उत्साही लोकांच्या घोळक्यात जगा, एकट्यात राहाल तर आयुष्यभर रडत बसाल..”
मधुश्री देशपांडे गानू
आदिम काळापासून मानव टोळी, समूह करून राहणारा प्राणी आहे. अगदी प्रकृती कडून संस्कृतीकडे प्रवास आणि प्रगती होतानाही कुटुंब, समाज, लग्न संस्था असा विकसित होत गेला. कारण मानवाला एकटं राहायला आवडत नाही. अगदी सुरुवातीला सुरक्षितता, ताकद यासाठी एकत्र राहात होता. आताही भावनिक पातळीवर अनेकांशी जोडलेलं
रहायला त्याला आवडतं.
जिथे आपली मतं, मनं जुळतात तिथे नाती तयार होतात. मग रक्ताची असोत नाहीतर मैत्र. आपली ऊर्जा जिथे सामायिक होते, positive vibes जिथून येतात ती नाती टिकून राहतात. एकटं रहायला तर कोणालाच आवडत नाही. परिस्थितीवश किंवा वाईट अनुभवाअंती माणूस एकटं राहण्याचा निर्णय घेतो. किंवा त्याला एकटेपणा जास्त सोयीचा वाटायला लागतो. एकटेपणा आणि एकांत या दोन भिन्न संकल्पना आहेत. एकांत हा सर्वस्वी स्वेच्छेने, मनःशांतीसाठी असतो.
उदाहरणार्थ साधु, संत. आपण सामान्य माणसांबद्दल बोलतोयं. काही वेळा जीवनात अत्यंत कटू अनुभव येतात आपल्या माणसांचे, समाजाचे. अशावेळी व्यक्ती स्वतःला एका कोषात बंदिस्त करून घेते. समाजात मिसळायला, कोणाशी बोलायला तिला आवडत नाही. एकटं राहणं त्या व्यक्तीला जास्त हायसं वाटत असावं. पण खरंच एकटं राहणं योग्य आहे?? काही फायदेही आहेतच. तुम्हांला रागवणारं, तुमची चूक दाखवणारं कोणी नाही. तुमच्या मनाप्रमाणे हवं तसं तुम्ही वागू शकता. पण किती काळ??
एकटं राहणारी व्यक्ती ही जवळच्या हक्काच्या माणसांना मुकलेली असते. मैत्रीचा, सोबतीचा अभाव असतो. यामुळे स्वभाव अत्यंत एकलकोंडा होतो. सगळीच कामं, निर्णय स्वतः घ्यावे लागतात आणि त्यांची जबाबदारीही. मायेनं जवळ घेणारं, हक्काने रागवणारं कोणी नसतं. अशा व्यक्तीचे रोजचे दैनंदिन जीवन कंटाळवाणं, उदास असतं. खायला उठणारा एकटेपणा असतो.
असुरक्षित आणि भीतीची मानसिकताही निर्माण होऊ शकते. मनातलं सांगायला, सुखदुःख, भावना शेअर करायला कोणीही नसतं. वाचकहो, नुसता थोडावेळ एकटं राहण्याचा विचार करून पहा.. खरंच जमेल?? नाही ना! दुखलं खुपलं, आजारी असताना त्वरित मदतीला, सेवेला कोणीच हजर नसतं.
आपलं हक्काचं वाट पाहणारं कोणीतरी आहे, आपण कोणालातरी हवे आहोत ही भावनाच किती सुखावह आहे ना! आणि इथे तर वाट पाहणारंही कोणी नाही. अशावेळी हा एकटेपणा उदास, निराश करून जातो. अशा व्यक्ती प्रचंड नैराश्याने ग्रासल्या जाऊ शकतात. अनेक शारीरिक, मानसिक आजारांनी पीडित होऊ शकतात.
नुसत्या सकारात्मक विचारांनी जीवन जगता येत नाही. तर तो वास्तवात, कृतीत पण असायला हवा. तुम्हीं कितीही सक्षम, समर्थ, स्वतंत्र असलात तरीही माणूसच आहात ना! कधीतरी मानसिक, शारीरक थकवा येतोच. अशावेळी आपल्या माणसाचा आधार, हक्काचा खांदा हवासा वाटतो. तोच नसला तर अशावेळी एकट्याने रडत बसायची वेळ येते.
पण जर तुम्हीं उत्साही, आनंदी, सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात दिवसाचा काही वेळ जरी घालवला तरी तुम्हांला उत्साही, आनंदी, full of life वाटू लागतं. जाणीवपूर्वक अशा उत्साही व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तुमच्या कुटुंबात, आजुबाजूला अशा व्यक्ती असतील तर तुमच्या मध्ये ही सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होते.
तुमचं आयुष्य आनंदी होतं. अशा व्यक्ती तुम्हांला तुमचे महत्त्वाचे निर्णय उत्तमरित्या घ्यायला मदत करतात. नकारात्मक विचार, कृती कशी करू नये हे शिकवतात. तुमच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरणा बनतात. तुमचं नेमकं ध्येय, उद्दिष्ट काय आहे यासाठी तुम्हांला सातत्याने प्रेरित करतात.
सर्वात महत्त्वाचं तुम्हांला वर्तमान काळात जगायला शिकवतात. आत्ताचा क्षण भरभरून जगायला शिकवतात. अशा उत्साही व्यक्तीं बरोबरच्या तुमच्या आठवणी सुखद आणि आनंदीच असतात. तुम्हांला positive vibes जाणवतात. उदाहरणार्थ. एखाद्या गेट-टुगेदर मध्ये किंवा स्नेहसंमेलनात एक व्यक्ती अशी असते जिने हॉलमध्ये प्रवेश केल्याबरोबर संपूर्ण वातावरण प्रसन्न होऊन जातं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. त्या व्यक्तीचा Aura काही वेगळाच असतो. त्या व्यक्तीची सकारात्मकता तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणवते.
तुमचे वैयक्तिक नातेसंबंध, कामा मधील गुणवत्ता उंचावायला या सकारात्मक व्यक्ती मदत करतात. तुमच्या ताणतणावांचे सुनियोजन तुम्हीं याच व्यक्तींकडून शिकता. तुमचं मानसिक-शारीरिक आरोग्य यांच्या सहवासात उत्तम राहतं. कारण अशा आनंदी व्यक्ती दीर्घायुष्यी आणि आरोग्य संपन्न असतात.
मनाविरुद्ध किंवा परिस्थितीला शरण जाऊन एकटेपणा पत्करू नका. जीवन प्रवाही आहे. नवनवीन प्रवासी या प्रवासात भेटतातच. उत्साही, आनंदी, सकारात्मक व्यक्तींची निवड करा. त्यांच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा. आपण आपला वेळ कोणा बरोबर व्यतीत करतो, कोणाशी बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जीवन मूल्यांत वाढ होते की आपली ऊर्जा नको तिथे खर्च होते याचा नक्की अभ्यास करा.
सकारात्मक व्यक्ती तुम्हांला फक्त चांगल्या आनंदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवतात. मनमोकळेपणाने कौतुक करायला शिकवतात. अशा उत्साही, आनंदी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या जीवनाची गुणवत्ता, प्रमाण सुधारते. जीवनाकडे पाहण्याची, ते भरभरून आनंदाने पूर्णपणे जगण्याची नवीन दृष्टी या सकारात्मक व्यक्ती तुम्हांला देतात. फक्त हे सगळं तुम्हांला आत्मसात करता यायला हवं. तशी इच्छा शक्ती आणि कृती हवी. आयुष्यात एक तरी अशी उत्साही, आनंदी व्यक्ती कमवा जी तुमचं जीवन बहरायला तुमच्या सोबत कायम असेल…. शुभेच्छा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


