Skip to content

इमोशनल बॅलेन्स खरंच शक्य आहे का ? ते कसे करावे ?

इमोशनल बॅलेन्स खरंच शक्य आहे का ? ते कसे करावे ?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मनुष्य हा भावनाप्रधान आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकाला वेगवेगळ्या भावना या जाणवत असतात. विविध परिस्थिमध्ये व्यक्ती आपल्याला भावना व्यक्त करत असते. त्यानुसार वागत असते. आता याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात असते. पण अस कधी होत नाही की माणसाला भावनाच जाणवत नाहीत. अस क्वचित एखाद्या आजारात होत. पण तिथेही माणसाला काहीतरी जाणवत असतं पण व्यक्त करता येत नसत. आनंद, प्रेम, राग, भीती, मत्सर अश्या विविध भावना व्यक्ती आयुष्यात अनुभवत असते.

पण बऱ्याचदा अस होत की त्या प्रसंगामध्ये जेवढी भावना व्यक्त झाली पाहिजे किंवा जाणवली पाहिजे त्याच्याहून त्याच प्रमाण खूप जास्त असत. इतकं की त्या माणसाला त्यावर आवर घालता येत नाही. म्हणून आपण बरेच जणांच्या तोंडातून हे ऐकतो की त्या वेळी ना मला काही सुचलचं नाही. भावनेच्या आहारी जाऊन, भावनाविवश होऊन मी अस वागलो. जेव्हा भांडण होतात तेव्हा अनेकदा आदळआपट, मारामारी, शिवीगाळ केली जाते. हे कश्यामुळे होत? तर आपला आपल्या भावनेवर ताबा नसल्यामुळे.

छोट्या छोट्या गोष्टीतून रडणं, पटकन रागावणं, पटकन चिंतित होण ही याच गोष्टीची उदाहरण आहेत. तर काहीजण या उलट असतात. त्यांना कोणत्याच गोष्टीची काळजी नसते, फिकीर नसते. कोणी काही बोलला अपमान केला तरी हे गप्पच बसतात. परीक्षा जवळ आली तर त्याची थोडीतरी चिंता पाहिजे तर आपण त्याचा अभ्यास करणार. जर अजिबातच काळजी केली नाही तर आपण बेफिकीर होणार. कोणतीही गोष्ट करताना वागताना त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला नाही, तसच वागलो तर त्यातून नुकसान होत. रस्ता क्रॉस करताना अजिबातच काळजी घेतली नाही आणि खूपच घाबरलो दोन्ही वेळी आपलं नुकसान आहे.

मग जर भावना जास्त दाखवायच्या नाहीत, कमी दाखवायच्या नाहीत तर काय करायचं? अशावेळी भावनेचं संतुलन ठेवायचं. यालाच emotional balance असं म्हणतात. म्हणजेच काय तर त्या वेळी जितकी गरजेची आहे, योग्य आहे तितकीच भावना व्यक्त करण. त्याच्या आहारी पण जाऊ नये आणि भावनिकरित्या अलिप्तपण होऊ नये, कोरडे होऊ नये. हे शक्य आहे का? ह भावनिक समतोल आपण मिळवू शकतो का? प्रयत्न केले ते नक्की मिळवू शकतो. तो कसा मिळवायचा ते पाहू.

१. स्वतःच्या भावना ओळखा: भावनिक बुद्धिमत्तेमधील हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. मला आता या क्षणी काय जाणवत आहे, मी काय feel करत आहे हे समजून घेणे, त्याबद्द्ल जागरूक असणे खूप गरजेचे आहे. अनेक जणांना आपल्याला आता काय वाटत आहे हेच समजत नाही. आपण कोणती भावना व्यक्त करत आहोत हेही समजत नाही. त्यांना सांगता येत नाही की त्यांना नेमके काय वाटत आहे. यातूनही अनेकांची चिडचिड होते. बऱ्याचदा वाटत एक असतं, भावना वेगळीच व्यक्त केली जाते व त्याला नावही चुकीचं दिलं जात.

राग आणि मत्सर, भीती आणि चिंता, प्रेम आणि आनंद या भावना एकसारख्या वाटत असल्या तरी त्या वेगवेगळ्या आहेत. त्यांची कारण वेगवेगळी आहेत. म्हणूनच आपल्या भावना आपल्याला योग्य वेळी ओळखता आल्या पाहिजेत. अमुक एखाद्या प्रसंगात मला काहीतरी जाणवत आहे, मला राग येतोय हे मला लगेच समजलं तर तो ताब्यात ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणून भावनिक समतोल राखण्यासाठी भावना ओळखता येणं महत्त्वाचं.

२. भावनिक अस्थिरतेची खरी कारण शोधून काढा: काही जण भावनांच्या आहारी जातात तर काहीजण भावना खूप कमी प्रमाणात व्यक्त करतात. याच कारण तो प्रसंग नसतो. तर त्या भावनांवर एका गोष्टीचा प्रभाव पडलेला असतो. तो कोणाचा हे शोधून काढण्यासाठी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. जेव्हा जेव्हा राग हाताबाहेर जातोय अस वाटेल, खूप भीती वाटते अस वाटेल जेव्हा जा प्रश्न स्वतःला विचारायचा. या प्रसंगात माझ्यासारखे अजून १०जण असते तर त्यांना काय वाटलं असतं? त्यांनी काय केलं असत? माझ्यासारखेच तीव्रतेने किंवा अगदी कोरडेपणा ने व्यक्त झाले असते का? नाही.

काही जण प्रेमाने वागले असते, काहींची फार फार तर चिडचिड झाली असती, काही जण तिथून निघून गेले असते. म्हणजेच काय तर प्रत्येक जण वेगळं वागला असता. याच कारण काय असेल? कारण प्रसंग तर सर्वांना एकसारखा आहे. तर याच कारण आहे त्यांचे विचार, त्या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन. इथे आपल्याला समजेल की आपण जे समजतो की त्या गोष्टीमुळे मी असा वागलो, मला खूप वाईट वाटलं, राग आला, काहीच वाटलं नाही तर अस नाही. आपले त्या गोष्टीकडे पाहायचे विचार तसे आहेत, दृष्टिकोन तसा आहे म्हणून आपण तशी भावना व्यक्त केली. म्हणून जर भावना ताब्यात ठेवायची असेल, त्याचा समतोल साधायचा असेल तर त्यामागे जे विचार आहेत ते ओळखले पाहिजेत, तपासले पाहिजेत.

३.विचारांना बदला, पुनर्विचार करा: जेव्हा आपण एखादी भावना खूप जास्त प्रमाणात व्यक्त करतो, अगदी हाताबाहेर जाईल इतक्या प्रमाणात अनुभवतो तेव्हा त्या मागे कारण असत ते म्हणजे आपण त्या वेळी केलेला विचार. आपण त्या प्रसंगाला खूप मोठं करून टाकतो. ही एक विचारांची चूक आहे. याला cbt मध्ये maximization असे म्हणतात. यात आपण त्या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त मोठं करतो.

उदा. समोरचा मला उलट बोला ही गोष्ट अतिशय वाईट आहे. अगदी १००टक्के. अस एखाद्याला वाटत आणि राग येतो. यात अतिशय वाईट हे आहे maximization. उलट बोला याहून खरच काही वाईट असू शकत नाही का?समजा त्याने शिव्या घातल्या असत्या तर ते किती वाईट असत?३०%. समजा तो आपल्या घरातल्या व्यक्तिबाबत काही चुकीचं बोलला असता तर ते किती वाईट असत?४०% याहून पुढे समजा त्याने आपल्याला काही शारीरिक हानी पोहाचव्याचा प्रयत्न केला असता तर ते किती वाईट असत?

हे १००% असू शकतं कारण इथे आपल्या जीवाला धोका आहे. पण मग या सर्वाचा तुलनेत फक्त उलट बोलला यावर आपल्याला जास्त राग येईल का? हो गोष्ट१०० % वाईट असेल का? इथे तितका राग येणं अपेक्षित आहे का? नाही. ही गोष्ट २०%असू शकते. ती परिस्थिती नीट हाताळू शकतो. इथे काहीच वाटू नये असं नाही. कारण अस झालं आपण काहीच वाटून घेतल नाही तरी यातून आपलं नुकसानच आहे. पण उलट बोलण्यावर जितका राग यायला पाहिजे तितकाच आपण व्यक्त करू.२०% याला अनुसरून करू. त्यानुसार योग्य पद्धतीने वागू. त्याने मारायला आल्यावर जितकी व्यक्त करायला पाहिजे तितकी करणार नाही. म्हणून त्या प्रसंगात जितकी भावना व्यक्त करण गरजेची आहे तितकीच करावी. हे कधी जमेल जेव्हा आपण आपल्या विचारांना असा तुलनात्मक रीतीने तपासू.

४.व्यायाम: कोणत्याही प्रकारच्या समस्येत, आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम खूप महत्वपूर्ण भूमिका निभावत असतो. जेव्हा भावना तीव्र होतात तेव्हा आपला आपल्या शरीरावरचा ताबा ही सुटतो. म्हणूनच चितेंमध्ये पोटात गोळा येणे, रागात हृदयाचे ठोके वाढणे, हाता पायांच्या मुठी आवळणे असे शारीरिक बदल होतात. म्हणून भावनेवर ताबा मिळवण्याबरोबर शरीरावर पण ताबा मिळवला पाहिजे. यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम, ध्यान, माइंड फुलनेस हे सर्व मदत करत.

अशाप्रकारे स्वतःच्या भावनांना योग्य प्रकारे ओळखून, तसेच विचारांना, शरीराला वळण लावून आपण emotional balance म्हणजे भावनिक समतोल मिळू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!