Skip to content

एखादी घटना किंवा व्यक्ती मनातून काढण्यासाठी काय करावे ??

एखादी घटना किंवा व्यक्ती मनातून काढण्यासाठी काय करावे ??


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्य कितीही सुंदर वाटत असेल तरीही या आयुष्याला एक बाजू अशी असतेच जी की कायम नकोनकोशी वाटते. आपण म्हणतो की भूतकाळ फार वाईट…..! असा प्रत्येकाच्या आयुष्याचा कोणता ना कोणता भूतकाळ हा असतोच.कुणाचा भूतकाळ चांगला असतो तर कुणाचा वाईट असतो.भूतकाळ चांगला असेन तर काही प्रश्नच येत नाही पण जर हाच भूतकाळ वाईट ,नकारात्मक नी त्रासदायक असेल तर आयुष्यात कितीतरी प्रश्न सहज उभे राहतात. तो त्रासदायक असणारा भूतकाळ नकोनकोसा वाटतो.अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडून जातात ज्यांचा नंतर आपल्याला खूप त्रास होतो. त्या घटना काही व्यक्तींशी निगडीत असतात तर काही एखाद्या स्थळाशी ,गोष्टींशी निगडीत असतात.

तर ह्या अशा घटना असे प्रसंग ,अशा व्यक्ती सहजासहजी आपल्या मनातून ,आयुष्यातून निघून जात नाहीत. खरतरं त्या आपल्याला काढणं अशक्य होतं ,कठीण जातं.कितीही प्रयत्न केला तरीही त्या घटना क्षणक्षणाला आठवत राहतात.. जाणवत राहतात. अशावेळी समजत नाही काय करायच नी काय नाही…?आपण त्या भूतकाळातच अडकून राहतो.

अनेकदा आपण याला त्याला विचारतो की काय करु काही समजत नाही. कितीतरी जणं वेगवेगळे सल्ले अशावेळी आपल्याला देतात.काहीजण तर तुला “counseling” ची गरज आहे असही सांगतात. पण इतकं होऊनही आपल्याला नेमकं काय करावं हेच समजत नाही. मन अक्षरशः गोंधळून जातं या वादळांमध्ये…!

तर अशावेळी गोंधळून न जाता या परिस्थितीत कोणते पर्याय किंवा “exactly” काय केलं पाहिजे हे आपण काही “टिप्स” मधून पाहूयात…..

१)सर्वप्रथम आपल्या मनाची तयारी करा.

२)आपल्या मनाशी संवाद साधा नी त्याला निक्षून सांगा की तुला काही गोष्टी विसरायच्या आहेत.

३)आणि आज ह्या गोष्टी मनातून काढू….उद्या काढू असं न करता आत्ता या क्षणापासून त्या गोष्टी काढायला सुरुवात करा. कारण आत्ता या क्षणाला सुरुवात केली तर कमीत कमी सुरुवात तरी होईल. नाहीतर आज उद्या करत राहीलात तर ते शक्य होईल असं वाटत नाही.

४)जिथे ज्या ठिकाणी गेल्यावर त्रास होतो त्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळा.कारण आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होत असतात.

५)वेगवेगळ्या छंदात किंवा आपल्या आवडत्या गोष्टीत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.छंदात मन रमलं तर कितीतरी गोष्टी सहज सोप्या होतात.

६)ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी करण्याला प्रथम प्राधान्य द्या.

७)झालेल्या ,घडून गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करणं सोडून द्या.

८)असं झालं -तसं झालं असा विचार करणं वेळीच सोडून द्या. कारण अशा विचाराने केवळ स्वतःला त्रासच होणार आहे.

९)झालेल्या गोष्टीतून काय शिकलात हे लक्षात घेऊन पुढे जायला शिका.आयुष्य एक प्रवासच आहे.त्यामुळे असंख्य वाटा आपली तन्मयतेने वाट पाहत असतात.

१०)भूतकाळात न रमता आपला वर्तमान किती सुंदर आहे हे पाहण्याचा दृष्टीकोन ठेवा. कारण दृष्टिकोन जेवढा सकारात्मक असेल तितकाच त्रास कमी असेल.

११)त्रास देणाऱ्या त्या भूतकाळात रमून आयुष्य असच घालवायच की वर्तमानात जगून भविष्य सुंदर करायचा प्रयत्न करायचा हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि ते प्रत्येकाने समजून घेतल पाहिजे.

१२)आयुष्य केवळ ती एक घटना होती किंवा आयुष्यात केवळ तीच व्यक्ती महत्वाची होती…तिनेच मला त्रास दिला किंवा ती सोडून गेली असे विशिष्ट प्रकारचे “comfort zone” तयार करून घेऊ नका. कारण आयुष्यात कितीतरी गोष्टी असतात. कितीतरी व्यक्ती नव्याने आयुष्यात येत असतात.

१३)एकाच ठिकाणी गुंतून पडू नका.एकाच ठिकाणी घुटमळत बसू नका.

१४)योगासने ,प्राणायाम ,सकाळच्या -संध्याकाळच्या मोकळ्या हवेत फिरून मनाला “Refresh” करा.

१५)आवडणारी जुनी-नवी गाणी ऐका.

१६)मनाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठिकाणी थोडे दिवस फेरफटका मारून या.

थोडक्यात इतकच सांगेन की…मनाला ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो , मनाला शांत नी हलकं वाटतं अशा गोष्टी करण्याला प्राधान्य द्या. जे जे आवडतं ते ते करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत रहा.आपल्याला आयुष्य जगायचय.आयुष्याचा अर्धवट राहिलेला प्रवास पूर्ण करायचाय हे लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे हे मनपटलावर एकदा कोरूनच घ्या. पहा…लवकरात लवकर अशा वादळांमधून बाहेर यायला नक्कीच मदत होईल.

बघा , प्रयत्न करा..आवडल्यास नक्की इतरांपर्यंत या टिप्स शेअर करायला विसरू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एखादी घटना किंवा व्यक्ती मनातून काढण्यासाठी काय करावे ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!