Skip to content

एकटं पडू नका, पण स्वतःसाठी थोडा एकांत मिळवायला काय हरकत आहे?

एकटं पडू नका, पण स्वतःसाठी थोडा एकांत मिळवायला काय हरकत आहे?


काव्या गागांग्रास


कधी कधी एकट शांत बसाव,
आजूबाजूला कोणीच नसावं
तो एकांत खूप काही सांगत असतो,
शब्द नाही पण भावनांनी बोलत असतो …

किती खरं आहे ना हे? आपण कितीवेळा अस व्यक्त होतो? स्वतःला तेव्हढ व्यक्त होऊ देतो? खूप कमी वेळा. कारण आपल्याकडे आता तेव्हढा वेळच उरलेला नाही. सांगताना आपण खूप सांगतो, माणसांच्या या गर्दीत मी खूप एकटा पडलो आहे. माझं अस कोणी नाही. मला कोणामध्ये मिसळाव अस वाटत नाही. झालाच ना हा एकटेपणा, मिळालाच की एकांत. पण अस नाहीये. एकांत आणि एकटेपणा यात खूप फरक आहे.

एकटेपणा हा कोणी मागून घेत नाही. तो बऱ्याचदा नकारात्मक रितीनेच मिळालेला असतो. तो कोणालाही नको असतो. कारण हा येतो न्यूनगंडातून, अपमानातून, खूप काळ मनात सलत असलेल्या दुःखातून तसच विरहातून, कोणीही आपलं नाही या भावनेतून. व्यक्ती कधीही आनंदी होऊन I feel lonely असं म्हणत नाही. त्यावेळी कसलीतरी खंत मनात असतेच. कोणतरी सोबत हवंच असत.

पण एकांत; एकांताच अस नाही. तो कधीही नकारात्मकता घेऊन येत नाही. कारण ही वेळ, हा काळ, ही स्पेस आपण स्वतः निवडलेली असते, आपल्याला ती हवी असते. नव विवाहित जोडपी नेहमी अपेक्षा करतात की त्यांना एकांत मिळावा. कलाकार असुदे, लेखक असुदे कधी माणसांच्या गर्दीत कधी फार वावरत नाहीत. कारण त्यांना ती कला, ते लिखाण सुचायला एकांत हवा असतो, त्यांची म्हणून स्वतःची वेगळी जागा हवी असते.

हा या दोघांमधला फरक आहे. पण हल्ली आपण मात्र यातील एकावरचा जास्त भर देत आहोत. तो म्हणजे एकटेपणा. माणूस दिवसेंदिवस एकटा पडत चाललेला आहे. इतरांपासून तर दूर होतोच आहे. पण स्वतःपासून पण दूर. स्वतःपासून दूर या अर्थाने की आपण आपली सोबत पण हरवून बसतो. एकटेपणाची भावना मुळात तिथूनच येते. कारण आपल्यासोबत जरी कोणीही नसल तरी आपण स्वतःशी जोडलेलो असलो, स्वतः ला ओळखत असलो तर आपण खंबीर होतो. एकटेपणात जी निराशा येते, सर्वांकडून, आपल्याकडून ती येत नाही.

पण हे जोडलेपण, स्वतः ला स्वतःशी असलेली ओळख येणार कुठून? ती आणायची कुठून? तर ती मिळते या जाणीवपूर्वक निवडलेल्या छान अश्या एकांतात. आपल्याकडे सर्वांसाठी वेळ आहे. मित्र, कामावरचे लोक, घरचे लोक काहीही नसल तर फोन आहेच. या सगळ्यात स्वतःसाठी कधी वेळ काढणार? मी कोण आहे हे कधी शोधणार? अनेकांना अर्ध अधिक आयुष्य काढूनही हे समजत नाही की मी असा का वागलो/वागले? मी अमुक एका पद्धतीनेच का आयुष्य जगलो? माझ्या काहीतरी आवडी निवडी होत्या ज्या आता पुसट होत चालल्या आहेत. या का ची उत्तर शोधण्याची वेळ स्वतःवर येऊ द्यायची नसेल तर स्वतःसाठी आपला हक्काचा एकांत मिळवा. काय करायचं या एकांतात, खूप बोला, पण स्वतःशी, स्वतःला शोधा, जे जे मनात येईल लिहून काढा,स्वतःला जितकं जास्त जाणून घेता येईल तितकं जाणून घ्या. अमुक एका प्रसंगात मी अस का वागले, नेमके काय विचारमंथन डोक्यात चालू होत याची उत्तर शोधा.

अगदीच काही करायचं नसेल तर मस्त एखाद्या शांत ठिकाणी मग समुद्राचा किनारा असेल, घरातील एखादा कोपरा असेल तिथे बसा. छान संगीत ऐका, स्वतःसोबत घालविलेला प्रत्येक क्षण जिवंतपणे जगा. डोक्यात काही येत आहे येऊदेत, ते त्यांचं काम करत राहणार, त्यांचं स्वागत करून त्यांना परत पाठवा.

चांगले छंद जोपासा. मी आतापर्यंत काय काय मिळवलं, माझ्याकडून काय चुका झाल्या, मला कुठपर्यंत जायचं आहे याची जर आपली आपल्याकडेच नोंद असली तर दुसऱ्याच्या वागण्याचा आपल्यावर फार फरक पडणार नाही. जर हा एकांताचा प्रवास आपल्याला नीट साधता आला तर एकटेपणाच्या प्रवासावर जायची वेळ येणार नाही. कारण तेव्हा आपण असू ना आपल्या सोबत. अगदी कायमचे…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!