एकटं तर एकटं , पण खोट्या लोकांना आयुष्यात स्थान देऊ नका…!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
कितीही आणि काहीही म्हंटल तरी आपलं आयुष्य खरचं खूप सुंदर आहे.इतकच नाही तर माणसांशिवाय आयुष्य ते आयुष्य नाहीच असं आपण अनेकदा म्हणतो.आयुष्यात माणसं असतील तर आयुष्य जगायला मजा आहे , खरं सुख त्यातच आहे. त्यांच्यामुळे आयुष्य आणि जगणं अधिकाधिक सुंदर होतं.
हे जरी खरं असलं तरीही वास्तविक पाहता चित्र काही वेगळच आहे. किंवा ते वेगळच जाणवतं.कारण , आपल्या आयुष्यात विविध ढंगाची , विविध रंगाची माणसं येतात आणि जातात.आजुबाजुला माणसं हवीहवीशी वाटतातही पण ति किती खरी आणि प्रामाणिक असतात याची आपल्याला जाणीव किंवा कल्पनाही नसते.कधी त्यांच्याविषयी असा एक ठाम अंदाज बांधताच येत नाही.
तळ्यात-मळ्यात असा आपला खेळ चालूच असतो.माणसं समजायला आयुष्य निघून जातं पण माणसं काही समजत नाहीत. माणसाचा स्वभाव खरं तर फार विचीत्र असतो ,असं म्हणतात.कधी त्याच्या डोक्यात काय शिजेल काही सांगता येत नाही. म्हणून कधी कधी वाटतं यांच्यापासून जरा लांब राहिलेलच बरं…!
पण खरचं , आयुष्यात खरी आणि खोटी माणसं जेव्हा समजायला लागतात तेव्हा मात्र वाटतं की कोण खरं?नी कोण खोटं? हे मला आधी का नाही समजलं? आधी कळालं असतं तर खरी माणसं गमावली नसती..आणि खोटी माणसं कमावली नसती.खोट्या लोकांना आयुष्यात स्थानच दिलं नसतं.वगैरे वगैरे बरच काही आपल्याला वाटून जातं.आणि आपण वेगवेगळ्या विचारांमध्ये गुंतून जातो.
कधी कधी वाटतं की नकोच म्हणजे अगदी नकोच गुंतायला या माणसांमध्ये…! यांच्यामुळे आणि यांच्याशिवाय आयुष्य अवघड होऊन जातं.त्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगल च असं वाटत रहातं.कशाला हवी कुणाची सोबत…?? खऱ्या-खोट्याच्या लपंडावात का खेळायच…?? कधी असही वाटतं की खरी माणसंही नको… नकळत केव्हाही ती निसटून जातात.आणि मग उरतात फक्त आठवणी…!
आणि त्यातल्या त्यात ती खोटी माणसं तर अजिबात नको….त्यांच्यामुळेच चांगली चांगली आयुष्य उध्वस्त होतात.एका खोट्या ठिणगीमुळे केव्हा वणवा पेटून आयुष्याची राखरांगोळी होते कळतच नाही. म्हणजे पहा , दोन्ही माणसांमुळे तसा खूप त्रास होतो.पण दोन्ही माणसांमुळे होणारा त्रास हा वेगवेगळा आहे.
खरी आणि प्रामाणिक माणसं सोडली तर आयुष्यात खोट्या ,फसव्या माणसांना कधी स्थान देऊ नका.त्यांच्यामुळे आपल्याला कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं.त्यांच्यामुळेच कधी आपणही खोटे ठरतो.एकामागोमाग एक खोटं आपल्याकडूनही अनावधानाने खात्यात जमा होत असतं.अशा खोट्या लोकांमुळे गैरसमजही निर्माण होतात.मुळात खोटं बोलून , खोटं वागून ही खोटारडी लोकंच गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांच्या सानिध्यात वावरण म्हणजे स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारख आहे.
आपण सुधारण्याची एक संधी देत असतो.पण मला वाटतं आपण जरी त्यांना सुधारण्याची संधी दिली तर ते कितपत सुधारतील …किंवा सुधारतील की नाही याची शाश्वती मात्र कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे सुधरण्यासाठी संधी दिली तरी त्यांना आपल्या आयुष्यात हक्काच नी कायमच स्थान कधी देऊ नका. कारण ते पुन्हा खोटे चाळे करणार नाहीत कशावरून….?? म्हणून एकटं तर एकटं रहा.
पण अशी खोटी माणसं घेऊन आयुष्य जगू नका.अशा लोकांना आयुष्यात स्थान देण्यापेक्षा एकटं राहिलेल केव्हाही ‘Best’…! आयुष्य निदान खोट्या लोकांमध्ये तरी गुंतून पडणार नाही. आयुष्य उध्वस्त आणि चुकीच्या दिशेनेही जाणार नाही.अशा कितीतरी खोट्या लोकांना आपण आयुष्यात स्थान दिलेल असतं , ते वेळीच ओळखायला शिका. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुणी आपल्याबरोबर खोटेपणा करत आहे तेव्हाच त्याला आपल्या आयुष्यातून बाहेरचा रस्ता दाखवा.
चांगली गोष्टीसाठी कधीतरी खोटं बोलणं , वागणं ठीक असतं.पण नेहमीच खोटा मुखवटा घालून फिरणारे आयुष्यात आले तर आयुष्य आयुष्य रहातच नाही. अशा खोट्या लोकांमुळे आपल्या पाठी नको तो ससेमिरा लागतो.आणि निस्तरायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र हीच खोटी माणसं बिळात जाऊन लपतात.जितकी खोटी तितकीच भ्याड माणसं…!
तुमच्याही आयुष्यात अशी खोटारडी माणसं असतील , किंवा येऊन गेली असतीलही…असतील तर त्यांना ओळखा , आणि बेदखल करा. नाहीतर आयुष्य खोटा मुखवटा घालूनच फिराल.
पण एक मात्र नक्की , एकदा तरी अशी विचीत्र माणसं आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं.यांच्यामुळे आयुष्यासाठी चांगला धडा मिळतो.कोणती माणसं खरी नी कोणती खोटी हे अशा लोकांमुळे कमीत कमी समजायला सोपं जातं. आणि अशा खोट्या लोकांना पुन्हा आयुष्यात कधीही स्थान द्यायच नाही हेही चांगलच कळून चुकतं.
म्हणून एकटं रहा पण अशा लोकांना चुकूनही आयुष्यात स्थान देऊ नका. एकटं रहा , आनंदी आणि खरेपणाने जगा…आयुष्य कधीच खोट्या वळणावर प्रवासाला निघणार नाही….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


