Skip to content

एखाद्या गोष्टीचा ‘मोह’ होणे म्हणजे नेमकं काय ?

मोह


सौ. भारती गाडगिलवार


“मोह” हा केवळ शब्द नसून ही एक भावना किंवा मनाची अवस्था आहे ज्यात मनुष्य हरखुन जातो. हरवून जातो. त्यातुन त्याला बाहेर पडता येत नाही. मोह म्हणजेच आकर्षण होय. एखाद्या गोष्टीचा मोह झाला तर मग ती आपलीशी करावी यासाठी मनुष्य कायम धडपडत असतो.

मोठमोठ्या राजे लोकांना मोह आवरता आला नाही तर सामान्य लोकांची काय बिशाद आहे. मोह चांगल्या गोष्टी साठी असेल तर जीवनाचं स्वरुप अत्यंत मोहक, सुंदर आणि यशस्वी असतं. परंतु तोच मोह जर वाईट विचारांना खतपाणी घालत असेल तर विनाशास कारणीभूत ठरतो.

उदाहरणार्थ रामायणात सीतेला सुवर्ण मृग पाहून झालेला मोह. सीतेला सुवर्ण मृगाचा मोह आवरता आला असता तर रावण सीतेचे हरण करु शकला असता?

आपल्याला वाटतं की, मोह म्हणजे प्रेमाचाच एक प्रकार होय. खरंच तर आहे. आई वडिलां प्रती असलेलं, परीवारा प्रती असलेलं, मुलांप्रती असलेलं प्रेम म्हणजेच मोह होय.

या मोहासाठीच तर व्यक्ती आपलं सारं आयुष्य समर्पित करतो. पण याच मोहाचे दुसरे स्वरुप म्हणजे एखाद्या वस्तुंवरील मोह, पैसा, सत्ता, जमीन, प्राॅपर्टी यावरील मोह हे विनाशाकडे वाटचाल सुरु करतो. वेळीच आवर घातला नाही तर परीणाम भयंकर देखील होऊ शकतात.

उदा. अधिक पैसे कमावण्यासाठी रेस, जुगार, काळे धंदे याकडे व्यक्ती आकर्षित होतो. सुरुवातीला भरभराटीचे दिवस असतात. पण नंतर अधोगतीला सुरुवात होते. यात व्यक्तीचं जीवन प्रभावित होते. संपुर्ण भविष्य काळ अंधारात जाऊ शकतो.

म्हणूनच जाणकार मंडळी मोहापासून दूर राहण्याचे सल्ले देतात.
काही लोकांना वाटतं मोह म्हणजेच आपल्या मनातील प्रेम होय. परंतु प्रेम आणि मोह यात एक अल्पसे अंतर आहे. ते म्हणजे जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असतं तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या सुखाची इच्छा करतो. त्याला सुख कसं मिळेल यासाठी धडपडतो.

जेव्हा आपल्याला कशाचा तरी मोह असतो तेव्हा त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला सुख मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. मोहाचा आधारच हा स्वतःचा आनंद असतो. परंतु हाच मोह जर सत्ता किंवा एखाद्या पदासाठी असेल तर तो कोणत्याही मार्गाने मिळविण्यासाठी प्रयत्न होतात.

उदा. राजकारण, राजकीय क्षेत्रातील एखादं पद. हे मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी लोकं वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात.

संपत्तीसाठी प्रेम असेल तर आपण मेहनत करु. पण जर मोह असेल तर वडिलोपार्जित संपत्ती काबीज करण्यासाठी भांडणं होतात, चोरी, काळे धंदे इ. गोष्टी घडतात. यातुन आपल्याला प्रेम आणि मोह या शब्दांच्या अर्थाचा उलगडा होतो.

म्हणूनच जाणकार लोकं म्हणतात ते चुकीचे नाही कोणत्याही गोष्टीप्रती/व्यक्तीप्रती प्रेम असावं मोह नाही. प्रेमातुन परमार्थ साधता येतो, तर मोहातुन निव्वळ स्वार्थ.

म्हणूनच सर्वांवर प्रेम करा आणि प्रेम द्या हाच मोहाचा अर्थ आपण लक्षात ठेवावा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!