Skip to content

“कंटाळलेली दुःखे गिरवण्यापेक्षा एक भन्नाट आनंदी जीवन जगण्याचे पर्याय आपण शोधले पाहिजेत..”

“कंटाळलेली दुःखे गिरवण्यापेक्षा एक भन्नाट आनंदी जीवन जगण्याचे पर्याय आपण शोधले पाहिजेत..”


मधुश्री देशपांडे गानू


हैं बहुत अंधियार, सूरज निकलना चाहिये..

जिस तरह से भी हो, ये मौसम बदलना चाहिये….

हिंदी साहित्याचे कवी गोपालदास नीरज यांच्या एका कवितेतील ओळी. अंधारी रात्र असली तरीही सूर्य उगवतोच. सूर्याची सोनेरी किरणे नवीन, स्वच्छ दिवसाची सुरुवात करतातच. त्याच प्रमाणे कोणतेही दुःख सहन करावे लागले तरीही हे पराकोटीचं दुःख उगाळत न बसता आपण नवीन येणाऱ्या  सुखाला सामोरं जायलाच हवं.

हा दुःखाचा मोसम आनंदी मोसमामध्ये बदलणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा इथून पुढे “मी माझं जीवन आनंदी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन” हा विश्वास स्वतःला द्यायलाच हवा. तरच आपण हे सुंदर जीवन मस्त, स्वच्छंदी, आनंदी अनुभव शकू.

मानवाच्या जीवनरूपी प्रवासात त्याला अनेक यातना, दुःख, अडचणींचा सामना करावा लागतो. पण यातून गेल्यावरच तर त्याला खऱ्या सुखाची किंमत कळते. दुःख तर सोसावं लागणारच. उदास, निराश, दुःखी वाटणारच. नैसर्गिक भावना आहेत या. पण या भावनांना किती काळ कुरवाळायचं? हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. “मी किती दुःखी आहे!” याचं किती काळ प्रदर्शन करणार तुम्ही? आणि का? तुमचं गणगोत तुमचं सांत्वन करतंच, पण किती काळ?? दुःखाला कोणी वाटेकरी नसतो.

एखाद्या स्त्रीचा पती अकाली मृत्यू पावला तर अतीव दुःख साहजिक आहे. पण तिला स्वतःच्या मुलांसाठी, कुटुंबियांसाठी परत उभं राहायलाच हवं. स्वतःचा आनंद, मुलांचा आनंद हा साजरा करायलाच हवा. आयुष्य संपूर्णपणे जगायलाच हवं. घडून गेलेला दुःखद प्रसंग परत येणार नसतो. तो मागे सोडूनच पुढे जायचं असतं. अशावेळी प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि योग्य परिश्रमाने मार्ग काढायला हवा. प्रत्येक व्यक्तीला भरभरून आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि तो त्याने मिळवायलाच हवा.

एक छानसं उदाहरण देते. शेतकरी त्याच्या शेतात अनेक पिके घेतो. गहू, डाळी, ज्वारी, कांदा, भाज्या.. या लावलेल्या पिकांमधून मोकळ्या जागेत सतत नको असलेले गवत वाढत असतं

याला धानोरा म्हणतात. येणारं पीक उत्तम पैसा मिळवून देतं. शेतकऱ्याला वर्षभराचे धान्य मिळवून देतं. आणि हे पीक जोमाने , भरपूर यायला हवं असेल तर हा धानोरा सातत्याने काढून टाकावा लागतो. कारण पिकाच्या वाढीच्या वेगापेक्षा याचा वेग खूप जास्त असतो. जमीन सातत्याने हा धानोरा काढून मोकळी केली तरच येणारे पीक जोमाने आणि भरदार येतं.

याच प्रमाणे येणार दुःख, त्याचा आवेग, तीव्रता आणि त्याच बरोबर येणारे नकारात्मक विचार यांचा आपल्या मनावर होणारा परिणाम हा धानोरा सारखा असतो. जर सातत्याने आपल्या विचारांची कृतीने मशागत केली नाही तर आपलं आयुष्य संपूर्णपणे आनंदी होणार कसं?? आनंदाचं उत्तम पीक आणि भन्नाट आयुष्य हवं असल्यास ही नको त्या विचारांची, कंटाळलेल्या दुःखांची मशागत करून ही दु:खं मुळापासून उपटून नष्ट करायलाच हवीत.

सतत उगाळून दुःख सुद्धा कंटाळतं आपल्याला. दुःखीकष्टी राहण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तीच ऊर्जा आता इथून पुढे सगळे चांगलं होणार या विश्वासाने आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात वापरली तर आपण अनेक पर्याय शोधू शकतो. आपल्या आवडी निवडी, छंद नव्याने जोपासू शकतो. त्याचाच अर्थार्जनासाठी उपयोग करू शकतो. याने स्वतःची नवी ओळख आणि आत्मविश्वास मिळतो आपल्याला. समाजाच्या अनेक दुर्बल घटकांची सेवा करू शकतो. अनेक मार्गांनी आपण स्वतःचं आयुष्य भन्नाट आनंदी, सुखी, समाधानी बनवू शकतो.

आपल्या भारतातच असे कितीतरी सर्वोत्तम व्यक्ती आहेत ज्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढला आणि स्वतःसाठी एक आनंदी भन्नाट, अभिमानास्पद आयुष्य निर्माण केलं. अनेक अपमान आणि दुःख यांचा सामना करावा लागला. पण तिथेच अडकून न पडता त्यातूनच शिकून, प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आयुष्य अद्भूत, समृद्ध घडवलं ज्याचा आज संपूर्ण देशाला अभिमान आहे.

उदाहरणार्थ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, श्री नारायण मूर्ती. कितीतरी अशी उदाहरणे आहेत. जे घडून गेलं ते उगाळत न बसता माझं आयुष्य मी आनंदी, समृद्ध बनवणार हा आत्मविश्वास स्वतःला द्यायलाच हवा. तुमच्या कुटुंबीयांसाठी, प्रेमाच्या माणसांसाठी, त्यांना सर्वार्थाने सामावून घेण्यासाठी तुम्ही आनंदी असायला हवं. नाही का!

सुख आणि दुःख ” part and parcel of life ” हे एकदा कळलं की मग दोन्हींची तीव्रता कमी होते. आपण फार अडकून पडत नाही कशात.  स्वतःला प्राधान्य देऊन, स्वतः वर लक्ष केंद्रित करून सातत्याने स्वतःची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करत राहायचे. आणि मनाची शांती, समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं असून हाच भन्नाट आनंदी जीवनाचा मार्ग आहे हे लक्षात आलं की त्यासाठी प्रयत्नशील राहायचं…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““कंटाळलेली दुःखे गिरवण्यापेक्षा एक भन्नाट आनंदी जीवन जगण्याचे पर्याय आपण शोधले पाहिजेत..””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!