ओढ संपली की वेळ नसल्याची कारणे वाढायला लागतात.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
ओझं नसावं परि ओढ असावी
मनाची मनाला
नाती हळूवारपणे जपण्याची….
एकमेकांना साद घालण्याची…!!
‘ओढ’…ओढ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी हवीहवीशी आणि तितकीच महत्वपूर्ण गोष्ट. या ओढीशिवाय प्रत्येकाच आयुष्य हे अपूर्ण आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची ओढ ही असतेच.अगदी कुणीतरी येताना चॉकलेट घेऊन येईन ते कुणीतरी आपल्याला हक्काने भेटायला येईन अशी निरागस ओढ प्रत्येकाला असते.अर्धी माणसं तर हे आयुष्य केवळ एका “ओढी”वरच जगतात. ती ओढ कुठेतरी मनात नव्या आशा पल्लवित करत असते.
पण पहा कधी कधी ही ओढच संपून जाते. आणि एकदा का आयुष्यातील ही ओढ संपायला लागली की आयुष्य कसं सुनं सुनं वाटायला लागतं.हळुहळू एक एक आशाही मावळायला लागते.
नात्यांमध्ये तर ओढ ही असावीच लागते.कारण त्या ओढीमुळेच तर नाती फुलत जातात, बहरत जातात.नात्यातील ओढ ही काही वेगळीच असते.मग ती मैत्रितली असो वा प्रेमातली.अगदी साधं भेटायच जरी ठरलं तरी आपली ओढ क्षणाक्षणाला वाढत असते.आता ती येईलच… आमची भेट होईल , गप्पा गोष्टी सगळी मैफिल कशी मस्त रंगेल अशी एक निखळ आनंद देणारी ओढ या नात्यात असते.
इतकच नाही तर एकमेकांना एकमेकांची ओढ ही समजत असते.त्यामुळे तर अजूनच ती ओढीची तीव्रता वाढत जाते.ती ओढ कधी संपतच नाही. छान वाटतात अशी दोन्ही बाजूंनी ओढ असलेली नाती.नाहीतर ओढ केवळ एकाच बाजूने असेल तर उगाच ते जबरदस्ती केल्यासारखं वाटतं.जिथे ओढच नसते तिथे नाती फुलणार कशी…?
निसर्गालाही पावसाची ओढ असतेच.तोही पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.शेवटी तो पाऊस येतो नी निसर्गाला चिंब चिंब भिजवून टाकतो.म्हणजे अगदी प्रत्येकाला एक ओढ ही असतेच.एकमेकांप्रती असो वा एकट्याची असो.जोपर्यंत ही नात्यातील ओढ जिवंत आहे तोपर्यंत ही नाती टिकून राहतात.
एकमेकांसाठी ही ओढ थोडासा का होईना वेळ काढायला आपल्याला “push up” करत असते.पण जर नात्यात थोडा जरी कडवटपणा आला तरी ही ओढ हळुहळू संपायला सुरुवात होते. नाती विस्कटायला सुरुवात होते. अशावेळी एकमेकांप्रती आपण क्षणभर वेळही द्यायला मागत नाही. कोणती ना कोणती कारणं काढून आपण भेटायच टाळतो.कारण त्यावेळी आपल्याला इतरांना वेळ द्यावा असं वाटत नाही. किंबहुना समोरचाही अनेकदा हाच विचार करत असतो.
ओढ संपत जाते आणि एकमेकांसाठी वेळ नसल्याची कारणं वाढायला लागतात. “आत्ता नको मला वेळ नाही..नंतर कधीतरी वगैरे” , “नंतर बोलूयात , जरा कामात आहे “, “वेळच नाहीये भेटायला , ईतकं काय भेटू कधीतरी ” अशी वेगवेगळी कारणं आपण ऐकतो आणि स्वतः अनुभवतोही. प्रत्येकानेच असं काही ना काही अनुभवलं असेलच यात शंका नाही.
अहो ओढ संपली तर समोरच्या व्यक्तीला आपल्याला भेटावसही वाटत नाही. कित्येक कारणं आपल्याकडे अगदी क्षणात तयार असतात. किंवा नसली तरी आपण ती शिक्षण शोधतो, निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.पण कुणीतरी आपली , ओढीने , उत्सुकतेने वाट पाहत असेल हे मात्र आपण लक्षात घेत नाही.
ओढ संपते टाळाटाळ वाढत जाते.भेटणं , बोलणं , एकमेकांचा सहवासही नकोसा होतो.किंवा भेटायच , बोलायच म्हणून बोललं जातं.आणि भेटलं , बोललं की कधी एकदाचा तिथून आपण पाय काढतो असं होत जातं.काही शिल्लक राहिलेलच नसतं. ना बोलण्याची ओढ उरलेली असते , ना भेटण्याची ना की एकमेकांबद्दल काही जाणून घेण्याची. ओढ संपली की सगळच संपून जातं.
कशाला काही अर्थच उरत नाही.मला तिच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. ती आली काय नी नाही आली काय…इतकासा काही फरक पडत नाही. आपण सरळ सरळ असं बोलून मोकळे होतो.कधी कधी काय होतं तर ओढ असते पण ती एका बाजूनेच असते.समोरच्या व्यक्तीला त्या ओढीच काही एक पडलेलं नसतं.ईतकच नाही तर काय ओढ वगैरे नसते असही बोलायला कमी करत नाही.
अहो पण नाती ओढीमुळेच तर फुलतात. पण ही ओढच संपली तर सगळच तुटतं.सगळच गणित बिघडत जातं. त्यामुळे नात्यातील ओढ टिकून ठेवायला शिकलं पाहिजे.तरच नात्यातील गोडी वाढत जाईल नाहीतर नात्यातील वेढाच वाढत राहील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

