Skip to content

एका व्यक्तीपासून सारखं दुःख मिळत असल्यास कसं हॅण्डल करावं?

एका व्यक्तीपासून सारखं दुःख मिळत असल्यास कसं हॅण्डल करावं?


गीतांजली जगदाळे


सुख आणि दुःख हे दोन तर माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि दुःख नसेल तर आयुष्याला मजा नाही. पण हेच दुःख सतत एकच व्यक्ती आपल्याला देत राहिली तर? नक्कीच ती व्यक्ती आपल्या जवळची असली पाहिजे, नाहीतर लांबचा व्यक्ती दुःख देतोय आणि आपण सतत सहन करतोय असं होणार नाही.

तेवढी हिंमत आणि तेवढा हक्क एखाद्या जवळच्याच व्यक्तीकडे असू शकतो की इतका त्रास देऊन, आपल्याला त्याच इतकं दुःख होऊन सुद्धा त्या व्यक्तीला आपण अजून ही आपल्या आयुष्यात स्थान देतो. पण एक क्षण असा येतो की आपलं त्या व्यक्तीवर कितीही प्रेम का असेना किंवा त्या ही व्यक्ती च आपल्यावर कितीही प्रेम का असेना, कधीतरी सहन शक्ती संपते आणि ते नातं किंवा तो माणूस आपल्यापासून तुटेल इतका आपला संयम जाऊन किंवा सहनशक्तीचा उद्रेक होऊन आपण असं काहीतरी करतो ज्याने सगळंच खराब होऊन बसत.

ज्या व्यक्ती कडून सारखं दुःख मिळतंय अशा व्यक्तीचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन ही खूप महत्वाचा आहे. त्याच्या नकळत ते होतंय की त्याला ते आपल्याला दुखी बघून छान वाटतंय याचा नक्की विचार करावा. पण शक्यतो आपण हे करून कोणाला दुखावतोय अशी जाणीव च खूप लोकांना नसते, मुद्दाम त्रास देणारे जवळच्या माणसांमध्ये तसे कमीच सापडतील.

आपण त्या प्रिय व्यक्तीलाच या गोष्टीची जाणीव करून दिली की, त्याच्या काही गीष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो किंवा त्याच्या काही गोष्टींनी आपलं मन दुखावलं जात तर तुम्हाला असं नाही वाटत का, की तो व्यक्ती ही त्याची काळजी घेईन आणि हा प्रश्नच कायमचा सुटेल? काही वेळा त्या व्यक्तीला ही याची जाणीव नसते की त्याच्या मुळे कोणाचं तरी मन दुखावलं जातंय.

त्याला कल्पना असो वा नसो, आपण आपल्याकडून विनम्रपणे जाणीव करून देणं मात्र गरजेचं आहे. असच सहन करत राहणं, ना आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं ना आपल्या त्या माणसासोबत असणाऱ्या नात्यासाठी चांगलं. त्यामुळे हे दोन्ही शाबूत ठेवायचं असेल तर संवाद हा गरजेचा.

अशा वेळी त्या समोरच्या व्यक्तीने ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला सारखं दुःख देणारी व्यक्ती हे कळून सुद्धा त्याच गोष्टी तशाच चालू ठेवत असतील, त्यात कसलाही बदल करण्याची त्यांची इच्छा देखील नाहीए हे तुम्हाला कळत असेल तर त्या व्यक्तीपासून ठराविक भावनात्मक अंतर ठेवायला आपणच सुरुवात केलेली कधी ही चांगलं.

कारण जी आपल्या जवळची माणसं असतात ती नक्कीच या गोष्टीची दखल घेतात की आपल्याला त्यांच्या एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, आपलं मन दुखावलं जातंय. पण त्या माणसाला याची काही फिकीर च नसेल तर त्या माणसासाठी आपण एवढं दुःख सतत सहन करत राहण्याला काही अर्थ च उरत नाही.

कदाचित अशी ही एखादी परिस्थिती असू शकते जेव्हा आपल्या मनात नसताना मजबुरी म्हणून, गरज म्हणून काही गोष्टी केल्या जातात ज्यासाठी आपल्या सोबतच्या व्यक्तीच आपण मन दुखावतो. पण मग अशा वेळी त्या गोष्टी कबुल करून, त्यांची माफी मागून आणि त्या तुम्हाला का कराव्या लागतात ह्या बद्दल स्पष्टीकरण देणं हे तुमचं कर्तव्य.

पण त्या जवळच्या माणसाचं मन नेहमी नेहमी अशाच पद्धतीने दुखावलं जाऊ नये म्हणून मात्र प्रत्येकाने तेवढी खबर दारी घेणं महत्वाचं. आणि आपण ती व्यक्ती असो जी मन दुखावते किंवा ती असो जिचं मन दुखावलं जातंय , कोणी ही का असेना पण संवाद असणं हे नेहमी खूप गरजेचं आणि महत्वाचं!

कारण हाच संवाद नीट असेल तर गैरसमज असोत किंवा एखाद्याच्या वागण्याने आपल्याला होणार दुःख असू हे सहसा होत नाही आणि झालंच तर आपल्याला त्या मागची कारण माहित असण्याची शक्यता असते. आणि बऱ्याचदा कारण माहित असल्याने आपल्याला त्याची परिस्थिती आणि त्याच वागणं दोन्ही ही चांगलंच कळत आणि दुःख होण्याचा संभव टळतो.

काही लोकांच्या मनात असे ही विचार येतात की, समोरच्या व्यक्तीला याची जाणीव असेलच, की या -या गोष्टींनी मला दुःख होत, त्रास होतो मग ती का बदलत नाही? असं गृहीत धरण्या पेक्षा आपण आपल्या तोंडाने ते व्यक्त करणं कधीही चांगलंच नाही का? याने त्या माणसाला ही सरळ सरळ त्याच्याकडून काय होतंय याची जाणीव होईल आणि त्याची वागणूक बदलून कदाचित त्या त्रासदायक गोष्टी परत आपल्या बाबतीत होणार देखील नाहीत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एका व्यक्तीपासून सारखं दुःख मिळत असल्यास कसं हॅण्डल करावं?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!