Skip to content

एखादी व्यक्ती तुम्हाला फसवणार आहे हे असं ओळखा…

एखादी व्यक्ती तुम्हाला फसवणार आहे हे असं ओळखा…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


फसवणूक….! फसवणूक म्हणजे तरी काय….??आपण एखाद्यावर इतका विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास जेव्हा ती व्यक्ती तोडते तेव्हा एका अर्थाने आपली फसवणूकच झालेली असते.आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींना माणूस फसतो आणि माणूस इतरांनाही फसवतो.आयुष्यात होणारी ही फसवणूकही वेगवेगळ्या प्रकारची असते.आपल्याला कोण , कसं , कधी फसवेल काही सांगताच येत नाही.

खरं तर फसवणूक झाली तर होणारं दुःख ,यातना या खूप कठीण असतात.सहनशक्तीचा अंत पाहणारी ही फसवणूक पुन्हा झाली तर काय…??? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा तर अक्षरशः कोलमडून पडतो आपण. अशी फसवणूक झाल्यावर वाटतं की आपल्याला याचा मागमूसही लागला नाही.अशी कशी माझी फसवणूक झाली..?

वेगवेगळ्या शंका-कुशंकांनी डोकं हादरून जातं.नकोनको ते विचार मनात येतात.त्या फसवणूकीचा घाव कधी भरून न येणाराच असतो.आणि फसवणूक झाल्यावर असही वाटतं की या जगात कुणीच चांगल नाही. अशी फसवी माणसं आपल्या आयुष्यातच का येतात ….?

असा प्रश्न सहज पडतो.फसवणूक करून आयुष्याच माती करून जाणारी ही निर्दयी नी नालायक लोकं अशी फसवणूक का करतात काही कळत नाही. आणि अशी फसवणूक झाल्यावर पुन्हा कोणत्या मनुष्यावर कणभरही विश्वास ठेवावासा वाटत नाही. नवीन माणसांवर विश्वास ठेवताना मन कचरायला लागतं.विश्वास ठेवू की नको..? अशा कात्रीत आपण सापडतो.

नात्यांमध्ये , कामाच्या ठिकाणी , आर्थिक व्यवहारात , किंवा अगदी कोठेही आपली फसवणूक होते. आणि आपणही त्या मायाजालात अडकतो.त्या मायाजालाला फसत जातो.पण मग आपल्याला असं वाटत असतं की या या व्यक्तीने आपल्याला फसवलय तर ते आधी आपल्याला कळाल असतं तर किती बरं झालं असतं.कोण नी कसं आपल्याला फसवतय हे आपल्याला कळायला हवं म्हणजे होणारी फसवणूक टाळता येईल. मग ही होणारी फसवणूक किंवा एखादी व्यक्ती फसवतेय हे कसं ओळखायच थोडक्यात पाहूयात——

हावभाव-हालचाली-देहबोली :-

मनुष्याचे हावभाव बरेच काही सांगून जातात.तो बोलताना त्याच्या बोलण्यातून , वागण्यातून व्यक्त होत असतो.आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय झालेली असते.कोण कसं बोलत असतो हे आपण जाणून असतो.पण मग अचानक जेव्हा बोलण्याची शैली बदलते , वागण-बोलणं सगळं बदलतय असं वाटत असेल तर थोडं थोडं आपण लक्षात घ्यायला हवं. की कुठेतरी पाणी नक्की मुरतय.

(प्रत्येकवेळी तिथे फसवणूक असेलच असं नाही. कदाचित दुसऱ्या गोष्टीमुळेही असं होऊ शकतं.) असं म्हणतात की , डोळ्यात डोळे घालून जेव्हा माणूस बोलतो तेव्हा तो काही लपवत नसतो.पण ज्यावेळी तो नजरेला नजर देणं टाळतो.तेव्हा आपण सावध झालं पाहिजे. बोलताना तर अनेकदा त-त-प-प होतं. तेव्हा कधी कधी तपासून पहाणं केव्हाही फायदेशीर ठरतं.

कोण किती कोड्यात बोलतय त्याचा अंदाजही आपल्याला येतो. इतकच नाही तर..एखादी व्यक्ती आपल्याला खोदून खोदून अगदी खोलात शिरून एखादी गोष्ट विचारायचा प्रयत्न करत असेन तर तिथेही आपण विचार करायला हवा की काही तरी गडबड नक्की आहे. कारण , आपल्याला कधीच माहीत नसतं एखाद्याचा हेतू चांगला आहे की वाईट आहे.

*दुर्लक्ष करणे ,
*टाळाटाळ करणे किंवा टाळणे—

खरं तर दुर्लक्ष करणे आणि टाळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तरीही या दोन्ही गोष्टी कोण फसवणूक करतय आणि कोण नाही हे ओळखायला थोडी मदत नक्कीच करू शकतात. एखादी व्यक्ती सतत आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल , आपल्याला भेटायच टाळत असेल तर अशावेळी ही साधीसरळ गोष्ट नाही हे लक्षात घेऊन आपण आपलं वागणं सावध ठेवलं पाहिजे.

आणि आपणच नेहमी कितीही विश्वासू माणसं असली तरीही सावधगिरी बाळगली पाहिजे.वर सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी असतात जेणेकरुन कोण आपल्याला फसवतय हे लक्षात येते. पण असं जरी असलं तरीही वरील गोष्टी प्रत्येक वेळी लागू होतीलच असं नाही. आणि महत्त्वाच म्हणजे आपल्याला कधीच कुणाच्या मनाचा नेमका अंदाज लावता येत नाही. किंवा तो लावणं एकतर कठीण तरी असतं.कुणाच्या मनात , डोक्यात काय चाललेल असतं याचा थांगपत्ता आपल्याला लवकर लागत नाही. आणि जाता-जाता इतकच सांगेन की तुम्ही स्वतः जागरूक रहायला हवं. कारण कोण , कसं फसवणूक करेल काहीच सांगता येत नाही.

खरतरं एका गाण्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो , ते म्हणजे ” ‘अशी ही बनवा बनवी ‘या चित्रपटातील गीतकार ‘शांताराम नांदगावकर यांनी लिहलेलं गीत—–

हि दुनिया…हि दुनिया…हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा……
फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग………जरा….!!
या गाण्याच्या ओळी बरच काही सांगून जातात.म्हणून नीट विचार करा आणि सावध रहायला शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!