Skip to content

कठीण काळात नातं निवडावं की करिअर…

कठीण काळात नातं निवडावं की करिअर…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्य म्हणजे एखादा भ्रमर नव्हे , तासनतास एकाच फुलाभोवती घुटमळणारा…! आयुष्य हे वेगवेगळ्या बंधात बांधल गेलेलं आहे. सुख-दुःख , यश-अपयश , आरोग्य , शिक्षण , करिअर , नाती यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये माणसाच आयुष्य हे बांधल गेलेल आहे.एखाद्या बांधकामाचे जसे विविध टप्पे असतात तसेच आपल्या या आयुष्याचेही वेगवेगळे टप्पे असतात.बालपण , तरूणपण अशाप्रकारचे हे टप्पे आपण अनुभवत असतो.

जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण एका वेगवेगळ्या विशिष्ट अशा ‘phase’ मधून जात असतो.मुलांची दहावी संपली की सुरुवात व्हायची ती त्यांच्या करिअरला….कुणाला मेडिकल ,इंजिनिअरिंग तर कुणाला कला , वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असतो.हे छोटे छोटे पल्ले पार करून आपल्या ध्येयाचा पल्ला त्यांना गाठायचा असतो.पण हल्ली तर सारं काही बदललय किंवा बदलतय…

सगळ्या गोष्टींची गणितं ही सोडवताच नाही येत.काही अंशी ही गणितं सोडवणं कठीण जातय.आणि आयुष्य म्हणजे म्हंटल तर असंख्य खाचखळग्यांनी भरलेला एखादा खडतर प्रवास…! तर कधी कुणी आपल्यासाठी फुलांच्या पायघड्या घालाव्या इतका सुंदर प्रवास…! असाच हा आयुष्याचा प्रवास असतो.कधी चांगला तर कधी वाईट , अक्षरशः कठीण….

पण मग कठीण काळ म्हणजे नेमका कोणता कठीण काळ..? प्रत्येकाच्या आयुष्यातील कठीण काळ हा वेगवेगळा असतो किंवा त्याच्या वेळा तरी वेगळ्या असतात.पण मग जेव्हा कठीण काळ आणि करिअर यांची वेळ एकच असेल तर………???तर मग अशावेळी या कठीण काळात काय करायच हे समजत नाही. म्हणजे कसं तर एखाद्याचं करिअर हे आत्ताच सुरु झालेल असतं आणि अचानक एखादा कठीण प्रसंग त्याच्या आयुष्यात येतो.

कुणाची जवळची माणसं दुरावतात , सोडून जातात तर तरूणाईमध्ये हल्ली अगदी फुलाच्या पाकळ्या गळून पडाव्या इतक्या सहज ब्रेकअप होतात.तसच वेगवेगळे वाईट प्रसंग हे आयुष्यात येतच राहतात. मग अशावेळी काय निवडावं हे कळत नाही. नाती निवडावी की करिअर…..? यामध्ये आपण गडबडतो. आता नातं म्हणजे नेमकं कोणतं नातं…?? मला वाटत यामध्ये आई ते मित्र-मैत्रीण पर्यंतच कोणतही नातं असु शकतं.कधी कधी नात्यांमुळेच कठीण प्रसंग ओढवतात.

पण काही नाती ही खरोखरच आपल्या आयुष्यात येऊन एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आलेल्या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यास आपल्याला मदत करतात.पण मग त्या कठीण काळात करिअरच काय….? हा प्रश्नही तितकाच जवळचा आणि महत्त्वाचा असतो. आता एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात अगदी तसच काही जण म्हणतील की काय अशा काळात नाती निवडून काय होणार….नात्यांमुळे तर या आयुष्यात कितीतरी प्रॉब्लेम्स होतात.. यांच्यामुळे आयुष्य अजून कठीण होत जाईन…

त्यापेक्षा कठीण काळात करिअर निवडल तर आयुष्य निदान मार्गी लागेल.तर मग काही जणांना वाटतं की आयुष्यात नाती खूप महत्त्वाची आहेत. आणि कठीण काळात नाती निवडली तर जरा दिलासा मिळेल.. एक मानसिक आधार मिळेल असं वाटतं. आता प्रत्येकजण इथे वेगळा आहे आणि प्रत्येकाचे विचार , विचार करण्याची पद्धत , दृष्टिकोन हा अतिशय भिन्न स्वरूपाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असणं साहजिक आहे.

थोडा नीट विचार केला की असच वाटत , आयुष्यात नात्यांना , आपल्या माणसांना जितकं महत्त्व आहे तितकच महत्त्व हे आपल्या करिअरला देखील आहे आणि असायलाच हवं.कारण करिअर म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो जिथे आयुष्य घडायला , स्वप्नांना दिशा मिळायला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. नातं म्हणाल तर ते आपल्या आयुष्याचा एक भाग असतं…ती नाती म्हणजे आपण आपल्या आयुष्यात कुणाशी तरी अंतरातून जोडले गेलेले असतो.

मग आता कठीण काळ आला तर….तर तो काळ जाईपर्यंत वाट न पाहता आपण पुढचा विचार करणं आवश्यक असतं.अशावेळी नातं की करिअर यात आपण गोंधळून जायच नसतं.जर दोन्ही गोष्टींच महत्त्व लक्षात घेतल तर कदाचित काय ‘choose’ करायच हे आपल्या लक्षात येईल. केवळ नातं असुन काही उपयोग नाही… कठीण काळात केवळ मानसिक आधारच नाही तर भविष्याचा वाटाड्या देखील तितकाच गरजेचा असतो. अगदी मान्य..,

आपल्याला नातीही हवी असतात आणि आपलं करिअर सुद्धा घडवायच असतं.पण मग गोची होते ती मात्र पर्याय निवडताना…. पण मग मला असं वाटतं की , आपण अशा कोणत्याही कठीण काळात दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतला पाहिजे. नातं मानसिक आधार देतं तर करिअर मनाला वेगळ्या दिशेने वळवायचा प्रयत्न करत असतं म्हणून या दोन्ही गोष्टींचा समतोल राखला गेला पाहिजे. त्यामुळे नातं निवडतानाच असं नातं निवडा की ज्याला तुमच्या करिअरबद्दल असूया वाटत असेल.

करिअरच महत्त्व ज्या नात्यांना मान्य असेल अशी नाती निवडा.कारण करिअर करताना मन एका विश्वात रमलेल असेल , आपलं काहीतरी ध्येय आहे हे आपण स्वःताच स्वतःला त्या कठीण काळात सांगण्याचा प्रयत्न करत असू….कठीण काळात करिअर आपल्याला किती सहाय्य करत याची जाणीव आपल्याला होईल. कारण नुसत्या नात्यांनी आयुष्य घडत नसतं…

नातं कुठपर्यंत साथ देईल याची शाश्वती हल्ली देता येत नाही , त्याच नात्यामुळे अजून कठीण काळ ओढवायला नको इतकीच काय ती अपेक्षा…! पण करिअरला महत्त्व दिल तर स्वतःमध्ये एक आत्मविश्वास तयार करून आपण आपला कठीण काळ सहज बदलू शकतो. एकतर निवडायच झालं तर करिअर निवडा नाहीतर मग दोन्ही निवडा….आता असं म्हंटल तर काहीजणांना हे चुकीच वाटेल की काय मग नात्यांच महत्त्व धुळीस मिळाल का…?काय ती नात्यांची किंमत.?? असही बोलायला अनेक जण कमी करत नाहीत.

पण सांगायची गोष्ट इतकीच की , कोणत्याही कठीण काळात निवडताना अशीच नाती निवडा ज्यांना करिअरची जाणीव असेल.करिअरला , तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहन देणारी नाती निवडा..आणि त्याच नात्यांना आपल्या करिअरमधला थोडा वेळ मात्र त्याच नात्यांसाठी राखून ठेवा.दोघांचा योग्यप्रकारे समतोल राखला तरच या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे कठीण काळात निवडताना दोन्ही गोष्टी सामंजस्याने समतोल राखून निवडा हीच एक विनंती…!

नात्यांसाठी करिअर सोडू नका…आणि करिअरमुळे नातं सोडू नका…दोघांना वेळ देऊन दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न जरूर करा….बाकी आपण सगळेच आपल्याला काय चांगल वाटत नी काय वाईट…. याचे निर्णय उत्तम प्रकारे घेऊ शकतो….पण तरीही हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!