एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करू नका.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
प्रकाश सावंत आणि नमित चव्हाण हे हे गेले खूप वर्ष शेजारी म्हणुन राहत होते. दोघांचीही लग्न होऊन ते संसाराला लागले होते. प्रकाशला एक मुलगी होती. आता आता ती दुसरीत गेली होती. तर नमितला दोन मुली होत्या. त्या जरा मोठ्या होत्या. एक सातवीत होती तर दुसरी पाचवीत. प्रकाश हा प्रायव्हेट कंपनी मध्ये कामाला होता. चांगला पगार होता त्याला. आणि त्याचे आई बाबा वैगरे गावी राहत होते. कधीतरी भेटून जायचे तेवढेच. त्यामुळे घरी ही तिघच.
नमित मात्र कारखान्यात कामाला होता. स्वभावाने अतिशय प्रामाणिक त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्याला खूप लोक मानायचे. त्याचा आदर राखत होते. पण हे सर्व असल तरी त्याची परिस्थिती बेताची होती. त्यात हा एकटाच कमावता होता. गावाला पण पैसे पाठवावे लागत. तरी त्यातही ते कुटुंब आनंदी होत. पण आयुष्यात चांगले दिवस तसे काही अडचणीचे संकटाचे दिवसही येतात. आपल्याला त्याला समोर जाव लागत. तसच काहीस नमितच्या बाबत झालं. तो ज्या कारखान्यात काम करत होता ती जागा कधीपासून एका बिल्डरला विकत घ्यायची होती. तो त्याचा मोबदला देणार होता. पण तरी त्यामुळे नमित सारख्या कितीतरी कामगारांची नोकरी जाणार होती आणि तेच नेमक झालं. मालकाने ती जमीन त्या बिल्डरला विकली व प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाबद्दल रक्कम दिली.
पण आता नोकरी मात्र गेली होती. जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली तेव्हा तिला पण धक्का बसला. कारण अजून मुलींची शिक्षण होती, त्यांची लग्न होती. आता घर चालवायचं होत. दिलेले पैसे किती दिवस पुरणार होते? आता परत नव्याने सर्व सुरू करावं लागणार होत. दोघेही आता खूप टेन्शन मध्ये आले होते. जरी नवीन काम शोधयाचं असल तरी ते काही लगेच मिळणार होत? त्याला पण काही दिवस जाणारच होते. पण आता काही पर्याय नव्हता. नमित कष्टाळू होता. त्याने हार मानली नाही. कसही करून आपण परत काम मिळवायचं अस त्याने ठरवलं. तो रोज पेपरमध्ये जाहिराती वैगरे पाहू लागला. लोकांना भेटायला जाऊ लागला.
पण आजूबाजूच्या लोकांना हळू हळू हे लक्षात आलं की काहीतरी झालं आहे. रोज एका ठराविक वेळी कामाला जाणारा माणूस आता घरी दिसतो म्हटल्यावर काहीतरी झालेले आहे अशी कुजबूज शेजाऱ्यामध्ये होऊ लागली. आणि शेजाऱ्यांना तर आपल्या घरात काही शिजतयं याहून जास्त दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे यातच जास्त रस असतो. मग आपण त्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात नको तितकं लक्ष तर घालत नाही ना? हे ही लक्षात येत नाही.
प्रकाशची बायको तशी होती. तिला इतरांच्या घरात काय चालू आहे? याची सर्व माहिती असे. किंबहुना त्यातच जास्त रस असे. नमितच्या घरी काय चालू आहे हे ही तिला अजून खोलात जाऊन जाणून घ्यायच होत. म्हणून एक दिवस नमित घरी नाही हे पाहून ती तिथे गेली. तिने पाहिलं तर नमितची बायको जेवणाची तयारी करत बसली होती. हिला आलेलं पाहून तिने आत बोलवले व पाणी आणायला आत गेली. तेवढ्या वेळात प्रियाने प्रकाशच्या बायकोने सर्व घर न्याहाळले. जान्हवीला तिचा स्वभाव माहीत होता. तरी ती काही बोलली नाही. ती पाणी घेऊन बाहेर आली.
तिला आलेलं पाहताच प्रिया उसन हसू आणत म्हणाली, “शेजारी राहून सुध्दा खूप दिवस भेट नाही म्हणून म्हटल आज येऊया. काय मग कसं चालू आहे सर्व?” जान्हवी पण हसून म्हणाली. “छान आहे. तुम्ही काय म्हणताय? श्रुती कशी आहे?” यावर प्रिया म्हणाली, “तिचं काय? शाळा आणि आल्यावर खेळणे. मजेत आहे सर्व.” प्रिया नेमके काय बोलायला आली आहे हे जान्हवीला माहीत होते. तितकं तरी ती तिला ओळखून होती. शेवटी प्रिया ने विचारलेच, “भाऊजी हल्ली घरी दिसतात. कामावर जात नाहीत वाटत?” यावेळी जान्हवीला तिचा राग आला होता. कारण कोणतेही कारण नसताना ती उगाच त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत होती. तिला अस गप्प बसलेले पाहून प्रिया ने पुन्हा विचारलं, “मी अस ऐकल की त्यांना कामावरून काढल. खर आहे का? म्हणजे मी सहजच विचारत आहे.” जान्हवी शक्य तितका शांत राहून म्हणाली, “त्यांना कोणीही कामावरून काढलेले नाही. त्यांनीच काही दिवसाची सुट्टी घेतली आहे.” तिला खर काय झालं आहे हे सांगायची तिची इच्छा नव्हती. कारण परिस्थिती समजून घेण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती प्रियाकडे नव्हती.
तरीही प्रियाने विचारले, “कश्याबद्दल सुट्टी घेतली. तब्येत ठीक नाही का? तस असेल तर आमच्या ओळखीचे चांगले डॉक्टर आहेत. आपण त्यांना सांगू शकतो. शेवटी आम्ही शेजारी आहोत, आम्ही नाही तर कोण मदत करणार?” जान्हवीला माहीत होत की हे सर्व ती काही मनापासून बोलत नव्हती. तिला फक्त माहिती काढून घ्यायची होती. शेवटी जान्हवीला हे सर्व असह्य झाल व ती म्हणाली, “सर्व ठीक आहे. त्यांना पण काही झालेले नाही. मदत लागली तर मी सांगेन. आता मला काम आहे तू जाऊ शकते.” कसतरी करून तिने तिला घालवले. पण झाल्या प्रकाराने ती खूप दुखावली. स्वतःच्या आयुष्याचा असा बाझार झाल्याचा पाहून तिला खूप दुःख झाले. म्हणून तर एरवी विचारत नसलेली लोक आज खोटी सहानुभूती दाखवत होती. नको तितकी आयुष्यात घुसू पाहत होती.
अशी लोक आपल्याही आयुष्यात असतात. ज्यांना इतरांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. आपलं जसं वैयक्तिक आयुष्य आहे तस समोरच्या माणसाच पण असू शकत. त्यामध्ये जाण्याचा आपल्याला काही अधिकार नाही इतकी साधी गोष्टही त्यांना समजत नसते. अगदी बाहेरची लोक नाहीत तर घरातल्या घरात या गोष्टी होतात. लग्न झालेल्या मुलाचं त्याच्या बायकोशी एक वेगळं आयुष्य सुरू झालेलं असत. तिथे आपण प्रमाणाहून अधिक हस्तक्षेप करून चालत नाही. मग तो आपला सख्खा मुलगा असला तरीही. तेच मुलीच्या बाबतीत लागू होत. सासरी गेलेल्या मुलीला सतत उपदेश देणं, सारखं त्या नवरा बायकोमध्ये पडणं त्यांच्या नात्यात समस्या निर्माण करत. अनेक मोठे मोठे कलाकार, सेलिब्रिटी त्यांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. पब्लिक फिगर झाल्याने त्यांचं वैयक्तिक आयुष्यच राहत नाही. त्यांनी ठेवायचा प्रयत्न केला तरी लोक ठेवू देत नाहीत. जे की चुकीचं आहे. अस करून आपण एखाद्या व्यक्तीची पर्सनल स्पेस हिरावून घेतो ज्याचा आपल्याला काहीही अधिकार नसतो.
म्हणून नात कोणतही असुदे, जवळच, लांबच त्या माणसाचं वय जास्त असुदे किंवा कमी अगदी मग ती मुलं का असेनात गरजेपेक्षा जास्त त्यात हस्तक्षेप करू नये.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
