Skip to content

एखाद्या व्यक्तीने तुमचा तिरस्कार केला याचा अर्थ सगळ्यांनी तुम्हाला वाळीत टाकलं असा होत नाही.

एखाद्या व्यक्तीने तुमचा तिरस्कार केला याचा अर्थ सगळ्यांनी तुम्हाला वाळीत टाकलं असा होत नाही.


हर्षदा पिंपळे


राधा म्हणजे एक साधारणपणे बावीस वर्षाची मुलगी. शिक्षण तसं चालू होतं.शिकता शिकता तशी ती पार्ट टाइम नोकरीही करत होती.अनेकदा तर तिला घरी यायला खूप उशीर व्हायचा. थोडी अल्लड होती पण मनाने ती साधी आणि सरळ होती.घरी उशिरा आली की तिला ओरडा मिळायचा. आणि ती निमुटपणे ते ऐकून घ्यायची.पण तिच उशिरा येणं दिवसागणिक वाढतच होतं.त्यामुळे घरातील वातावरण तापत होतं.तिला घरी यायला उशीर व्हायचा कारण खूप वेळा तिला वर्कलोड असायचा.आणि ती तो पूर्ण करूनच घरी यायची.तिने कित्येकदा घरच्यांना सांगितलही.पण घरातील काही जणांना तिचं हे वागणं बिलकूल पटलं नाही.

आत्याने तर नको नको ते बोलून तिला हैराण करून सोडलं.तिची आत्या तिला सतत काहीतरी बोलायची. तिरस्कार करायची.आणि राधा थोडी नरवस व्हायची मग तिला समजावून सांगायला बाकी लोकं पुढे व्हायची. आणि याच गोष्टीमुळे राधाला वाटायच की सगळेच तिचा तिरस्कार करत आहेत.पण नाही… ती लोकं तिचा तिरस्कार न करता तिला केवळ समजावून सांगत होते.तिला असं कोणी वाळीत टाकलच नव्हतं. परंतु एकाने तिरस्कार केला ही भावनाच तिला सहन होत नव्हती.त्यामुळे समजावणारी लोकही तिला वाळीत टाकतायेत असच तीला वाटत होतं.

अनेकदा काही कारण नसतानाही एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार केला जातो.अशावेळेस ते सहनशक्तीच्या पलिकडच असतं.

मित्रांनो, ‘तिरस्कार’ हा शब्द कानावर ऐकू जरी आला तरी सगळ्यात आधी आपल्याला काय आठवत असेल तर तो म्हणजे आपण एखाद्याचा करत असलेला तिरस्कार नाहीतर दुसऱ्यांनी आपला केलेला, करत असलेला तिरस्कार.परंतु ‘तिरस्कार’ हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी हा निश्चितच वेगळा आहे. त्यामुळे ‘तिरस्कार’ या शब्दाचा अर्थ केवळ एकाच चष्म्यातून पाहणं निव्वळ चुकीच ठरू शकतं.आणि मुळातच विषय तसा अगदी सरळ आहे.त्यामुळे ” तिरस्कार काय उगाचच केला जात नाही वगैरे वगैरे” ही गोष्ट क्षणभर तरी बाजूला ठेवून द्या.आणि मुळातच नेमका विषय काय आहे ते समजून घ्या.

साहजिकच आयुष्यात आपण आणि आपल्यासारखीच चालणारी-बोलणारी माणसं आहेत.परंतु प्रत्येकाचे स्वभाव हे निरनिराळे आहेत. कुणी बोलायला एकदम तिखट तर कुणी एकदम मधासारख गोड…! कुणाला सदाफुली आवडते तर कुणाला जास्वंद आवडते.थोडक्यात काय तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी, वागणं-बोलणं हे अगदी भिन्न असतं.कुणाला एखादी गोष्ट रूचते तर कुणाला तीच गोष्ट रूचत नाही.

अशातच हे आपलं आयुष्य आहे.आणि आयुष्यात आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधले गेले आहोत.अगदी टपरीवरच्या चहावाल्या काकांपासून ते घरातल्या आजी-पंजीसोबत आपण जोडलेले असतो.पण सगळ्यांचे स्वभाव हे सारखे नसतात.आणि स्वभावातला हाच भिन्नपणा कितीतरी वेळा एखाद्या व्यक्तीशी जुळवून घेताना कठीण जातो.अनेकदा एकमेकांना एकमेकांच्या सवयी,मतमतांतरे अजिबात पटत नाही. यावरून एकमेकांमध्ये वादाची ठिणगीही पेटते.एकमेकांमध्ये एकमेकांप्रती तिरस्काराची भावना निर्माण होते. आणि अशावेळी नेमकं आपल्याला वाटतं की आपला सगळेच तिरस्कार करतात.

आपल्याला कुणी समजूनच घेत नाही.खूप चिडचिड होते आणि सगळं असह्य होऊन बसतं. अगदी नैसर्गिक आहे, कुणी आपला इतका तिरस्कार करत असेल तर चिडचिड तर होणारच.वाईट तर वाटणारच.पण मग अशावेळी सगळेच तुमचा तिरस्कार करतात असं नसतं.सगळ्यांनी तुम्हाला वाळीत टाकलय वगैरे असं काहीही नसतं.मुळातच माणसाच्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर त्याला ते सहसा सहन होत नाही.

त्याला त्याच गोष्टीचा राग येतो,संताप येतो.तो त्या त्या ठराविक गोष्टींचा तिरस्कार करायला लागतो.पण मग त्या एकाने तिरस्कार केला म्हणून संपूर्ण जग तुम्हाला त्या तिरस्कृत नजरेनेच पाहत असं नाही. सगळ्यांना सगळच पटतच असं नाही. आणि कुणाला काहीच पटत नाही असही काही नाही. अहो चार माणसांमधून एखादा तरी असतोच आपल्याला समजून घेणारा.आपली बाजू शांतपणे ऐकून घेणारा.

मान्य आहे की, मनुष्य परिस्थितीनुसार बदलत असतो.कधी कधी तर माणूस एखाद्याविषयी काहीही जाणून न घेता थेट कुणीतरी काहीतरी बोलल म्हणून त्या व्यक्तीविषयी मनात नको ते मत बनवतात. आणि त्याला त्याच दृष्टीकोनातून पाहतात. पण एक लक्षात ठेवा. सगळे सारखे नसतात. प्रत्येकाच आपल्या बाबतीतील मत हे वेगवेगळ असतं.प्रत्येकजण आपला तिरस्काराच करतो असं नाही.

आणि जर सगळ्यांनी आपल्याला वाळीत टाकलय असं जर वाटत असेल तर एक लक्षात ठेवा.आपल्यासाठी आपणच आहोत.आपणच आपल्याला वाळीत तर नाही टाकू शकत नं…?आपणच आपला तिरस्कार तर नाही करू शकत नं…?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!