उंची जरूर गाठा.. पण कधी काळी अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका.
सोनाली जे
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे
ग. दि.माडगूळकर लिखित हे गीत सुधीर फडके यांनी त्यांच्या आवाजातून त्या गाण्याला जिवंत केले आहे.
आपल्या आयुष्यात ही असे शंभर धागे दुःखाचे असतात त्यातून एक धागा सुखाचा मिळतो. त्या एका सुखाच्या धाग्याकरिता प्रचंड मेहनत करावी लागते. त्याग , कष्ट , प्रसंगी तडजोड ही करावी लागते.
आपण सगळेच शून्यातून वर आलेलो असतो. वेळ प्रसंगी कोणी नुसता वडापाव खाल्लेला असतो. बस , रिक्षा यांचे भाडे परवडत नाही म्हणून मैल च्या मैल चालत गेलो असतो. आपल्या आधीच्या पिढीने तर फारच कष्टातून काढले आहे. दिवसा जे मिळेल ते काम करून रात्रीची शाळा , कॉलेज करून , रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास केला आहे. आणि स्वतः कष्ट करून नोकरी मध्ये उच्च पद मिळविले आहे. पण ज्या कष्ट , गरिबीतून ते वर आले त्यांना पै आणि पै ची किंमत असते. आणि ठेवतात. गरीबी मधून श्रीमंत झाले म्हणून ते जुन्या दिवसांना विसरत ही नाहीत. त्या प्रत्येक गोष्टीची किंमत असते जी खूप कष्टातून मिळविलेली असते.
मला खूप कौतुकाने सांगावेसे वाटते माझेच बाबा कोल्हापूर पुढे असलेल्या पन्हाळगड त्याच्या पायथ्याशी असलेल्या एका अतिशय छोट्या गावात जिथे बोटावर मोजता येईल अशी घरे त्या गावातले. गावात चौथी पर्यंत शाळा . आजोबा त्याकाळी तिथल्या शाळेत शिक्षक . चौथी नंतर कोल्हापूर ला पुढचे शिक्षण घ्यावे लागे. गावात छोटी बागायती भात शेती जी रोजच्या जेवणाची सोय करत होती. कुटुंब मोठे. काका , बाबा , तीन आत्या , आजी आजोबा . आजोबांच्या एकट्याच्या पगारात कसे बसे भागत असे. काका आणि बाबा शिक्षणासाठी कोल्हापूर ला बाहेर पडले. एक छोटी खोली . बरं तेव्हा कोल्हापूर ला सायकल नेच जावे लागे . गाव ते कोल्हापूर अंतर २३ किलो मिटर. सारखे सारखे गावा कडे जाणे हे शक्य नसे.
काका आणि बाबा दिवसभर एका दुकानात शिलाई चे काम करत .. आणि रात्रीच्या शाळेत शिक्षण ..त्यातून पुढे राजाराम कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. गणित हा त्यांचा आवडता विषय. त्यावर त्यांची मास्टरी .त्यांनी BSC नंतर MSC केले ते ही गणित विषयात , आणि त्यात ते टॉप वर होते. त्याकाळी त्यांच्या सोबत जयंत नारळीकर होते. त्यांनी एकत्र अभ्यास ही केला. जयंत नारळीकर यांना बाबांनी गणित ही शिकविले होते. हे अनुभव त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले आहेत.
बाबा अतिशय गरीब घरातून आलेले आणि जबाबदारीची जाणीव , बहिणींची लग्ने करून देण्याची जबाबदारी म्हणून त्यांनी सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला आणि आकाशवाणी सारख्या सरकारी ऑफिस मध्ये ते इंजिनिअर म्हणून कार्यरत झाले. त्यांनी पुढे नोकरी करता करता A.M.I.E. सारखा अवघड अभ्यासक्रम ही पूर्ण केला. त्यांची बढती होत होती. घरच्या जबाबदाऱ्या ही पार पाडत होते. बहिणींचे संसार उभे करून दिले .
अतिशय कष्ट , मेहनत घेवुन , आकाशवाणी सारखी नोकरी करताना अनेकदा येणारे प्रॉब्लेम्स . Breakdown येवुन चालत नसे. अखंड आणि अविरत प्रक्षेपण सुरू राहण्याकरिता तेवढेच चोखंदळ , तत्पर आणि पूर्ण अभ्यास ही करावा लागे. जागरूक राहावे लागे सतत. बाबांची प्रत्येक transmiter मधल्या receiving सेंटर , कंट्रोल रूम तर स्टुडिओ यात सगळीकडेच अफाट अभ्यास. कुठे फॉल्ट आहे हे ते लगेच सांगत त्यामुळे वेळ वाचत असे. Duty वर असलेले लोक फोन करायच्या आत बाबा फोन करून सांगत इथे प्रोब्लेम आहे म्हणून . हळूहळू प्रमोशन घेत ते संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे incharge म्हणुन काम करत होते. पण कधी ही गर्व नाही
अतिशय साधी राहणी. जेव्हा नवीन होते तेव्हा दिल्ली सारख्या ठिकाणी अतिशय थंडी त्यामुळे कायम सूट , आणि टाय मध्ये असायचे अर्थात तारुण्य ही होते. पण कसं जसे ते ऑफिसर होत गेले तसे अतिशय साधी राहणी . Half shirt आणि पँट. नंतर नंतर तर कधी इस्त्री ही करत नसत. आम्ही म्हणले की म्हणत कोण बघते मला. आम्ही म्हणायचो अख्खे ऑफिस बघते की. येणारे मोठे लोक, नेते , पुढारी , भेटतात की तुम्हाला. ते म्हणायचे मग काय झाले . मला साधे राहणे आवडते मी राहतो. नुसत्या टापटीप राहण्याला महत्व देवू नका.
घरात कधी electrician काम करण्याकरिता आला नाही , पंखा बसविणे , स्विच बदलणे , वॉशिंग मशीन नवीन पॉइंट सगळी कामे घरीच करत बाबा. Radio दुरुस्ती असेल , मिक्सर दुरुस्ती , t.v. दुरुस्ती सगळी कामे कुठच्या कुठ होवून पण जात. अगदी नळ दुरुस्ती सुधा .. ऑफिसर आहे म्हणून मी का करू मी करणार नाही असे कुठेच नव्हते. उलट उत्साहाने करत सगळे. कशाला कोणाला बोलवा आणि पैसे द्या . मला येते मीच करतो . म्हणून काम कधी करून संपवत कधी अडून राहणे स्वभाव नव्हता. किंवा कोणते काम करण्याची लाज ही नव्हती.
उच्च पदावर होते म्हणून कधी कोणाला राबवून घेतले नाही. कधी अधिकाराचा गैरवापर नाही. ऑफिस मधले ड्रायव्हर त्यांच्या मुलांना कायम मदत करायचे. त्यांच्या शेतातल पीक गहू , ज्वारी , तांदूळ , भाजी विकत घेत पण कधी ही फुकट घेण्याची वृत्ती नव्हती कारण गरिबीतून वर आले होते कष्ट केले होते. आपल्याच नाही तर इतरांच्या कष्टाची कदर होती.
अनुभव , उच्च दर्जा जरी आला तरी त्यांनी त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार कधी सोडले नाहीत.कायम गावाकडे जावून शाळेला काही तरी देणगी देवून येत. आजही आजी आजोबांच्या नावाने दिलेली देणगी deposit स्वरूपात ठेवली आहे त्यातून हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना बक्षीस तर दिले जातेच पण गरजू मुलं ही त्यातून शिक्षण घेतात.
आज बाबा नाहीत या जगात पण गरिबीतून वर येवून ही गरीब आणि होतकरू विद्यार्थी यांच्या करिता मदत कायम स्वरूपात राहिली. शिक्षण , मान , अधिकार या सर्वात उंची जरूर गाठली त्यांनी.. पण कधी काळी अनुभवलेल्या गरिबीला विसरू दिले नाही.
प्रत्येक जण अशा गरिबीतून वर येत असतो ./ ते . स्ट्रगल करत असतात. पण ज्या गरिबीतून वर आलो ती कायम लक्षात राहते त्यामुळे इगो, माज या पासून दूर असतो. स्वाभिमानी असतो. पण माज नसतो. कोणाला लुबडण्याची इच्छा नसते कारण किती कष्ट करावे लागतात याची जाणीव असते. त्यामुळे किती ही मोठे मग आर्थिकदृष्ट्या , सामाजिक दर्जा वाढला असेल किंवा कामातून , अधिकारातून वाढलेला दर्जा असेल तरी ती व्यक्ती कायम ‘ down to earth ” असते.
एक राजा असतो तो आता म्हातारा होवु लागतो , त्याला एक मुलगी असते . तो घोषित करतो की उद्या राजकन्या आहे तीच्याकरिता मुलगा पसंत करण्यात येईल . सकाळी दरबारात जी पहिली व्यक्ती येईल तिच्या बरोबर त्याचे लग्न केले जाईल.
सगळे राजाच्या या निर्णयावर कुजबुज करतात. चिडतात. पण राजा पुढे कोण काय बोलणार. ? दुसरे दिवशी सकाळी दरबारात एक फाटके तुटके कपडे घातलेला तरुण येतो त्याच्या बरोबर राजा आपल्या मुलीचे लग्न लावून देतो. सगळ्यांना आश्चर्य वाटते . राजा आदले रात्री पूर्ण शहरात फिरताना एक तरुण त्याला दिसतो अंगात चांगले जॅकेट घातले होते.
राजा मात्र ओळखू नये त्याला म्हणून जुनी पुराणी वस्त्रे घालून म्हाताऱ्याच्या रुपात फिरत असतो. या जॅकेट घातलेल्या मुलाला बघून तो म्हणतो की मला थंडी वाजते. हा तरुण खरे तर दुसऱ्या गावातून राजकन्या मिळावी म्हणून आलेला असतो त्याच्याकडे चांगले कपडे नसतात म्हणून घरी एकच चांगले जॅकेट असते ते त्या फाटक्या कपड्यांवर घालून येत असतो. म्हातारा थंडीने कुडकुडत आहे म्हणल्यावर हा आपले जॅकेट त्याला देतो ऊब येण्याकरीता आणि दुसरे दिवशी राजदरबारात फाटक्या कपड्यानेच जातो. राजा या तरुणाला ओळखतो आणि निश्चिंत मनाने आपल्या मुलीचा हात त्याच्या हाती देवून राज्य सोपवितो. आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारतो.
इकडे राजा छान राज्य करत असतो . हुशारीने कारभार चालवीत असतो .मधून अधून राजा एक अंधारी खोली असते त्या खोलीत अधून मधून जात असतो. तासभर बसून नंतर बाहेर येत असतो त्या खोलीची चावी फक्त राजाकडे असते. सगळ्यांना नेहमी हा प्रश्न पडत असतो , कुतूहल असते की काय आहे त्या अंधाऱ्या खोलीत.
शेवटी सगळे महाराणी साहेबाना विनंती करतात की तुम्हीच एकदा विचारून बघा महाराजांना. तेव्हा महाराणी राजा चा मुड बघून विचारते त्यावर राजा तिला घेवून त्या अंधाऱ्या खोलीत जातो. आणि तिला खुंटीला टांगलेला आपला जीर्ण झालेला जुना पुराना फाटका ड्रेस दाखवीत म्हणतो मी आज किती ही मोठ्या पदावर असलो , श्रीमंती असेल , पद असेल तरी मी इथे येवून या अंधाऱ्या खोलीत बसून माझा हा जुना जीर्ण , फाटलेला ड्रेस बघून माझी गरिबी आठवतो. मी कुठे होतो ते आठवतो. थोडा वेळ अंगावर घालतो. म्हणजे मी मुळात कोण आहे याची जाणीव मला कायम राहते. आणि मी इगो , अधिकार , स्वार्थ या सर्वापासून दूर राहून मुक्त राहून उत्साहाने , परत शून्यातून सुरुवात करायची म्हणून आपल्या राज्या करिता , प्रगती करिता प्रयत्न करतो.
मी जर हे सगळे आयते मिळाले आहे म्हणून बसून खात राहिलो असतो , मौज मजा करत राहिलो असतो तर हे राज्य टिकविणे ही मुश्कील झाले असते.
मी ज्या शून्यातून आलो, सुरुवात केली ती कायम लक्षात ठेवण्याकरिता मी या बंद , अंधाऱ्या खोलीत येवून जुनी वस्त्रे घालत असतो .
यातून लक्षात येते की गरिबीतून वर आलेल्या समजदार व्यक्ती उंची जरूर गाठत असतात .. पण कधी काळी अनुभवलेल्या गरिबीला विसरत नाहीत. आज मी ठरविले तर पाहिजे तसे मी संपत्ती उधळू शकतो. वापरू शकतो पण ती टिकविणे जास्त महत्वाचे , ती वाढविणे जास्त महत्वाचे.
आयुष्य सुंदर आहे. पुढे जाताना आपण खूप शहाणे , श्रीमंत , उच्चपदावर या सारख्या गोष्टींचा दिखावा करू नका तर ज्या परिस्थितीतून वर आलो आहोत ती मागची परिस्थिती , गरिबी आठवून इतर गरीब ,मेहनती लोकांना क्षुल्लक समजू नका . त्यांना मान द्या , आदर द्या.
गजानन महाराज कवर पुत्राची पिठलं भाकरी खण्याकरिता चार प्रहर वाट बघत थांबले. समोर सगळ्यांनी पंच पक्वान्ने आणली होती तरी त्या थोर लोकांनाही त्यांनी थांबविले . कवर पुत्र कांदा , भाकरी , पिठल घेवून आल्यावर ते सर्वांना प्रसाद म्हणून दिले आणि आपणही तेच भक्षण केले.
महाराज ही पत्रावळी वरचे उष्टे अन्न खात होते त्यामुळे आज जरी त्यांना लोक मानत होते , त्यांना सुग्रास भोजन , पांच पक्वान्ने आणून देत होते तरी ही त्यांना ते दिवस आणि ते साधे जेवण प्रिय होते. आजही नैवैद्य आणि प्रसाद म्हणून भाकरी पिठलं , कांदा मिरची याला महत्व आहे. गरिबांचे खाणे असेल तरी त्यातून वेळ निभावून गेलेली असते , ताकद आणि पौष्टिक खाणे.
आयुष्य खूप सुंदर आहे.
उंची जरूर गाठा.. पण कधी काळी अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका. आणि हे कायम लक्षात ठेवा ही उंची कायम टिकवायची असेल तर पूर्वी केलेले अथक परिश्रम आठवा आणि ते अविरत चालू ठेवा. गाठलेली उंची ही नाती जुळविली तरी टिकवावी लागतात तसेच काहीसे . गाठलेली उंची ही आपल्या सततच्या आणि पूर्वीच्या प्रयत्नात , परिश्रमात अजून जास्ती भर घालून ,अजून प्रयत्न करून टिकवावी लागतात. त्याकरिता कायम कोण होतो याची जाणीव ठेवावी लागते. आणि आपण उंची गाठताना इतरांना ही कमी लेखू नये.
लहानपणी कहाणी चे पुस्तक वाचले असेल , ऐकले असेल त्यात शेवटी ” उतू नका , मातू नका घेतला वसा टाकू नका ” तसेच आहे उच्चपद , अधिकार श्रीमंती यांनी उतू नका मातु नका …..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


