एकेकाळी हे मित्रच सर्वस्व वाटत होते, हल्ली आयुष्य एकट्यातच चाललय, असं का वाटत राहतं…?
हर्षदा नंदकुमार पिंपळे
हल्ली असच वाटतं…… दिवसागणिक आयुष्याची वयं वाढत जातात..आयुष्यातील कितीतरी सांजवेळा अशाच सरतात.पहाट होते पण रोज रोज ती डोळ्यांना दिसत नाही.अंगणातील प्राजक्त सुद्धा बोलका वाटत नाही. सगळ्या आठवणी नको त्या वेळी म्हणजेच भर दुपारी किरणांनी मारा करावा तशा मारा करतात.आणि सगळं काही संपून टाकतात. आणि मग नकोसा तरीही हवाहवासा हा पुन्हा सुरू होतो एक प्रवास आयुष्यातील नव्या संध्याकाळचा……जिथून ज्या दिवशी जन्म घेतला त्या किनाऱ्यावरून……..!!
असच काहीसं होतय या आयुष्यात.आयुष्य पूर्वावस्थेसारख सहज सुंदर वाटत नाही. आयुष्यात एक काळ असा होता की तेव्हा मित्र म्हणजे सर्वस्व वाटायचे.पण हल्ली ते मित्र असूनही आयुष्य एकट एकटं वाटतय. असं तुमच्याही आयुष्यात होत असणार यात शंकेला कुठेच जागा नाही. पण असं का वाटतय याचा कधी शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे का….?नसेल तर चला आपणच शोधूयात आपल्याला असं का वाटतं ते……
आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांशी आपली नाळ जोडली जाते.त्यापैकी एक म्हणजे मैत्री…! आयुष्याच्या एका उंबरठ्यावर ही मैत्री म्हणजे जणू स्वर्ग असं प्रत्येकाला वाटतं.अगदी बालपणापासूनची ते आयुष्याच्या प्रवासात केव्हाही होणारी ही मैत्री म्हणजे आयुष्यातील एक हळवा बंध जो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.शाळा असो वा कॉलेज , ऑफिस असो वा प्रवास करणारी बस….अगदी कुठेही ही मैत्री होऊ शकते.
या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी मित्र-मैत्रिणी भेटत असतात. आता सगळेच काही आपल्याला आवडतात असं नाही. आणि कुणीच आवडत नाही असही काही नाही. चारपैकी एकाशी तरी आपली चांगली गट्टी जमतेच.त्यांच्याशी खूप सहजगत्या आपलं एक वेगळ बॉन्डींग तयार होतं.
आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कितीतरी गोष्टी सहज त्या मित्रांसमोर मांडत असतो.कधीतरी कट्ट्यावर बसून एकत्र घालवलेले क्षण आठवून पुन्हा पुन्हा हसत असतो.आणि हे सगळं इथपर्यंत मर्यादित राहत नाही तर हेच मित्रमैत्रिणी कधी आपलं एक आयुष्य बनून जातात तेच कळत नाही.
“मित्रमैत्रिणी म्हणजे माझा श्वास… त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.” असही बोलायला आपण कमी करत नाही. कारण ते मैत्रीचे बंधच इतके घट्ट असतात की त्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे एखादी भकास झोपडी वाटते. असं म्हणतात आयुष्य गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगावं….अगदी असच कधी काळी आपण ह्याच मित्रांच्या टोळ्या घेऊन जगत होतो.आयुष्यातील वेदनांचा त्यांच्यामुळे सहज विसर पडायचा.
पण आता चित्र मात्र काहीसं वेगळं आहे. मित्र सोबत आहेत पण तरीही आयुष्य एकटं एकटं वाटतं.खरं सांगायच तर जसजसे आपण मोठे होत जातो तसतशा आपल्या खांद्यावरील जबाबदाऱ्याही वाढत जातात. आपल्या जगण्याच्या ‘priorites’ ह्या बदलत राहतात.
आधी जितका वेळ आपण आपल्या मित्रांसमवेत घालवायचो तितका वेळ आता सहसा एकत्र घालवता येत नाही. प्रत्येकाच घड्याळ हे बदलत चाललय. माझ्याकडे आता फक्त एक तास आहे मला लवकर निघायचय असं आपण बोलतो.आयुष्यातील कितीतरी गोष्टी हल्ली मनातच दडून ठेवाव्या लागतात.
त्या हसत हसत अशा हल्ली कुणासमोर सहजासहजी येतच नाहीत.मैत्री नावाच्या कट्ट्यावर मित्रमैत्रिणींची शाळा आता पूर्वीसारखी भरत नाही. ओस पडत चाललेत सगळेच कट्टे….आता पुन्हा ते दिवस नाहीत या विचारानेच मन बैचेन होतं.मन एकांतात खायला उठतं.आधी कसं एकत्र हसायच , रूसायच…भांडायच नी पुन्हा पुन्हा मनवायच… अशी ती मैत्रीची जादुई दुनिया होती.
मनसुद्धा तशी तेव्हा निरागस होती.आता मात्र एकटच हसायच….रूसायचा तर प्रश्नच नाही. आणि भांडण झाल तर थेट संवाद संपतो.नातं तुटतं.पूर्वीसारखं मनवन वगैरे आता जुनं झालं.सॉरी बोलून पुन्हा गळ्यात गळे घालणारी मैत्री राहीली नाही. निरागस मनाला अहंकाराची शिंग केव्हा फुटली कळलच नाही.कदाचित या सगळ्या गोष्टींची कधी आपल्याला फारशी सवय नव्हती. आणि आता मात्र हे असं जगणं सवयीचच झालं आहे.
आयुष्य जसं चाललय तसं आपण स्वीकारतोय.आपण आणि आपलं काम…..थोडक्यात आपण आपल्याच आयुष्यात गुंतत चाललोय. इतरांना आणि आपल्यालाही एकमेकांकडे लक्ष द्यायला म्हणावा तितका शांत असा वेळ आता नाहीये. कामापुरत एखादं बोलणं होतं पण सहज म्हणून हल्ली भेटणं , बोलणं काही होतच नाही. आत्ता नाही नंतर बोलू….म्हणून आपण आता वेळ मारून नेतो.स्वतःलाच कुणाची लुडबूड नकोशी वाटते.आणि मग पुन्हा पुन्हा एकट वाटतय असच बोलत राहतो.
कदाचित तो स्वर्ग , ते सर्वस्व आता डोळ्यांना दिसतही नाही आणि हीच खंत घेऊन आपण जगतो.तीच खंत आयुष्यातील एकटेपणाची कळत नकळतपणे आपल्याला जाणीव करून देते.
So…थोडसं गुंतलेल्या आयुष्यातून बाहेर पडा.पुन्हा एकदा सर्वस्व गवसतय का याचा शोध घ्या…आयुष्याचा एक सुवर्णमध्य पुन्हा डोळ्यांनी पाहा….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


