्नीचे वार झेलू शकला नाहीत. तुमचा भुगा होऊ लागला. मग तुमच्या फरश्या बनवल्या. मी हे वार सहन केले.
धैर्याने, सोशिक तेने. म्हणून मी मूर्ती झाले.” म्हणजेच दुःखाचे वार झेलूनही आपण सकारात्मकतेने, समर्थपणे त्याला सामोरे गेलो तर दुःख लवकर मागे पडतं. आणि आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्या आयुष्याला किती समर्पक आहे ही गोष्ट!
आनंदाचे, सौख्याचे, समाधानाचे क्षण जसे आपल्या जीवनात येतात तसेच प्रतिकूल परिस्थिती, दुःख, अचानक येणारे संकट यालाही आपल्याला सामोरं जावं लागतं. जो या संकटाचा धीराने सामना करतो तो यशस्वी होतो. जेवढ्या लवकर आपण दुःख आणि वास्तव स्वीकारतो तेवढे लवकर त्यातून बाहेर पडतो.
पण खूपदा असं लक्षात येतं की लोकांना आपण खूप दुःखात आहोत हे दाखवायला आवडतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळं आलबेल कधीच नसतं. काहीतरी दुःख, ताण असतोच. पण सहज वृत्ती दिसते ती दुःख कुरवाळत बसण्याची. निरीक्षणाअंती असं लक्षात येतं की दोन व्यक्ती भेटल्या तर “आयुष्य किती कठीण झालं आहे? मला किती ताण आहे? मी किती सहन करतोय. किती कंटाळा आलाय.” हेच बोलताना दिसतात. घरच्यांबद्दल सतत नकारात्मक बोलताना दिसतात. आपल्या लहानपणी आई नेहमी सांगायची “भरल्या घरात कंटाळा आला असं म्हणू नये.” किती सकारात्मक आहे हे…आपण आनंदाची देवाणघेवाण कितपत करतो?
आता सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध आहे. त्यावर बहुसंख्य लोक आपण दुःखी कष्टी असल्याचा बाजार मांडताना दिसतात. विशेषतः स्त्रिया. काही पुरुष याचा गैरफायदा घेतात. त्यांना खांदा द्यायला ते तयारच असतात. अशा आभासी नात्यांमध्ये स्त्री-पुरुष अडकतात. कधीही न पाहिलेल्या, न देखल्या माणसाच्या प्रेमात आपण कसे पडू शकतो? इतका सहज विश्वास कसा ठेवू शकतो? हा विचार त्यांच्या मनात येत नसेल??? अनेक गोष्टी शेअर केल्या जातात व वैयक्तिक माहिती दिली जाते.
यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता वाढते. अनेकदा पुरुषही आपण कसे अयशस्वी आहोत, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहोत हे मांडतात. मग आर्थिक फसवणूक होते. नंतर आलेले अनुभव याचंही विस्तृत वर्णन, आम्ही कसे फसवले गेलो हे मांडतात. पण सुरुवातीपासूनच आपण सावध का नसावे? नंतर आरडाओरडा करून काय उपयोग? पण ही वस्तुस्थिती आहे.. सगळे तसे नसतात हेही खरं आहे. प्रत्येक अनुभव वाईट असतो असं नाही. पण फसवणुकीचे प्रकार होतात.
जेव्हा आपण एखाद्या अतीव दुःखद प्रसंगातून जात असतो तेव्हा हे सगळं समजणं, सांगणं, उमजून वागणं कठीण आहे, हे मान्यच आहे. अशावेळी समाजाची कोरडी सहानुभूती मिळते. ती पण तात्पुरती. पण आपलं आयुष्य हे आपल्यालाच पुढे न्यायचं असतं. आलेल्या प्रसंगावर मात करून. कोणीही तुमच्या दुःखात भागीदार नसतं. आणि का असावं?
प्रत्येकाचा स्वतःचा असा प्रवास असतो. ती व्यक्ती ही त्याच्या सुख दुखांचा सामना करतच असते. आपल्या दुःखांचा बाजार मांडून आपण कमकुवत, दुबळे आहोत हेच आपण सिद्ध करतो. समाज कधी क्रूरही असतो मग अशा वेळी गैरफायदा घेणारे ही आजूबाजूला जमतात. गंमत बघणारे ही असतात. आपले प्रश्न हे आपणच सोडवायचे असतात. हिमतीने, संकटांशी दोन हात करून. रात्री नंतर जसा सूर्योदय होतोच तसंच दुःखा नंतर सुख येतंच. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतात. जीवन प्रवाही आहे. एके ठिकाणी थांबून, खचून चालत नाही.
आपल्याकडे एखाद्या स्त्रीचा नवरा अकाली गेला तर तिच्या दुःखाचे इतर जण भांडवल करतात. फायदा घेणारे असतातच.अशावेळी त्या स्त्रीने खंबीरपणे उभं राहायला हवं. प्रत्येक स्त्री कणखर असतेच. पण स्वतंत्र, सक्षम, समर्थ असं तिने बनायलाच हवं.
दुःखद घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलायला हवा. सकारात्मक विचार, मानसिकता तयार व्हायला हवी, घडलेल्या घटनांमधून शिकण्याची तयारी हवी. म्हणजे दुःखाची बोचणी कमी होते. ज्यांना दुःख भोगावे लागतं त्यांना यातून बाहेर पडणं खरंच कठीण वाटतं. पण प्रयत्न करायला हवेत.
सर्वात प्रथम आपले कुटुंबीय आणि मोजके विश्वासू सुहृद यांची सोबत हवी. म्हणजे बाहेर खांदा शोधायचा प्रयत्नच आपण करणार नाही. काहीवेळा घटना, प्रसंग खूप लहान असतो पण मानसिक अति ताणाने आपण ते दुःख मोठे करत असतो. मग त्यामुळे येतं नैराश्य.. त्यामुळे आपल्याला मार्ग दिसत नाही.
आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा ज्याच्याकडे तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलू शकता. म्हणजे यातून बाहेर पडायला मदत होईल. या घडणार्या घटनांची जबाबदारी आपणच घ्यावी. जे घडलं त्याचा नशिबाला, कुणा व्यक्तीला दोष देऊ नका. जितक्या लवकर तुम्ही हे स्वीकाराल तेवढ्या लवकर तुम्ही यातून बाहेर पडाल. अनेक चांगले मार्ग आहेत. ध्यानधारणा करा. एखादी तुमची आवड जोपासा. एखादा नवीन छंद लावून घ्या. कितीतरी छान गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करा आपल्या विचारांचे , कृतीचे, जीवनाचे आपणच शिल्पकार असतो हो ना….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khupach chan
💯
Khupch chan