एक शांत मन कोणत्याही दुर्दैवी प्रसंगासाठी एक हत्यार आहे.
मोनिया जे.
विश्वासघात आणि अविश्वास… हे दोन्ही, एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल.. किंवा मग दोन मित्र… कि सावत्र बंधू? माहीत नाही. पण ते मात्र जोडीने त्यांचं काम करतात तेही अगदी प्रामाणिकपणे.
एक ‘विश्वासघात’ झालेला मनुष्य, पुढे चालून त्याच्या आयुष्यात आलेल्या ‘विश्वासपात्र’ व्यक्तींबद्दलही अविश्वासचं बाळगायला लागतो. कारण पुनश्च विश्वासघाताची भिती घर करून त्याच्या मनात बसलेली असते.
अशावेळेस त्या व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा यायला लागतो. नात्यांना नकारात्मकतेची झळं बसायला लागते. अतिविचाराने मन त्रस्त होते. मग मानसिक समाधान मिळावं, कुठंतरी हे चलबिचल मन शांत व्हायला मग अशा व्यक्ती कुठेतरी व्यसनं, वाम मार्ग, वाईट संगतीत भरकटले जातातं. तिथं मिळणाऱ्या क्षणिक आनंदाचे, (मग कैक या अभासी , अशाश्वत, असत्य आनंदात तल्लीन होऊन, एखाद्याच्या जाळ्यांत फसलेही जातात) गुलाम होऊन बसतात. सर्व विनाशेच्या मार्गावर चाललयं असं समजून, हताश झालेले काहीजण मग शेवटी ‘आत्महत्या’ हा दुःखद पर्याय निवडतात.
जे आजकाल प्रत्येक वयोगटात काही ना काही हताशतेच्या कारणी सर्रास घडत असलेलं दिसून येत आहे. जे खरंच खूप दयनीय आहे.
तर काही व्यक्ती या सर्व प्रकरणातून सावरायला पूर्ण मनोबळं पणास लावतात खऱ्या… परंतु या सर्व गोष्टींमुळं ग्रासलेली व्यक्ती, या क्लिष्ट अवस्थेतून बाहेर पडत असतेच, तोवर…
हा शंके-कुशंकेचा विषाणु, त्या दुसर्या , विश्वासपात्र व्यक्तीच्या मनापर्यंत ‘अविश्वास’ या रोगाची लागण करतो, आणि … अजून एका ‘नकारात्मक’ व्यक्तिमत्वाला जन्म देतो.
आणि अशा प्रकारे, विश्वासघात आणि अविश्वास यांचा जिवघेणा खेळ काही संपता संपत नाही.
त्यातल्या त्यात आजकाल , अगदी सहज खोटं बोलून जाणं, सहजचं मजा मस्करी म्हणून आपल्या व्यक्तीची तुलना दुसऱ्यांशी करत , अविश्वासला बळी पडण्याला पुरकं असं असू शकतं. किंवा मग आपली बाजू चुकीची असली तरी , फुकटच्या गर्वाच्या हिमतीवर, ती चुक , चुक कशी नाही, किंवा आपली बाजूचं कशी योग्य, बरोबर हे स्वतःबरोबरच इतरांनाही पटवून देणं, म्हणजे आजकाल शेबंड्या पोराच्या , ‘दाएँ हातका खेल़’ झालायं जणू!
अशा या साऱ्या भावनिक गुंतागुंत होऊन, हाताश अवस्थेत, ‘धार्मिकता’ हाच योग्य मार्ग! असं मला वाटतं. सृष्टीकर्त्याचं स्मरण, भक्ती भावं हे सर्व खरंच एकाद्याला अफाट मानसिक बळं देतं… भूतकाळातील चुकांवर मात करायला… आनंदी राहण्याचा योग्य मार्ग निवडायला… आणि जीवनाची वाटचालं योग्य दिशेने करता यायला…!
काहीजणं एखाद्याची ही अशी घालमेल, मानसिक स्थिती , दयनीय अवस्था बघून , ‘भोगं कर्माचे ‘ म्हणून पुढं निघून जातातं.
हो , असतील ही भोगं कर्माचे त्याच्या, पण मग ते तुमच्या समोर, त्या व्यकतीद्वारे देवाने का आणलेत? कि तुम्ही काहीतरी सत्कर्म करा…नायतर मग तुमची अशी अवस्था न होण्याला एक कारण कर्माकडे जमा होऊन जाईल. अस ही असू शकत ना?
बाकी मग त्या व्यक्तीकडे पश्चाताप, त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन! अतूट इच्छाशक्ती! निस्वार्थ भक्ती भाव! आणि हृदयापासून सृष्टीकर्त्याला मारलेली हाक! म्हणजेचं प्रार्थना या सर्वांत एक विशेष अशी अनैसर्गिक शक्ती आहे, जी बद्नशिबाचे डावं पेचंही पलटून लावू शकते!
सृष्टीकर्ता नक्कीचं दीन मनाची आर्त हाक ऐकून, त्याच्या सृजीत अशा या सुंदर सृष्टीद्वारेचं खचलेल्या व्यक्तीमत्वाला पुन्हा एकवार प्राण देऊन जीवनदान देण्यासाठी नक्कीच सरसावतो!
पण अशावेळेस, निरंतर कृतज्ञ राहून दानधर्म करणे, तसेच ‘समाजाचं देणं लागतचं’ म्हणून काही सामाजिक कार्य, उपक्रमात कमीत कमी खारीचा वाटा उचलणे.
एखाद्यासोबतं दोन शब्द मायेचे बोलणे, मानसिक आधार देणे. योग्य संवाद साधणे, आपल्या सारख्याचं खितपतं पडलेल्या अवस्थेतून त्यालाही बाहेर काढण्याचा निदान प्रामाणिक प्रयत्न करणे. हे सर्व कमी लेखून चालणार नाही बरं!
आणि अशा समर्पक गोष्टीमुळं एखाद्याला दिलेला आनंद याची तोडचं नाही! अथवा या सुखाची तुलना इतर कोणत्याही अशाश्वत, असत्य , वायफळ अशा क्षणभंगुर सुखाशी होऊ शकत नाही!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


