Skip to content

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात.


मेराज बागवान


आपली प्रत्येकाचीच जडणघडण वेगवेगळ्या वातावरणात झालेली असते. कौटुंबिक पार्श्वभूमी निरनिराळी असते.आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो.आणि त्यानुसार आपले प्रत्येकाचे स्वभाव ,मते , दृष्टिकोन हे अर्थातच वेगळे असतात.

आणि हा ‘वेगळेपणाच’ आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो.म्हणूनच, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात.

तुम्ही जर का खूप बडबडे असाल तर काही जण तुम्हाला म्हणतील ,”काय हा/ ही किती बोलतो/बोलते.तोंड गप्पच नाही”.त्यामुळे काही वेळेस तुम्हाला असे देखील वाटू शकते की “अरे आपण काही चुकीचे करीत आहोत का?”.

पण दुसरीकडे तुमच्या ह्या स्वभावामुळे तुमचा जनसंपर्क चांगला आहे, तुम्ही खूप सामाजिक आहात आणि याचा उपयोग तुम्हाला अडी-अडचणीत होतोच.म्हणूनच तुम्ही काही जण म्हणत आहेत म्हणून तुमचे वेगळेपण नाकारू नका. जर का ते खरेच तुमच्या आणि इतरांच्या देखील भल्याचे असेल तर ते वेगळेपण , तो ‘बडबडा’ स्वभाव तुम्ही कायम जपला पाहिजे.

काही जण नेहमीच इतरांना मदत करीत असतात.खूप ‘सहकार्य’ करीत असतात.यामुळे काही जण तुम्हाला म्हणतात देखील किंवा टोमणे देखील मारतात.जसे की , ” हिला काही कामधंदा नाही वाटते “. पण तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या उपयोगी येता ते तुमच्या मदतीमुळे कायम तुमचे ऋणी असतात.म्हणूनच तुमचे हे वेगळेपण तुम्ही ओळखून ते जपले पाहिजे.कारण त्या एका गोष्टीमुळे तुम्ही वेगळे आहात.

कोणतीच व्यक्ती प्रत्येक बाबतीत ‘सरस’ नसते.कोणी साहित्य क्षेत्रात उत्तम असतो.तर कोणी अभिनय क्षेत्रात. कोणी तंत्रज्ञानात पारंगत असतो तर कोणी आर्थिक नियोजनात.कोणाकडे चांगली विक्री कला असते तर कोणाला इतरांना प्रेरणा देण्याची कला अवगत असते.कोणाला उत्तम संभाषण अवगत असते तर कोणी पाककलेत पारंगत असतो.

कोणी गाणे चांगले म्हणतो तर कोणी संगीत देण्यात पारंगत असतो.असे अनेक गुण, कौशल्ये , वैशिष्ट्ये प्रत्येकाकडे असतात. आणि हेच वेगळेपण तुम्हाला साधून आयुष्य जगायचे असते.अमुक एका व्यक्तीला अमुक एक गोष्ट खूप छान जमते पण तुम्हाला ती अजिबात जमत नाही.

याचा अर्थ असा नाही की , तुमच्यात काहीच गुण नाहीत किंवा तुम्ही ‘ढ’ आहात असे नाही.तुम्हाला ती गोष्ट नाही जमत पण तुम्हाला त्याहून दुसरी गोष्ट खूप छान जमते जी इतरांना सहसा जमत नाही.आणि तुम्ही नेमका हाच विचार लक्षात ठेवला पाहिजे आणि कायम लक्षात ठेवले पाहिजे की , ” मी इतरांपेक्षा वेगळा आहे”.

आता आपण थोडया मानसिक गोष्टींकडे वळूयात.ज्या आपल्या मनाशी निगडित आहेत. काही जण खूप भावनिक असतात तर काही जण खूप व्यावहारिक.दोन्ही गोष्ट आपापल्या जागी अगदी उत्तम आहेत.

जर का तुम्ही भावनिक आहात तर तुम्ही इतरांना खूप जपता, त्यांची काळजी घेता, ते जर अडचणीत असतील तर तुम्ही त्यांना लगेच मदत करता. त्याने मन एक प्रकारे जपण्याचा प्रयत्न करता आणि ते कधी दुखावले जाणार नाहीत याची देखील काळजी घेता आणि समजा कधी कोणी तुमच्यामुळे दुखावले गेलेच तर लगेच तुम्ही माफी देखील मागता.

हा तुमचा भावनिक स्वभाव दुसऱ्या कुणाचा असेलच असे नाही.काही जण तुम्हाला म्हणतील ,”स्वतःला तू कमी समजत आहेस.स्वतःची किंमत कमी करून घेत आहे “वगैरे…पण तुम्हाला जर वाटते आहे, तुमच्या ह्या स्वभावामुळे तुम्ही माणसे जिंकत आहात. काही मनातील सांगायचे असेल तर लोक प्रथम तुमचीच निवड करतात तर मग बाकी सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचे हे वेगळेपण ,’भावनिक मन’ कायम जपले पाहिजे.

तसेच ‘व्यावहारिक’ वागण्याचे देखील आहे. तुम्ही जर व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत असाल तर तुम्ही कधी फसले जाणार नाही. किंवा जरी काही तसे झाले तर तुम्ही त्यातून पटकन मार्ग काढू शकता.त्यामुळे कोणी तुम्हाला जरी म्हणाले की ,”तूझे फारच प्रॅक्टिकल असते बघ’तर राग येण्याचे काहीच कारण नाही.उलट तुम्ही ते वेगळेपण जपले पाहिजे.

हे सर्व झाले ‘वेगळेपणा’ बद्दल. हाच वेगळेपणा तुम्हाला समाजात ‘उठून’ दिसण्यासाठी मदत करतो.जर त्या वेगळेपणा मुळे नेहमी सकारात्मतक गोष्टी घडत असतील तर ते ‘वेगळेपण’ सर्वांच्याच भल्याचे असते.पण काही वेगळेपण जसे की ‘अति हट्टीपणा’ ,’अति राग’ ,’अति विचार’ अर्थातच स्वतःसाठी तसेच इतरांसाठी घातक असतात ज्यामुळे आयुष्यात नकारात्मकता पसरते.म्हणून हे ‘वेगळेपण’ मात्र वेळीच काबू केले पाहिजे.

‘अरे मी असा का नाही’, ‘मी हिच्यासारखी का नाही’, ‘मी अशी वागते तर तसेच समोरचा का नाही वागत, ‘माझे जसे विचार आहेत तसेच त्याचे का नाहीत’ अशी वाक्ये काहीच उपयोगाची नसतात.कारण प्रत्येक व्यक्ती ही ‘एकमेव’ ,’दुर्मिळ’ असते.म्हणूनच स्वतःबरोबरच इतरांचे वेगळेपण देखील मोठ्या मनाने स्वीकारता आले पाहिजे. त्याचा आदर करता आला पाहिजे.आणि हे जमले तर आयुष्य काहीच कठीण नाही.

कायम लक्षात असू द्या , तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. आणि त्यामुळेच तुमची जडणघडण विधात्याने त्या अनुषंगाने केली आहे.म्हणून तक्रार करण्यापेक्षा ‘स्वीकार’ करण्याचा दृष्टिकोन अंगी ठेवा.आयुष्य सुखात आणि मुख्य म्हणजे ‘शांततेत’ जगू शकाल.

स्वतःची काळजी घ्या….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!