एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा!
मेराज बागवान
चुकतो तो शिकतो’.आपण हे वाक्य बरेचदा ऐकतो, वाचतो.आणि हे वाक्य अगदी खरेच आहे. ‘चूक’ ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे अनेक बदल आपल्या आयुष्यात तसेच इतरांच्या देखील आयुष्यात घडून येतात. जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण त्या व्यक्तीची माफी मागतो किंवा इतर कोणी चुकले तर ती व्यक्ती आपली माफी मागते.पण चूक करणे आणि माफी मागणे एवढेच पुरेसे नसते.तर त्या चुकीला क्षमा करणे देखील गरजेचे असते.आणि एवढा चांगुलपणा तर प्रत्येकाने अवलंबिला पाहिजे.
जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते , तेव्हा तीच चूक परत होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.काही चुका नकळत होतात , कधी कधी आपल्याला ते पटकन लक्षात देखील येत नाही.पण जेव्हा ही कधी लक्षात येते तेव्हा पटकन आपण सोमरच्याची क्षमा मागितली पाहिजे आणि तीच चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.पण हे झाले आपल्याकडून.आपण जेव्हा क्षमा मागतो तेव्हा समोरच्याने आपल्याला माफ करून पुन्हा पाहिल्यासारखे आपल्याशी नाते ठेवावे , आपल्यावर विश्वास ठेवावा असे आपल्याला वाटते.आणि जो पर्यंत असे होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला चैन पडत नाही. मग इथे अपल्यावरूनच आपण इतरांशी वागले पाहिजे.
म्हणजेच जेव्हा कोणी चूक झाली म्हणून आपल्याकडे क्षमा मागत असेल तर त्या व्यक्तीला त्या चुकीसाठी माफ करता आले पाहिजे.आणि ‘क्षमा करता येणे’ हे काही कमकुवत मनाचे लक्षण असून एक खंबीर आणि सकारात्मक मनाचे लक्षण आहे.कारण , “त्या व्यक्तीने चूक केली आणि मला दुखावले”, हेच मनात जर का कायम ठेवले तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होणार असतो.कारण आपण तिथेच अडकून राहतो आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःचेच पाय रोखून धरतो.म्हणून झाले गेले सगळे विसरून, इतरांना क्षमा करता आली पाहिजे.जेणेकरून आपण मोकळ्या मनाने पुढील वाटचाल करू शकू.
पण क्षमा करणे म्हणजे पुन्हा विश्वास ठेवणे असे देखील नाही.कारण काही वेळेस , काही अशा चुका समोरच्याकडुन झालेल्या असतात की पुन्हा त्याच व्यक्तीवर जर आपण विश्वास ठेवत असू तर ते आपल्या पुढील आयुष्यासाठी योग्य नसू शकते.मग अशा वेळी, फक्त क्षमा करून, आपल्या आयुष्याची वाट वेगळ्या वळणावर घेऊन जाणे गरजेचे असते.म्हणून ‘ चुकीसाठी कोणालाही क्षमा करता आली पाहिजे, पण क्षमा दिली म्हणून आपले आयुष्य पुन्हा धुळीस आपण मिळविले नाही पाहिजे’.
आजकालचे जग खूप अस्थिर आहे.कोण कधी कसा वागेल, कोणाच्या मनात काय येईल हे आपण सांगू शकत नाही.आपले आई-वडील, पती किंवा पत्नी यांना सोडले तर तेवढाच विश्वास आपण जगातील इतर लोकांवर ठेवून नाही चालत.कारण आज आपण बघतो, आपल्याला ज्यांच्यावर जास्त विश्वास असतो तेच आपले मन दुखावतात.आजकाल तर रक्ताच्या नात्यात देखील पहिल्यासारखा विश्वास राहिलेला नाही. कारण आयुष्यात कधी कधी घटनाच अशा घडत जातात की कोणावर विश्वास ठेवावा असे वाटतच नाही .मग अशा वेळी काय करायचे?
आपल्या हातात एकच असते, झाले गेले विसरून त्यातून धडा घेणे आणि पुन्हा पुन्हा तीच चूक न करणे. ‘क्षमा करणे’ हा सर्वात मोठा गुण आहे.त्यामुळे क्षमा तर करताच आली पाहिजे.काही जण खूप जास्त दुखावले गेले असतील तर म्हणतात, “ह्या जन्मात मी त्याला माफ करू शकत नाही”.पण असे म्हणण्याने आपण तीच गोष्ट कायम आपल्या मनात ठेवतो आणि कुढत बसतो.आणि इथेच आपल्याकडून चूक होते.कुणाच्या चुकीसाठी आपण स्वतःचे आयुष्य का खराब करून घ्यायचे.म्हणून त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करून आणि जर गरज पडल्यास त्या व्यक्तीपासून कायमचे दूर होणे इष्ट असते. कारण यामुळे आपलेच भले होणार असते.
क्षमा मागणे म्हणजे , आपल्या चुकीची जाणीव होणे आणि क्षमा करणे म्हणजे , त्या व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देणे.आपल्या आयुष्यात अशीही काही माणसे असतात, जे त्यांची काहीही चूक नसताना देखील आपली माफी मागतात कारण त्यांना माफी मागणे हे नाते तुटण्यापेक्षा जास्त गरजेचे वाटते. मग अशा वेळी , आपण अशा व्यक्तीला मात्र आपल्या आयुष्यात कायमचे स्थान दिले पाहिजे.म्हणून कोण आपली कशा प्रकारची माफी मागत आहे, हे देखील आपल्या लक्षात आले पाहिजे.
कोणी आपली क्षमा मागत असेल तर त्याचे दोन अर्थ होऊ शकतात.एक म्हणजे त्या व्यक्तीकडून खरेच काहीतरी चूक झाली आहे आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्यापासून दूर जायचे नाही म्हणून ती व्यक्ती काहीही चूक नसताना तुमची माफी मागत आहे. म्हणून ‘प्रत्येक चूक ही चूक असतेच असे नाही’.आपल्याला या दोन्हींमधील फरक आणि माणसे ओळखता आली पाहिजे. आणि मग क्षमा करून, कोणाला आयुष्यातून दूर करायचे आणि कोणाला पुन्हा आपलेसे कारायचे हे देखील लक्षात आले पाहिजे.
म्हणूनच , एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा. पण सारासार विवेकबुद्धी मात्र कायम जागृत ठेवा, स्वतःच्या भल्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी देखील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

