“एक पूर्ण सत्य! जगण्याला आज प्रिय असतो, मग का आपण तो उद्यावर ढकलतो??”
मधुश्री देशपांडे गानू
“आनेवाला पल.. जानेवाला हैं
हो सके तो इस में जिंदगी बिताओ..
पल ये भी जानेवाला हैं..
“गोलमाल” या हिंदी चित्रपटातील श्री. किशोर कुमार यांनी गायलेले अप्रतिम सहजसुंदर गीत. आजचा, आत्ताचा क्षण फक्त आपला आहे. तो भरभरून आयुष्यभराचा जगून घ्या. कारण हा ही निघून जाणार आहे. किती छान सांगितलं आहे..
माणूस जन्माला आल्यापासून आत्ताच्या क्षणापर्यंत असंख्य, अगणित अनुभवातून, प्रसंगातून, सुख-दुःखाच्या ऊन पावसातून जात असतो. जसजसा काळ पुढे सरकतो तसतशा या कडू गोड आठवणी बनून राहतात. आणि यातच आयुष्याचा प्रवास सुरू असतानाच पुढे काय होणार? भविष्यकाळाची उत्सुकता, भीती, चिंता ही असते. आपलं आणि आपल्या कुटुंबाचे भलं व्हावं, त्यांचा भविष्यकाळ उज्वल, यशस्वी, सुरक्षित असावा यासाठी तो तनमनाने अखंड कार्यरत असतो.
आज प्रचंड वेगवान, गुंतागुंतीचं, पैसाधिष्टीत आयुष्य जगताना माणूस फक्त पैशामागे, यशामागे अविरत धावतोयं. सगळेच “Rat Race” चा अविभाज्य भाग आहेत. भूतकाळात रमताना आणि भविष्याची अतिचिंता याने त्याची दमछाक होते. उद्या सुरक्षित करण्यासाठी माणूस आज ऊर फुटेस्तोवर धावतोयं. आणि या सगळ्या जीवघेण्या कसरतीत तो आज जगायचं संपूर्णपणे विसरलायं.
एक साधं उदाहरण देते. मनीषचे वडील वृद्धापकाळाने निधन पावले. याचा त्याच्यावर अत्यंत परिणाम झाला. वडिलांच्या जाण्यामुळे आलेले पोरकेपण, निर्माण झालेली पोकळी हे कोणत्याही वयातल्या व्यक्तीला अत्यंत दुःखदायक असतं. पण मनीषची रात्रीची झोप नाहीशी झाली. त्याचं खाणं पिणं कमी झालं. त्याच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर याचा विपरीत परिणाम दिसू लागला. कशाची तरी अनामिक भीती वाटू लागली. मग मात्र त्याने समुपदेशकांची मदत घेतली. तेव्हा लक्षात आलं, वडिलांच्या जाण्याला त्याने स्वतःलाच जबाबदार धरलं होतं.
अत्यंत अपराधीपणाची भावना त्याला पोखरत होती. आणि याचं कारण अगदी क्षुल्लक होतं. वडिलांविषयी आदर, प्रेम, सेवाभाव असणारा मनीष कधीतरी साध्या कारणावरून त्यांच्यावर चिडला होता. चिडून बोलला होता. आपण बाबांशी नीट वागलो नाही ही अपराधीपणाची भावना त्याला खात होती. काही सोप्या उपायांनी आणि समजावून सांगितल्यावर मनीष वर सकारात्मक परिणाम दिसू लागले. त्याचं दैनंदिन जीवन व्यवस्थित होऊ लागलं.
आपण सामान्य माणसे आहोत. सगळ्या भावभावनाना व्यक्त होणं गरजेचं आहे. राग तर प्रखर भावना आहे. कधीतरी तो व्यक्त होतोच. पण त्याच भावनेत आणि प्रसंगात अडकून राहणं हे सर्वस्वी अपायकारक आहे. भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या घटनेसाठी स्वतःला अपराधी समजणं हे तर अत्यंत चूक. स्वतःला माफ करू न शकल्याने माणसं भूतकाळातच अडकतात. आणि वर्तमान काळात आत्ता या क्षणी भरभरून जगू शकत नाहीत.
घडून गेलेल्या भूतकाळ कधीही परत येत नाही. आपण मात्र यात अडकून आपलं आजचं जगणं झाकोळून टाकतो. “झिम्मा” चित्रपटात एक प्रसंग आहे. इंग्लंडमध्ये भव्य अशा सुंदर चर्च समोर उभं राहताना, त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्याऐवजी निर्मला कबीर ला विचारते. “तुम्हीं मिनी शिर्डी, मिनी बालाजी पाहिलं का?” तेव्हा तो उत्तर देतो, “तुम्ही हे मला विचारत आहात?? हे जे समोर दिसतंय त्याचा भरभरून आस्वाद घ्या ना!” म्हणजे आत्ताचा क्षण आपण जगतच नाही.
शारीरिक दृष्ट्या उपस्थित असलो तरी मन भूतकाळात तरी रमतं नाही तर भविष्यकाळात तरी जातं. आत्ताचा हा क्षण, आत्ता आपण जे करतोयं, आता आपल्यासमोर असणारी माणसं, आत्ता पंचेंद्रियांना जे जाणवतंय त्याचा पुरेपूर उपभोग, आनंद आपण खरंच घेतो का?? आणि घेत नसू तर याला जगणं तरी म्हणायचं का???
पैशाने उद्याची तरतूद करताना आज आपण कुटुंबासमवेत छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेऊ शकत नाही. “आज वेळ नाही नंतर बघू.” असं किती सहज म्हणतो ना आपण! आणि किती वेळा स्त्रियाही लग्नाला चाळीस चाळीस वर्ष झाली तरीही नवर्याची, मुलांची, कामाची काहीतरी क्षुल्लक कारणं देत राहतात. एखादी मित्र-मैत्रिण, नातलग तुम्हांला जेव्हा प्रेमाने भेटायला बोलावतात तेव्हा तुम्हीं किती
कारणं देता ना! माणसाचा आजचा भरवसा राहिलेला नाही. उद्याचा तर नाहीच नाही.. आयुष्य क्षणभंगुर आहे. भयंकर कोविडकाळात तरी हे आपण शिकलोयं का? कित्येक वेळा एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्हीं कधीतरी भेटायचं वचन दिलेलं असतं. आणि ती वेळ कधीच येत नाही. कारण ती व्यक्तीच आज अस्तित्वात नाही.
मग तुमच्याकडे फक्त पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीच उरत नाही. आणि आयुष्यभर ही हुरहूर तुम्हांला लागून राहते. कितीतरी नाती आपण अहंकारापायी, खोट्या प्रतिष्ठेपायी, क्षुल्लक मतभिन्नतेमुळे तोडून टाकलेली असतात. ती नाती ती माणसं महत्त्वाची आहेत, आता या क्षणी ती नाती परत जोडावीत असा क्षण कधी येतच नाही ना!!
प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सांगतात, “Here and Now”… आत्ता या क्षणी फक्त हा क्षण महत्वाचा आहे. अनेक जवळच्या व्यक्तींनी आपल्या भावना दुखावलेल्या असतात. कुणाचा प्रेमभंग झालेला असतो. कोणी स्वतःचे प्रेमाचं माणूस गमावलेलं असतं. या प्रसंगांभोवती माणसांभोवती आपण रमतो. ते आठवून दुःखी, निराश होतो. अशा वेळी मनाला एकच प्रश्न विचारायचा, “हे सगळं आत्ता या क्षणी मला उपयोगी आहे का?” जर याचे उत्तर “नाही” आलं, तर ताबडतोब हे विचार थांबवायचे. तशी सवय विचारांचं सुनियोजन करायलाच हवं.
आत्ताचा हा क्षण मग तुम्हीं कितीही साधं सोपं काम करत असाल, अगदी स्वयंपाक करणारी स्त्री, नोकरी, रोज रोज तेच काम करणारा व्यावसायिक कोणीही असा, पण फक्त आत्ताचा क्षण मन लावून भरभरून, संपूर्णपणे, शरीर मनाने, आनंदाने जगून तर पहा. प्रयत्न तर करुन पहा. तुमचं तुम्हांलाच कळून येईल की आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही आनंदी होता… असता… हा आताचा क्षणच पूर्ण सत्य आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup sunder 👌👌