Skip to content

एखाद्या ठिकाणी किती ताणायचं आणि किती नमतं घ्यायचं हे कसं ओळखावं?

एखाद्या ठिकाणी किती ताणायचं आणि किती नमतं घ्यायचं हे कसं ओळखावं?


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


किती ताणायचं नी किती नमतं घ्यायच हे आपल्या आयुष्यात अगदी कुठेही तंतोतंत लागू होताना दिसतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की जिथे या गोष्टी सर्रासपणे घडतात. आयुष्याचा जणू त्या एक भागच बनल्या आहेत.वादविवाद… कोलाहल आजपर्यंत कुणाला चुकलेत…??आयुष्य आहे म्हणजे ह्या गोष्टी तर येणारच.पण या सगळ्यात दोन गोष्टी खूप काही matter करून जातात. त्या म्हणजे ‘एखादी गोष्ट ताणणे’ आणि ‘नमतेपणा’.

आयुष्यात या गोष्टी आपल्याकडून सहजपणे कितीशा आणि कशा हाताळल्या जात असतील हे ज्याचं त्यालाच माहीत.कारण आपल्यापैकी बरेच जण एखादी गोष्ट अगदी तुटेपर्यंत ताणून धरतात. तर काही जण कधीच नमतेपणा घ्यायला तयार नसतं. किती ताणावं नी किती नमतं घ्यावं यामध्ये आपण गोंधळून गेलेलो असतो.कुठे आणि किती यामधला फरकच आपल्या लक्षात येत नाही.

आपण काय करतो, आपण नको तिथे ताणून धरतो आणि नको तिथे नमतं घेतो. तर जिथे नमतं घ्यायला हवं तिथे नमतं घेत नाही.मुळातच आपल्याला किती नी कुठे ताणायचं..? किती नी कुठे नमतं घ्यायचं हे ओळखताही येत नाही. उगाचच गाडी चाललेय म्हणून चालू द्यायची. आणि इथेच तर आपण गडबडतो.बुद्धीला गंज लागल्यासारखे आपण वागतो.

या गोष्टी फक्त आयुष्यात असलेल्या Relations मध्येच लागू होतात असं नाही. इतर अनेक गोष्टी आहेत जिथे हे घडतं. वेगवेगळी उदाहरणं आपल्या रोजच्या जगण्यातही आपण अनुभवत असतो.

ताणलं तर तुटणारच….!! हे सगळ्यांना माहीत आहे पण सगळ्यांच्या लक्षात मात्र ते येत नाही. रबर सुद्धा अगदी ताणून ताणून शेवटी तुटतोच.तसच आयुष्यातील गोष्टी ताणल्या तर एक ना एक दिवस त्या तुटणारच.किती आणि कितीदा नमतं घ्यायचं एखाद्याने.त्यालाही काही मर्यादा असतीलच नं…?एकच व्यक्ती सारखं सारखं नमतं घेत असेल तर दुसऱ्या व्यक्तीचं काय..?? ती का नाही थोडं नमतं घेत…??हेच आपल्या लक्षात येत नाही. ते आपण ओळखायला शिकलं पाहिजे.

अगदी नात्यांमध्ये गैरसमज होऊन दुराव्याची दरी निर्माण होते.पण हा झालेला गैरसमज दूर करायचा असेल तर दोघांनी सामंजस्य दाखवले पाहिजे. तरच निर्माण झालेला दुरावा कमी होईल किंवा नाहीसा होईल. इथे दोघांनी ताणून धरलं तर ते नातं कधीतरी तुटणारच. नातं महत्त्वाच वाटत असेल तर घडलेली गोष्ट किती ताणायची हे शेवटी दोघांवरही अवलंबून असतं.आणि ठीक आहे माझं चुकलं म्हणून समोरचा नमतं घेत असेल तर चांगलच आहे. पण समोरचाच जर प्रत्येक वेळी नमतं घेत असेल तर ते योग्य नाही.

इतकच नाही तर कधीकधी आपण स्वतःलाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास करून घेत असतो.आपणही कितीतरी गोष्टी ताणून धरतो.स्वतःसाठी कधी नमतं घ्यायला तयारच नसतो.यामुळे ताणून ताणून गोष्टी तुटून जातात. आणि मग भरकटल्यासारख वाटत रहातं.

मानसिक स्वास्थ्य हळुहळू बिघडायला लागतं. कामाच्या ठिकाणी सुद्धा अशा काही गोष्टी घडतात की मग एखादी गोष्ट ताणून धरली जाते.त्यातून मग वाद विवाद अजूनच वाढत जातात.विविध क्षेत्रात ह्या अशा गोष्टी होतच असतात. अशा वेळी किती ताणायच किती नाही , नमतं घ्यायच की नाही हे आपलं आपण ठरवावं.काही छोट्या छोट्या गोष्टींच निरीक्षण करून एखाद्या ठिकाणी किती ताणावं आणि किती नमतं घ्यावं हे ओळखायला शिका…..——आयुष्याचा अर्धा गुंता सहज सुटेल.

मनामनाने जोडलेली नाती असतात.आणि ती अशा छोट्या छोट्या गैरसमजामुळे दुरावा निर्माण होतो. पण सहज क्षणात तुटावी इतकी ती तकलादू नसतातही.मग ही नाती तुटतात कशी…..????मी का..???मी नाहीच..असं म्हणून दोघांनी जर ताणून धरलं तर नाती टिकणं अवघड आणि तुटणं जास्त सुरळीत होतं. खरच एखादं नातं महत्त्वाच वाटत असेल तर नमतं घेणं गरजेचं आहे. आणि एखादी व्यक्ती तिचा अहंकारच सोडायला तयार नसेल तर अशा व्यक्तीसाठी नेहमीच नमतं घेणं योग्य नाही. हे आपण ओळखायला हवं.

काम महत्त्वाच असतं म्हणून एखादी गोष्ट कितपत ताणली पाहिजे याचा विचार करणं आवश्यक आहे.आणि आपल्या मानसिकतेवर याचा कळत नकळतपणे परिणाम होत असतो.त्यामुळे आपणही आपल्या मानसिकतेसाठी काही गोष्टी ताणून न धरता सोडून द्यायला शिकल्या पाहिजे. स्वतःसाठीच थोडं नमतं घेतल पाहिजे.असं ताणून तुटण्यापेक्षा ताणलच नाही तर जास्त Better आहे.

नमतं घेण्याचीही गरज भासणार नाही. बघा आयुष्य सरळ सहज सोपं असेल….. असे बरेच प्रसंग असतात..त्यापैकी प्रेमविवाहाला सुद्धा परवानगी नसते.आणि अशा वेळी ताणून धरण्यात काही अर्थ नसतो.कुणालातरी नमतं घेऊन पुढे जावच लागतं. आणि ते गरजेचं आहे. कारण आयुष्य आहे .ते कधी कुणासाठी थांबत नाही. म्हणून एकतर कोणतीही गोष्टी ताणू नका.

नाहीतर थोडं नमतं घ्यायला शिका.किंवा एखाद्या ठिकाणी किती ताणायचं आणि किती नमतं घ्यायचं हे ओळखायला शिका.बाकी ताणलं तर तुटणारच… आणि ते जोडल जाईल की नाही हे माहीत नाही. आणि जोडलं गेलं तर ते पूर्ववत असेलच असही नाही.So ……विचार करा…..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!