एखादा दोष आपलं भलं करत असेल तर तो अभिमानाने मिरवावा.
मेराज बागवान
ह्या जगात कोणीच परिपूर्ण नसतो.पण काही खूप गुणी व्यक्ती असतात, तसेच त्यांच्यात काही दोष देखील असतात. पण कधी कधी हे दोषच त्या व्यक्तीचे भले करीत असतात , किंवा हे दोषच त्यांची ताकद असतात. मग हा दोष जरी असला तरी देखील तो का नाही मिरवायचा अभिमानाने ? दोष आहे म्हणून , कमीपणा का वाटून घ्यायचा ? त्या गोष्टीचा आणि त्या दोषाचा.
जसे की , काही व्यक्ती खूप बोलक्या असतात , पण इतर जण त्यांना ‘बडबडा/ बडबडी ‘,’गप्पा ठोकणारा’ म्हणत असतात.पण त्यांच्या ह्या स्वभावामुळे , ती माणसे लवकर जोडू शकतात.जर अश्या व्यक्ती व्यावसायिक असतील तर मग तर त्यांना त्यांच्या ह्या ‘बडबड्या’ स्वभावाचा चांगलाच उपयोग होतो. त्यांचा व्यवसाय वाढीस लागू शकतो. ते त्यांच्या व्यावसायाची चांगली जाहिरात देखील करू शकतात. मग इथे त्यांना कोणी ‘गप्पा थोडकणारा’ म्हणले तरी त्यात वाईट ते काय? त्यांनी त्यांचा हा स्वभाव नक्की मिरवला पाहिजे.
काही व्यक्ती खूप अबोल असतात. पण जरी अबोल असल्या तरी देखील शांत राहून ते कृती करून दाखवीत असतात. त्यांना वाटते , न बोलता काम केले तर लवकर आणि वेळेत चांगले काम होऊ शकते.काही कार्यालयांमध्ये अशा व्यक्ती असतातच , त्यांच्या ह्या स्वभावामुळे ते आपल्या कामात यश संपादन करतात आणि वरिष्ठांची शाबासकी देखील मिळवतात. मग त्यांचा ‘अबोलपणा’ त्यांनी का मिरवू नये ?
काही जण खूप ‘रागिष्ठ’ असतात , खूप राग राग करतात.सगळे जण त्यांना ‘हिटलर’ वगैरे अशा नावाने संबोधतात. पण ही राग येणारी माणसे च काही तरी करून दाखवतात नक्की.जसे की , एखादा ‘बॉस’ असेल तो खूप राग राग करत आहे , पण त्यामुळे ऑफिस चे काम देखील चोखरीत्या पार पडत आहे. सर्व जण शिस्तीत , कटिबद्ध राहून काम करत आहेत, ते केवळ त्या ‘बॉस’ च्या ‘रागिष्ठ’ स्वभावामुळेच.मग ‘राग’ जरी दोष असला तरी तो योग्य कारणासाठीच बाहेर जर पडत आहे, तर तो जरूर मिरवावा.
बरीच माणसे इतरांना सदैव मदत करणारी, कधीच कोणालाच ‘नाही’ म्हणत नाहीत.मग इतर लोक त्यांना म्हणतात , ‘की तू खूप भोळसट आहे, सगळे तुझ्या ह्या स्वभावाचा फायदा घेतात’.पण दुसरीकडे, त्याच्या ह्या स्वभावामुळे, अनेक जण त्याला कायम लक्षात ठेवतात, आदर करतात आणि त्याच्याशी कायम मैत्री धरून असतात.मग त्यांनी त्यांचा हा स्वभाव कायम जोपासायला हवा.
काही अशा ही व्यक्ती असतात, ह्या नेहमी इतरांचे कौतुक करतात, एखाद्याने चांगले काम केले, कुणाला बक्षीस मिळाले, कोणी यश संपादन केले, कुणी त्यांना मदत केली तर आवर्जून त्यांचे ‘आभार, धन्यवाद’ मानतात.पण त्यांच्या जवळची म्हणतात, तुला कोणी विचारत नाही कधी आणि तू का त्यांच्या मागे मागे करत आहेस.पण ह्या व्यक्तींच्या मनात इतरांनी आपल्याला केलेल्या मदतीची जाण असते.तसेच कुणी काही चांगले केले तर त्यांचे मनापासून कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. मग त्यांनी हे मिरवायलाच हवे ना.
काही ‘दुर्मिळ’ व्यक्ती असतात.हे नेहमी सगळ्यांपेक्षा वेगळे कपडे परिधान करीत असतात, जसे की जुन्या काळी घालत असत तशी पॅन्ट परिधान करणे, जुन्या चित्रपटांमधील नट-नट्या जशी केशरचना करायचे तसे करणे.किंवा मग वेगळा , रंगीबेरंगी हातरुमाल बाळगणे, चित्रविचित्र सदरा घालणे इत्यादि.अशा सर्व लोकांची काही प्रमाणात चेष्टा होते. पण ह्यांच्या सारखे हेच असतात.मग त्यांनी हे वेगळेपण का नको मिरवायला?
काही मुलींनी लगेच रडायला येते.मग त्यांना सगळे चिडवतात ‘रडू बाई’ . पण दुसऱ्याच क्षणी ह्या रडणाऱ्या मुलीच खूप मोठमोठी आव्हाने झेलत , मोठे यश संपादन करीत असतात.ते अश्रू च जणू त्यांना ताजेतवाने करीत असतात आणि डोळे पुसून पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असतात.
असे सगळे काही दोष असतात जे वाटतात दोष ,पण खरे तर ती त्या व्यक्तीची खरी ताकद असतात.मग ही वरवर नकारात्मकता जरी वाटली तरी त्याचे स्वतःसाठी का होईना सकारात्मकतेत आपण रूपांतर करूच शकतो ना? किंबहुना आपण ते केलेच पाहिजे.कारण लोक , कोणी कसे ही असले तरी देखील नावे ठेवायला चुकत नाही.मग आपण का मागे हटायचे?
आपण पण जरा जगुयात ना आपल्याच धुंदीत.मग जसे नावे ठेवणारे आहेत, तसेच आपल्या ह्या वेगळेपणावर भाळणारे देखील आहेतच की. कोणाला आपला कोणता दोष आवडेल, आणि कोण आपल्या त्या दोषाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच, आपला दोष जर आपले भले करतोय तर तो अभिमानाने मिरवुयात.
चला जगुयात मुक्तपणे स्वतःच्या ह्या दोषासह आणि चला मिरवूयात हा दोष दिमाखातच आणि अभिमानाने…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


