Skip to content

कधीतरी इतरांच्याही दुःखांचा थोडा कानोसा घ्या.. नुसतं स्वतःचं रेटत बसू नका.

कधीतरी इतरांच्याही दुःखांचा थोडा कानोसा घ्या.. नुसतं स्वतःचं रेटत बसू नका.


सोनाली जे.


सोनू : अग तुझ्या ओळखीत कोणी चांगले सर्जन आहेत का ?

मनू : का ग काय झाले ?

सोनू : अग संजना आहे ना तिच्या मित्राचे वडील आजारी आहेत. अनेक चांगले नामांकित डॉक्टर झाले पण गुण नाही ग काहीच. खूप वैतागले आहेत. पैशापरी पैसा घालवून तब्येतीत काही फरक नाही ग. आज केलेल्या सोनोग्राफी मध्ये त्यांच्या आतड्याच्या layer ला सूज दिसली. त्याचे ऑपरेशन च करावे लागेल म्हणे. म्हणून विचारले कोणी आहे का ?

मेघना ला फोन केला होता ग कारण तिच्या ओळखीचे भरपूर डॉक्टर आहेत ना !! तर तिचं आपले भलतेच सुरू झाले.
मी तिला सांगायला लागले , विचारायला लागले तर मला बोलू न देताच , माझे ऐकून न घेताच, तिने आपलेच सांगायला सुरुवात केली .

मेघना सांगू लागली अग सोनू बरे झाले तू फोन केलास , काय सांगू तुला माझ्याकडे ही सासू बाईना खूप बरे नाही , अगदी झोपून आहेत बघ. रोजची औषधे , त्यांची बाई खर्च तर वाढतच चालले आहेत.

सोनू : अग मेघना पण तुझी तर सासू तुझ्याकडे नसते ना ?? ती तुझ्या दिर आणि जावे सोबत असते ना ? आणि सासू बाईना पेन्शन ही भरपूर आहे म्हणालीस ? मग तुला काय झाले असे बोलायला ग?

असाच एक दुसरा प्रसंग :

परवाच समोरच्या फ्लॅट मध्ये एक पारसनीस आजी आजोबा राहायला आले. ओळख झाली . स्वभावाने खूप छान वाटले दोघे. प्रिया आणि आणि आजी आजोबा बोलत होते आणि तेवढ्यात शेजारच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या फडके आजी आणि आजोबा बाहेर आले. तेही एकमेकांची चौकशी करू लागले तेव्हा समजले की पारसनीस आजी आजोबांचा मुलगा , सून एका accident मध्ये गेले. एक नात मात्र राहिली ती अगदी छोटी होती म्हणजे पाच वर्षांची . तेव्हापासून या आजी आजोबांनी तिला वाढविले. मोठे केले. तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या . तिचे शिक्षण पूर्ण करून चांगला जॉब मिळाला. हे सांगत असताना फडके आजी नी तिथेच थांबवत आपलेच बोलणे सुरू केले.

फडके आजी : तुम्हाला सांगते पारसनीस आजी.आम्हाला दोन मुले, दोन सूना , चार नातवंडे असूनही आमची जबाबदारी कोणी ही घेत नाहीत. कधी बोलवत ही नाहीत. मुले नातवंडे कधी येणार म्हणले की सूना चिडतात त्यांच्यावर मग ते ही येत नाहीत. आमची पेन्शन आहे पण या वयात कोणाचा तरी आधार पाहिजे असतो.

अर्थात फडके आजिंचे बोलणे ही बरोबर होते. पण त्यांनी पारसनीस आजिना पूर्ण बोलूनच दिले नाही.

पारसनीस आजी आजोबांची नात . जिला जीवापाड जपले या दोघांनी तिचे तिच्याच ऑफिस मधल्या मुलाबरोबर प्रेम मग लग्न ही झाले पण दुर्दैव आणि दुःखाचा परत डोंगर कोसळला तिच्यावर आणि आजि आजोबंवर तो मुलगा लग्नानंतर एकाच वर्षात हार्ट अटॅक ने गेला . आणि नात तेव्हा सहा महिन्याची प्रेग्नंट होती ..

आता तीन महिन्यांपूर्वी तिला मुलगा झाला. आता नात दुसरे लग्न करणार नाहीच म्हणते . आजी आजोबा आता या नातीला आणि पणतू दोघांना ही सांभाळतात. नातीची नोकरी आहे. पण सांभाळणे हे फक्त आर्थिक नसते ना तर मानसिक आधार असतो , सोबत असते, सुरक्षितता असते. आनंद आई दुःख दोन्ही मध्ये साथ . ती हे आजी आजोबा त्या दोघांना देतात. आपली दुःख विसरून त्यांना जगण्याची नवीन उमेद देतात.

या वयात पारसनीस आजी आजोबांना ही आधार हवा होताच की पण तेच दोघे नाती चा आणि पणतू यांचा खंबीर आधार बनून राहिले.

दोन्ही प्रसंग विचारात घेतले तर पहिल्या प्रसंगामध्ये मेघना
आणि दुसऱ्या प्रसंगात फडके आजी या समोरच्याचे म्हणंने ही समजून घेत नाहीत , ऐकून घेत नाहीत. आपल्याच दुःखाचा पाढा वाचत सुटतात.

प्रत्येकाला वाटत असते आपले दुःख हे इतरांच्या पेक्षा जास्त आहे. इतरांकडे बघितले की ते किती सुखी असेच वाटत असते. आणि आपले दुःख सारखे व्यक्त करून मानसिक , भावनिक दृष्ट्या आपण सहानुभूती , कणव , दया मिळवीत असतो. किंवा तशी अपेक्षा करत असतो.

आपले काम खूप अवघड आहे असे वाटत असते. इतरांचे काम सोपे. त्यांना काही काम नसते . असे वाटत असतें.

पण अशी एक म्हण आहे ना की ” जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ” .

कधीतरी इतरांच्याही दुःखांचा थोडा कानोसा घ्या.. नुसतं स्वतःचं रेटत बसू नका.

कधी तरी इतरांच्या भूमिकेत शिरा. अगदीच नाही जमले तर स्वतः चे दुःख मांडा पण जेव्हा इतर कोणी काही त्यांचे दुःख आपलेपणाने सांगत असेल तेव्हा इतरांचे ही दुःख ऐकून घ्या. त्यांना त्यांच्या कोंडलेल्या भावना मोकळेपणानं बाहेर काढू देत. हलके करू देत मन. जसे काळेभोर ढग आकाशात पावसाचे ओझे घेवून हळूहळू पुढे सरकत असतात. आणि अशा एकक्षणी , ठिकाणीं ते काळेभोर ढग ही पावसाचा वर्षाव करतात आणि हलके होतात आणि मग निरभ्र आकाश , पांढरे शुभ्र आणि निळे ढग दिसू लागतात. वातावरण एकदम निरभ्र होते.

तसेच इतरांना ही बोलून , आपले दुःख व्यक्त करून मोकळे होण्याची संधी द्या.

कधीतरी इतरांच्याही दुःखांचा थोडा कानोसा घ्या.. नुसतं स्वतःचं रेटत बसू नका. आणि खरेच तेव्हा जाणवेल अरेच्चा आपले दुःख हे काहीच नाही.

मराठी मधली एक म्हण आहे ” दुरून डोंगर साजरे “.
दुरून बघितले की ते डोंगर खूप सुंदर दिसतात. त्याच्या वरची झाडे झुडपे हिरवीगार , सुंदर दिसतात. पण जवळ गेले की समजते की ती झाडे झुडपे काटेरी आहेत. सगळीच झाडे काही हिरवीगार नाहीत. त्यात काही वाळलेली , सुकलेली ही झाडे आहेत. काही निष्पर्ण ही आहेत.

तसेच आहे काही व्यक्ती आपल्या दुःखाचे प्रदर्शन करत नाहीत. मात्र त्यांनाही कधी तरी मोकळे व्हावेसे वाटते च की.

जगात आपण एकमेकांच्या सुखदुःखाची तुलना कधी करु नये कारण प्रत्येकाची लढाई ही वेगळी आणि स्वतंत्र असते. प्रत्येकाच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा त्यांच्या त्यांच्या संघर्षाची, वेदनांची तीव्रता ठरवतात….

आयुष्य खूप सुंदर आहे. आनंद आणि दुःख , त्रास , समाधान सुख हे बदल घडतच राहतात. चढ उतार येतच राहतात. आनंदात , कार्यक्रमात सहभागी होता तसे कधीतरी इतरांच्याही दुःखांचा थोडा कानोसा घ्या.. नुसतं स्वतःचं रेटत बसू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!