आपण रात्रीच्या अंधराशी दिवसा भांडत राहतो..
मिनल वरपे
माझी एक लहानपणापासूनची सवय… ऋतू कोणताही असो..उन्हाळा पावसाळा हिवाळा.. मला एकदा का थोडा घसा दुखला की मी लगेच घाबरते एकतर लगेच दवाखान्यात जाणार नाहीतर माहिती झालेल्या गोळ्या घेणार आणि हे सर्व कशासाठी तर घसा दुखला की मला लवकरच ताप येतो हे मी माझ्या मनाशी पक्कं केलं आहे. आई नेहमी म्हणते अग हे खा ते खा.. त्यावर माझं एकच म्हणणं असते अग नको ग.. थंड पदार्थ अजिबात नको माझा घसा दुखेल मग आणि पुढे ताप आहेच.
म्हणजे अजून जे आलेच नाही त्याची आधीच भीती बाळगून मी घाबरते खर तर घसा दुखतोय मग काय झालं.. घरगुती उपाय करूयात.. दूध हळद, मध, वाफ यासारखे उपाय करून तो दुखायचा थांबेल सुद्धा पण माझ्या मनातील भीतीमुळे तो दुखायचाही थांबत नाही.
मी हे शिक्षण घेतोय तर खर पण मला चांगली नोकरी मिळेल ना..??? आणि जर नाही मिळाली नोकरी तर माझं कस होणार.. मला घरच्यांना कस सांभाळता येणार..??
माझं लग्न ठरतय.. अशा ठिकाणी नक्कीच थोडी मनात धाकधूक असतेच की आता माणसं बदलणार, घर बदलणार, मला सर्व जमेल ना इतपर्यंत ठीक आहे पण माझ्या सासरचे चांगले वागतील ना माझ्याशी..जर नाही वागले चांगले तर मी काय करायचं.. ??? कस सर्व हॅण्डल करायचं..??? हे पडणारे प्रश्न..
आपल्याकडून एखादी चूक झाली.. म्हणजे आपण ती मुद्दाम नाही केली तर नकळत घडली तर अशावेळी आता मला समोरची व्यक्ती काय बोलेल..??? जर नोकरीच्या ठिकाणी असेल तर मला कामावरून तर नाहीना काढणार..?? आणि जवळच कोणी असेल तर कायमचे संबंध तर नाहीना तोडणार..??
कोणी तर इतक्या दूरवरची चिंता करतात की बघायलाच नको… बाळ जन्माला येतं नाही तर त्याच शिक्षण कुठे द्यायचं आणि करीअर कशात करायचं.. ???
आता मुलाचं लग्न होणार आहे.. काय माहीत याची बायको कशी वागेल आपल्यासोबत..?? नीट वागेल तर ठीक पण जर आम्हाला समजून नाही घेतलं सांभाळून नाही घेतलं.. घरात सतत वाद केले…आमच्या मुलाला आमच्यापासून कायमच तोडल तर काय होईल..???
म्हणजे आज जे समोर आहे.. जिथे आपण आता आहोत त्याचा विचार करायचा सोडून आपण पुढे काय होणार आहे कस होणार आहे याची चिंता करता बसतो.. पुढे कोणते प्रसंग येतील याचा विचार करून आजच घाबरतो..
आणि यामुळे होते काय तर आजचा दिवस आजची वेळ अशीच वाया जाते.. पुढच्या चिंतेने, काळजीने आपण आज इतके विचार करतो की त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. जेव्हा आपण नको असलेल्या किंवा टेन्शन देणाऱ्या गोष्टी करतो तेव्हा त्यामुळे आपलं डोके दुखी सारख्या सामान्य आजारापासून अटॅक सारख्या भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.
आणि मनावर होणाऱ्या परिणामांच काय तर आपण जे आज आता करतोय त्यामधे आपलं लक्ष नसते… यावेळी आपण ज्या परिस्थितीत असतो तिच्यातून बाहेर कस पडावं हे आपल्याला कळत नाही सुचत नाही आणि त्यामुळे आपले आजचे टेन्शन आपण स्वतःच वाढवतो कारण आपल्या मनात आजची काळजी नाही तर उद्याची चिंता असते.
म्हणून जे होणार आहे ते कस आणि कधी हे कोणालाच माहित नसते. आपण ज्या चिंता करतो तस सर्व होईल की नाही हे आपल्याला सुद्धा माहित नाही. मग उगाच उद्याची चिंता करण्यापेक्षा तीच ऊर्जा आजच्या वेळेला दिली ते नक्कीच त्यातून आपल्याला आजचा दिवस आजची वेळ चांगली करता येईल…
आपण जे उद्यासाठी विचार करतो ज्या चिंता करतो नकारार्थी विचार करतो ते होणार सुद्धा नाही जर आपण आजची काळजी घेतली तर.म्हणून नंतरच नंतर बघू अस म्हणत आज आता मला काय करायचं आहे याकडे लक्ष द्यायचं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

