Skip to content

“उलटून बोलल्याशिवाय आपल्या जिवंतपणाची कोणीही दखल घेत नाही.”

“उलटून बोलल्याशिवाय आपल्या जिवंतपणाची कोणीही दखल घेत नाही.”


मधुश्री देशपांडे गानू


“लोकमान्य टिळकांचा” आदर्श जपणारे आपण. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही.” हा दैदिप्यमान स्वाभिमानाचा वारसा जपणारे. असा स्वाभिमान प्रत्येकाने जपायलाच हवा. जिवंतपणी कोणी “कसा आहेस?” असं विचारत नाही आणि मेल्यावर मात्र नाही नाही ते लोक चौकशी करतात. “किती चांगला होता” याचे गोडवे गातात. जगाची रीतच आहे ही.

माणूस जन्माला आल्यापासूनच त्याला हवी असलेली, नको असलेली नाती चिकटतात. काही जन्मापासून बरोबर असलेली तर काही त्याने स्वतः निर्माण केलेली. प्रत्येक नात्याचा पाया “मनमोकळा संवाद” हाच असतो. त्यानेच नात्यांचा प्रवास सुखदायी पुढे जात राहतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, अनुभव, दृष्टिकोन, व्यक्त होण्याची पद्धत, निर्णय क्षमता, कुवत, परिस्थिती वेगवेगळी असते. या सगळ्याचा त्याच्या नात्यांवर बरा वाईट परिणाम होत असतो.

काही व्यक्ती अगदी सहजपणे अनेक नाती यशस्वीपणे सांभाळताना दिसतात. कारण ही माणसे मनाने स्वच्छ, निर्मळ असतात. आत, बाहेर असं काही नसतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आवडली तर दिलखुलास दाद देतात. मनमोकळे कौतुक करतात. आणि नाही आवडली तर स्पष्ट सांगतात. काय आवडलं नाही हेही सांगतात. पण या व्यक्त होण्यामध्ये ही संयम, आब, आदर, योग्य शब्द, आवाजाची योग्य फेक याचा ताळमेळ असतो.

त्यामुळे समोरचा दुखावला न जाता आपल्याला काय वाटते ते योग्य पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत ही मंडळी छान पोहचवतात. त्यामुळे होतं काय की यांची सर्वच नाती प्रेमाची, कौटुंबिक, व्यावसायिक कायम टिकून राहतात. आणि ही अशी मंडळी सर्वांना हवीहवीशी वाटतात. मोकळ्या स्वभावामुळे यांचा गोतावळा मोठा असतो. अशी माणसे सहज कुठेही आपलीशी होतात.

पण प्रत्येक व्यक्ती अशी नसते ना! काही व्यक्तींना स्वतःबद्दल कमीपणाची भावना असते. न्यूनगंड असतो. आत्मविश्वासाची कमी असते. त्यामुळे योग्य संवाद साधण्यासाठी या व्यक्ती कमी पडतात. पटकन मनातलं यांना सांगता येत नाही. विचारांची योग्य व्यक्तता, स्पष्टपणा यांना जमत नाही. त्यामुळे होतं काय, समोरच्या व्यक्तीचा पटकन गैरसमज होऊ शकतो.

किंवा अशा माणसांना सहज घरात आणि नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणीही त्रास दिला जातो. कारण यांना पटकन् उलटून बोलणे जमत नाही. अशा व्यक्तींना खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. मनातलं बोलता येत नाही. सगळं मनात साठवून ठेवतात. नुसती घुसमट होते. आणि काहीही कारण नसताना स्वतःवर होणारा अन्याय सहन करत राहतात.

अगदी सोप्प रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊ. “सासू-सून हे नातं अगदीच वादग्रस्त आहे. नवीन आलेली सून ही आपली प्रतिस्पर्धी आहे अशी बऱ्याच सासवांची समजूत असते. आपला संसार, आपला मुलगा यांच्यावर आता हिचे वर्चस्व असणार, म्हणून नवीन आलेल्या मुलीकडे याच दूषित पूर्वग्रहातून पाहिलं जातं.

मग तिला ताब्यात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. माझ्या मतानुसार, निर्णयानुसार हे घर चालेल, अशी सासूची भूमिका असते. “तू डोकं, बुद्धी चालवायची नाही. मी सांगते तेवढंच आणि तसंच करायचं.” नवीन आलेली मुलगी आधीच भांबावलेली असते. नवऱ्याची साथ पूर्णपणे आहे की नाही हेही तिला कळलेलं नसतं. मग कसं बोलणार? परत आई वडिलांचा उद्धार होणार..म्हणून ती सगळं निमूटपणे सहन करते आणि हीच स्वतःचं मन मारून जगायची तिला सवय होते.

यामुळे तिची कोणीही विशेष दखल घेत नाही. पैपाहुणे नातलग यांच्या दृष्टीने ती फक्त घरकाम करणारी एक व्यक्ती असते. सून म्हणून तिला कोणताही मान नसतो. कोणत्याही निर्णयात तिला स्थान नसतं. जर सुरुवातीला तिने निक्षून पण योग्य भाषेत आदर राखून स्वतःची भूमिका स्पष्ट मांडली तर तिच्यावर अन्याय होणार नाही. नाही तर संपूर्ण आयुष्य तिचे या कुटुंबासाठी खस्ता खाण्यात जाते आणि जिवंतपणी तिची कोणीही दखल घेत नाही. कोणीही तिच्या कुठल्याही कामाचं एका अक्षरानेही कौतुक करत नाही. कोणत्याही व्यक्ती समोर तिचे फक्त दोष सांगितले जातात. आणि हे ती निमूट सहन करते. संपूर्ण आयुष्य, जिवंतपणी तिची किंमत शून्य असते.

एक प्रसंग सांगते. सासुबाई नोकरी करणाऱ्या मोठ्या पोस्टवर. अगदी शोफर आणि गाडी दिमतीला. नवीन आलेल्या सुनेकडून अपेक्षा काय तर, सासू जेव्हा गाडीत जाऊन बसेल तेव्हा सुनेने तिची पर्स आणि डबा घेऊन मागून चालावं आणि गाडीत नेऊन ठेवावं. आता शोफर हे काम करू शकतो. पण सुनेला ही आज्ञा. जर हे ऐकलं तर सून कायमच दबून राहिली असती.

पण सुनेने निक्षून सांगितलं की “मी तुमची सून आहे. तुमचा मान राखून घरात तुम्ही सांगाल ते काम मी आनंदाने करेन, पण मी तुमची नोकर नाही. हे काम शोफरचं आहे. मी हे करणार नाही.” असं सुरुवातीलाच स्पष्ट सांगितल्यामुळे सासूला कळून चुकलं की काही कारण नसताना आपण सुनेला हीन वागणूक देऊ शकत नाही. कारण ती सहन करणार नाही.

आता इथे उलटून बोलणं अगदी गरजेचं होतं. त्यामुळे नंतरचे अनेक अप्रिय प्रसंग टाळले गेले. हे मी अनुभवाने सांगते आहे. जर योग्य ठिकाणी तुम्ही तुमच्यावर अन्याय होतोय आणि मी हे सहन करणार नाही असं बोललात तरच तुमचा स्वाभिमान आणि मान टिकून राहील. नाही तर कोणीही तुमचं जिवंतपणी पोतेरे करायला कमी करणार नाही.

स्वतःच्या स्वत्वाची जाणीव ही प्रत्येकालाच हवी. उलटून बोलणं हे सहज उद्धटपणाचं वाटलं तरीही योग्य शब्दांत तुम्ही तुमचा स्वाभिमान जपूच शकता. हल्ली तर दोन वर्षाचं मूलही स्वतःच्या मनाविरुध्द वागत नाही. काही माणसं अत्यंत अहंकारी, विकृत असतात. त्यांना फक्त त्यांचा अहंकार कुरवाळायचा असतो यासाठी ते समोरच्या व्यक्तीचा कसाही पाणउतारा करू शकतात. अशांपासून लांबच राहावे.

अगदी कुटुंबातील व्यक्ती असली तरीही. “आपण कोणाच्याही हातचं खेळणं नाही, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती आहोत.” आपलं अस्तित्व, जिवंतपण, आपली ऊर्जा. आपला स्व जपायचा असेल तर वेळीच उलटून बोलायलाच हवं. तरच आपण स्वतःच्या आणि इतरांच्या नजरेतही सन्मानाचे हक्कदार होऊ….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““उलटून बोलल्याशिवाय आपल्या जिवंतपणाची कोणीही दखल घेत नाही.””

  1. राहुल शिंदे

    सासू सासरे आताच्या कुंटुबात दिसत नाहीत.पती पत्नी ‌मुल एवढे च आहेत.बायको कमावणारी असेल तर नवर्याला सहनशील बनावे लागते.
    नाहीतर 498 कलमाचा दुरूपयोग करून भिती दाखवून मानसिक ‌गुलाम‌ बनवले जाते किंवा घटस्फोट घेतला जातो.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!