“एकांत हवाय, पण नको ते विचार टाळण्यासाठी काय करावे??”
मधुश्री देशपांडे गानू
“प्रतिबिंब रोज नवे भासे ,
माझेच मला हे ….
आवडे “एकांती”..
रूप नित्य नवे साजेसे.
मीच माझी सखी जाहले…”
माझ्याच “प्रतिबिंब” कवितेतील काही ओळी आहेत या. एकांतात स्वतःबरोबरच काही काळ घालवल्यावर आपणच आपले सगळ्यात चांगले मित्र मैत्रीण होऊन जातो. रोज नव्याने आपण स्वतःला सापडत जातो. माणूस समूह प्रिय आहे. त्याला एकट्याला राहायला आवडत नाही. त्याला संपूर्णपणे व्यक्त होण्यासाठी कोणीतरी हक्काचं लागतंच.
अशी वाक्यं आपण अनेकदा या पूर्वी वाचली आहेत. खरंय.. एकटेपणा कोणालाच आवडत नाही. आपण कुणालातरी हवं असणं, आपल्याला कोणीतरी हवं असणं, आपलं कुटुंब, आपला समाज या अगदी नैसर्गिक गरजा आहेत माणसाच्या. पण एकटेपणा आणि एकांत या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. एकटेपणा हा परिस्थितीने, स्वभावानुसार लादलेला असतो. तो स्वीकारार्ह नसतो. पण “एकांत” हा स्वेच्छेने, आनंदाने स्वीकारलेला असतो.
आपण एका चाकोरीबद्ध जीवनाचा भाग असणारी माणसं. जन्म, शिक्षण, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, पैशाची बचत, स्वतःचं घर, मुलं बाळं, त्यांचं शिक्षण, लग्न, नोकरी हे चक्र अव्याहत चालूच असतं. या सगळ्या रामरगाड्यात किती जणांना खरंच स्वतःसाठी स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळतो?? खरंच मी मला माझ्यापुरतं असा दिवसातला थोडातरी वेळ आपण काढू शकतो का?? तर उत्तर आहे “नाही”. आपला आपल्या मनाशी संवाद होतच नाही. आपण या जगरहाटीत स्वतःलाच वेळ देत नाही. स्वतःलाच पूर्णपणे आपण ओळखत नाही.
अगदी वेदांमध्ये ही मनाचा अभ्यास केला गेला आहे. शरीर आणि मनाची फारकत झाली तर शरीर आणि मन दोन्हीं वर त्याचा वाईट परिणाम होतो. हल्ली अगदी कमी वयातही रक्तदाब, मधुमेह, नैराश्य असे आजार सर्रास दिसून येतात. कित्येक मध्यमवयीन स्त्री-पुरुषांमध्ये अनेक रोग एकत्रितपणे नांदत असतात. ते या फारकती मुळेच. पण आजच्या स्पर्धेच्या युगात, टिकून राहण्याच्या शर्यतीत आणि पैसा सर्वस्व झालेल्या सामाजिक मानसिकतेत हे लक्षात कोण घेतो???
एकांत ही अत्यंत सोपी, आनंददायी अशी अवस्था आहे. अगदी घरासाठी चोवीस तास काम करणारी गृहिणी, नोकरदार स्त्री पुरुष, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योगपती कोणीही असले तरीही दिवसातील काही वेळ हा एकांतात घालवणं अत्यंत गरजेचे आहे. स्वतःच्या शरीर-मनाच्या स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. “स्वतःचा स्वतःशी संवाद ही नैसर्गिक गरज आहे.” आपलं मन आपल्याला अगदी योग्य संकेत देत असतं. एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या व्यक्ती बद्दल चांगले-वाईट संकेत आपल्याला मिळत असतात. पण आपण दुर्लक्ष करतो.
“अहम् ब्रह्मास्मि” म्हणजे मीच ब्रह्म, ईश्वर तत्व आहे अस आपण फक्त म्हणतो. याचा अर्थ मी सर्व आहे, श्रेष्ठ आहे. पण याचा चुकीचा अर्थ आपण मी, माझं बाह्य भौतिक रूप, माझी भौतिक मालमत्ता असा घेतो. “आपला अंतरात्मा म्हणजे मी.” स्वतःच्या मनाशी नियमीतपणे केलेला संवाद, चिंतन-मनन म्हणजे एकांत.
हा एकांत मिळवण्यासाठी आणि नको ते विचार टाळण्यासाठी काय करावं ते आता पाहू.
१) सर्वात प्रथम तुम्हीं कोणीही असा, फक्त स्वतःसाठी दिवसातील काही वेळ हा तुम्ही स्वसंवादासाठी दिलाच पाहिजे.
२) काही काळ हा फक्त स्वतः बरोबर घालवायला हवा. म्हणजे तुमच्या मनातील नेमके विचार तुम्हांला ओळखता येतात. त्याची वर्गवारी करता येते. नको ते निरुपयोगी विचार जाणीवपूर्वक काढून टाकता येतात.
३) मनाचं housekeeping करणे अत्यंत आवश्यक आहे. तेही रोज… मन स्वच्छ, निर्मळ ठेवणं यासाठी “ध्यानधारणा” यासारखा दुसरा सर्वोत्तम उपाय नाही.
४) एकांतात स्वसंवाद केल्याने मन प्रगतिशील होतं. तुमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते.
५) नको ते विचार टाळण्यासाठी रोज दैनंदिनी लिहिणे आवश्यक आहे. नको असलेले विचार ओळखता येतात.
६) एकांतात असताना तुम्ही व्यायाम करू शकता. तुमच्या आवडीचा छंद जोपासू शकता. अगदी मुक्त स्वरात गाणी म्हणू शकता. याने तुम्हांला उत्साहित, आनंदी वाटू लागतं.
७) स्वतःचा नेमका शोध घेण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी एकांत गरजेचा आहे.
८) स्वतःमधले गुण आणि दोषही तपासण्यासाठी एकांत महत्त्वाचा आहे. मग दोन्हीं वर तुम्ही नेमकं काम करू शकता.
९) आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट कर्मासाठी आपणच जबाबदार असतो. आपल्या आयुष्याची रूपरेषा, ते कसं असावं याचा सखोल विचार करण्यासाठी एकांत हवाच.
१०) बौद्ध तंत्रात “विपश्यना” हा महत्त्वाचा अभ्यास आहे. दिवसाचा काही काळ एकांतात मौन पाळून घालवावा. याने तुमचं संवादतंत्र सुधारतं. फापटपसारा न बोलता तुम्हांला नेमकं काय म्हणायचे आहे ते मांडता येतं.
११) दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी शरीर-मनासाठी एकांत ही एक विश्रांतीची पर्वणी आहे.
१२) एकांतामुळे विचारांचं सुनियोजन करता येतं. सकारात्मक विचारांची मनाला सवय लावता येते.
१३) सातत्याने, अभ्यासाने नको ते विचार काढून टाकता येतात. मनात येणाऱ्या विचारांना शिस्त लावता येते.
असं म्हणतात की, “तुम्हीं जगाला फसवू शकता, पण स्वतःला नाही..” एकांतात तुमचं मन तुम्हांला आरसा दाखवतं. अनेक मोठे उद्योगपती, आध्यात्मिक गुरु, वक्ते, नाट्य चित्रपट अभिनेते हे तर त्यांच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्या आधी मौन पाळताना तुम्हीं पाहिले असतील. एकांतात तुमची एकाग्रता वाढते.
आणि तुम्ही तुमचे शंभर टक्के तुमच्या कामात देऊ शकता. तर आजपासून दिवसातला थोडा वेळ अगदी दहा मिनिटे का होईना पण स्वतःसाठी राखून ठेवा. नको त्या विचारांचा निचरा करण्यासाठी. एकांतात स्वतःशी सुसंवाद साधा. आणि स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
