एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का?
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
अग बाई अरेच्चा हा केदार शिंदेने दिग्दर्शित केलेला व संजय नार्वेकरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आपण सर्वांनी पहिलाच असेल. घरात, बाहेर बायकांच्या गराड्यात सापडलेल्या श्रीला बायकांना नेमके काय हवंय, त्यांच्या मनात आपल्याविषयी नेमके काय चाललयं हेच समजत नसत. त्यामुळे नेमके त्यांच्याशी वागायचं तरी कसं हेही लक्षात येत नसत. या सगळ्यामुळे त्याची फार चिडचिड होत असते. त्याला खूप वाटत असत की यांच्या मनातल आपल्याला समजावं, ओळखता यावे.
जेव्हा तो आपल्या गावी जत्रेसाठी म्हणून जातो तेव्हा गावाच्या प्रथेनुसार देवीचा मान यांच्या कुटुंबाला मिळतो आणि श्रीला देवीसमोर नेण्यात येते. तेव्हा त्याच्या नकळत देवी त्याची ही इच्छा पूर्ण करते. कारण गावावरून जेव्हा तो परत येतो त्या दिवसापासून त्याला त्याच्या समोर असलेल्या सर्व बायकांच्या मनात चाललेले असते ते ऐकू येऊ लागते. त्याला सुरुवातीला काहीच समजत नाही, या गोष्टीचा त्रास पण होतो. पण नंतर त्याला या गोष्टीमधली गंमत, तसच हे एक वरदान आहे हे समजते आणि तो त्याचा योग्य प्रकारे वापर करतो आणि पुढील संकटापासून सर्वांना वाचवतो.
चित्रपट पाहताना आपल्याला पण हे सर्व भारी वाटते. समोरचा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतो? आपल्याविषयी त्याच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला समजले तर किती चांगलं होईल अस आपल्याला वाटतं. पण चित्रपटाप्रमाणे ते खऱ्या आयुष्यात शक्य आहे का? खरच आपण अस ओळखू शकतो का?
तर नाही? आपल्या विषयी एखादी व्यक्ती काय विचार करते, तिच्या मनात यावेळी काय चालू आहे हे आपण ओळखू शकत नाही? का शक्य नाही? कारण आपण कोणाचही मन वाचू शकत नाही? आपण एखाद्याच मन वाचू शकतो अस म्हणणं किंवा अस वाटण ह्याला सीबीटी च्या भाषेत mind reading असं म्हणतात. जी एक वैचारिक चूक आहे. वैचारिक चूक या अर्थाने की आपण समोरचा मनात अमुक एखादा विचार करत असेल, किंवा अस काहीतरी बडबडत असेल असा माईंड रीड करायचा प्रयत्न करतो. ज्यात फक्त अंदाजच असतात आणि जे अनेकदा, किंबहुना बऱ्याच अंशी चुकीचे असतात. आणि जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल चुकीचे अंदाज लावतो तेव्हा गैरसमज होतात ज्यातून गोष्टी अजून बिघडतात.
कुठे कुठे असा प्रयत्न केला जातो? नवरा बायकोमध्ये, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये, बॉस आणि एम्प्लॉइ मध्ये जिथे जिथे दोन व्यक्ती येतात तिथे सगळीकडे हे होतेच. अनेकदा जेव्हा नवरा बायकोमध्ये भांडण होत, तेव्हा बायको रागाने म्हणते तुमच्या मनातच नव्हत मला बाहेर फिरायला घेऊन जायचं म्हणून आता कारण शोधत आहात, अश्या वेळी नवऱ्याच्या मनात अस असेलच अस नाही आणि बऱ्याचदा अस काही नसत. कारण काही वेगळच असत. म्हणून अस म्हटल देखील जात की माझ्या मनात जे नाही ते तू का बोलतेस, का माझ्यावर आरोप करतेस. अश्या समस्या निर्माण होतात जेव्हा आपण समोरच्याचा व्यक्तीचं मन वाचायचा प्रयत्न करतो.
विद्यार्थी समजा शाळेत वेळाने आला असेल आणि शिक्षक समोर असतील तर शिक्षकाने आल्यावर सहज पाहिलं तर मुलगा विचार करतो आता हे मला सर्वांसमोर ओरडणार आणि मुल मला हसणार. असा विचार करून तो अजूनच घाबरतो आणि वर्गात जायला कचरतो. पण या गोष्टीला काही पुरावा आहे का? शिक्षक कदाचित उशिरा येण्याचा कारण नीट विचारून त्याला बसू पण देतील. पण हे असे अंदाज लावून मुल आधीच घाबरतात. नात्यामध्ये गैरसमज, भांडण होण्याची कारणच ही आहेत की आपण समोरच्याला वाचायचा प्रयत्न करतो जे शक्य नाही. महत्त्वाचं काय असत? तर बोलणं. कोणत्याही नात्यात मोकळेपणाने बोलण न होता जर बाह्य हालचालीवरून चुकीचे अंदाज लावले जात असतील तर नात खराब होणार तसच आपल्याला त्याचा त्रास होणार.
अनेकांना अस वाटत की सायकॉलॉजिस्ट लोकांच्या मनातल ओळखतात, त्यांना बरोबर समजत ते पाहूनही सांगू शकतात मनात काय चाललंय. तर हे सर्वात मोठं myth आहे. कोणताही सायकॉलॉजिस्ट तुमच्या मनातल ओळखू शकत नाही. जोपर्यंत व्यक्ती सायकॉलॉजिस्टशी बोलत नाही, आपली समस्या नीट सांगत नाही तोपर्यंत तोही काही करू शकत नाही.
म्हणूनच आपल्याविषयी व्यक्ती काय विचार करते तसच आपण समोरच्याबद्दल काय विचार करतो जे नीट समजायचं असेल तर गरजेचं आहे ते खुल आणि मनमोकळ बोलण. जे की एक कौशल्य आहे आणि जे आपल्याला चांगल्या सरावातून प्राप्त होत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

👌👌👌Khoopch Chan