“इतरांना सांभाळता सांभाळता आपण स्वतः पासून हरवत चाललोय.”
मधुश्री देशपांडे गानू
आज-काल राधिकाची फारच चिडचिड होत असे. अगदी क्षुल्लक कारणावरून कोणावरही राग निघत असे. तीस वर्षांचा सुखाचा संसार, समजूतदार कर्तबगार नवरा, दोन छान मुलं.. अगदी सोन्यासारखा संसार. आता 55 वर्षांची असलेली राधिका उत्तम गृहिणीही आहे. घरचं बाहेरचं सगळं निगुतीने सांभाळणारी. मुलंही आता मोठी झालेली. आता जरा संसारातून निवांत वेळ मिळेल असं तिला वाटत होतं. स्वतःसाठी वेळ मिळेल असं वाटणं गैर नव्हतंच.
सासुबाईही अगदी प्रेमळ, समजुतदार मिळाल्या होत्या. जागेची पैशाची कमतरता नव्हती. घरकामाला मदतनीसही होतेच. पण सासूबाईंच्या आजारपणामुळे राधिका सासुबाईंचे करण्यात इतकी गुरफटली की त्यांचं तिच्याशिवाय पान हालेना. त्यांचा फक्त राधिकावर विश्वास होता. प्रत्येक गोष्टीत, कामात त्यांना राधिकाच हवी असायची. त्यामुळे सगळ्यांचं रुटीन सांभाळून त्यांच्या दिमतीला ती सतत हजर असायची.
या वयातही एक आदर्श सून असावं यासाठीची तिची धडपड तिलाच त्रासदायक ठरायला लागली. आपलंही आता वय होतंय, पूर्वीसारखी कामं जमत नाहीत हे तिला पचनी पडत नव्हतं. त्यामुळे सगळ्या कामांना सतत धावून जाण्यामुळे तिची अकारण चिडचिड खूप वाढली होती. घरातली कामं दुसरं कोणीही करू शकत असतानाही राधिकाची दमछाक होत होती. स्वतःसाठी तिला वेळच मिळत नव्हता. याचा तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला.
शेवटी समुपदेशकांच्या मदतीने तिला हा सगळा गुंता हळूहळू सोडवता आला. घरातील सदस्यांना सांभाळणं हा तिच्यासाठी आनंदाचा भाग असूनही तो आनंद, आनंददायी न होता त्रासाचा होत होता, हे तिच्या लक्षात आलं. मग मात्र तिने ठामपणे काही निर्णय घेतले. कामाची योग्य वाटणी केली. वेळेचे नियोजन केलं. स्वतःसाठी ठराविक वेळ राखून घेतला. मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे, स्वतःच्या आवडीचं काम करणे यामुळे तिला परत मानसिक स्थैर्य मिळाले.
किती सहजपणे असं आजूबाजूला दिसतं आपल्याला! प्रत्येक नात्याच्या स्वतःच्या गरजा असतात. हे नातं, ती व्यक्ती खूप महत्त्वाची असते आपल्या आयुष्यात. त्या व्यक्तीशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आपली भावनिक गुंतवणूक प्रचंड असते. नातं कोणतेही असो, प्रेम विश्वास हा त्याचा पाया असतो.
त्याचप्रमाणे एखादं नातं आयुष्यभर त्याच भावनेने आपल्याबरोबर राहावं म्हणून आपण योग्य ते सगळं काही करतो. नातं टिकवण्यासाठी, टवटवीत राहण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो, सहवास, योग्य संवाद, भावनांचं, प्रेमाचं, कष्टाचं खत पाणी घालावं लागतं. तेव्हा ते नातं बहरतं. दोन्ही व्यक्तींकडून समान पातळीवर सांभाळलं गेलं तरच ते नातं प्रसन्न राहू शकतं. एकाच व्यक्तीची खूप गुंतवणूक आणि दुसऱ्या व्यक्तीची नात्याबद्दलची उदासीनता नातं संपुष्टात आणू शकते. एकाच बाजूने कितीवेळ नात्याचा नाजूक धागा धरून ठेवणार ना!!
“आई” हे एक असं नातं आहे जिच्याशिवाय आपण आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिचं मूल हेच तिचं जग होतं. त्याच्यासाठी ती कोणतेही कष्ट करायला तयार असते. शारीरिक, मानसिक अफाट ताकद येते तिच्यात. मुलांचे संगोपन करताना, त्यांचं हवं-नको बघताना, त्यांना एक उत्तम माणूस म्हणून घडवताना बरेचदा ती स्वतः पण एक माणूस आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे हेच ती विसरून जाते.
तिला स्वतःच्या भावना, छोट्या-छोट्या आवडीनिवडी आहेत हे विसरते. पण हीच मुले मोठी होतात, स्वतःचं आभाळ शोधू लागतात, त्यांचं वर्तुळ वेगळं होतं तेव्हा मात्र ही आई कावरीबावरी होते. तिचं जग निसटून चाललेलं असतं जणू! मुलांचं सगळं करताना, संसार सांभाळताना स्वतःलाच हरवून बसलेली असते. वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांमुळे ती गोंधळून जाते. याच वयोगटातील बहुसंख्य स्त्रिया नैराश्याच्या शिकार होतात. समुपदेशकांची, मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावीच लागते. “आता माझी कोणाला गरज नाही. माझी किंमत नाही.” अशा नकारात्मक विचारांनी त्यांना ग्रासून टाकलेलं असतं.
नोकरी करणारे अनेक पुरुष स्वतःचं मूल्य “पैसा कमवून आणणारी घरातील महत्त्वाची व्यक्ती” असं करतात. त्यामुळे त्यांनी कर्तव्य चोख बजावताना, जबाबदाऱ्या निभावताना स्वतःकडे कधी लक्ष दिलेलं नसतं. आणि निवृत्त झाल्यावर त्यांना वाटतं आता घरात मला कोणीच किंमत देणार नाही, मला मान मिळणार नाही.
ही अशी उदाहरणं आपल्याला प्रत्येक घरात दिसतात. इतरांना सांभाळता सांभाळता आपण स्वतःला हरवून बसतो. सतत कुटुंबातील घरातील इतर सदस्यांच्या गरजा, सुखाचा विचार करताना स्वतःच्या गरजा, सुख, मानसिक स्थैर्य, शारीरिक विश्रांती याचा आपल्याला विसर पडतो. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा एक तर उशीर झालेला असतोच. पण सातत्याने शारीरिक, मानसिक कष्ट, मेहनत, ताणतणाव यातून गेल्याने वयाच्या स्थिरावण्याच्या वळणावर अनेक आजार नेमके गाठतात.
आज वयाची पन्नाशी गाठायच्या आतच रक्तदाब, मधुमेह, नैराश्य, निद्रानाश, चिंता, चिडचिड अशा अनेक शारीरिक, मानसिक आजारांना समाज बळी पडत आहे. खरं तर आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर सेकंड इनिंग सुरू व्हायला हवी. त्यासाठी शारीरिक ताकद, आरोग्य, मानसिक शांती, समाधान, स्थैर्य हवंच.
यासाठी प्रयत्नपूर्वक सुरुवातीपासूनच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नातं जपताना नात्याची गरज आणि मर्यादा दोन्ही ओळखून वागायला हवे. कितीही प्रेमाचं, महत्त्वाचं नातं असलं तरीही स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वतःचा वेळ हा जपायलाच हवा. स्वतःची स्पेस जपायलाच हवी. मुलं लहान आहेत, नोकरी म्हणून तुमच्या आवडीचा छंद सोडून देऊ नका. त्याच्यासाठी वेळ काढाच. टाईम मॅनेजमेंट अगदीच गरजेचं आहे.
म्हणजे कर्तव्य नीट पार पाडतानाही स्वतःसाठी वेळ मिळेल आणि तुमची चिडचिड होणार नाही. तुमचा स्वतःचा वेळ तुम्हाला हवा तसा तुम्हाला आनंद मिळेल असाच वापरा. अगदी काही नाही तर छान पैकी झोप काढा. शरीराला आणि मनाला विश्रांती हवीच. कितीही मानाचं, महत्वाचं नातं असलं तरीही योग्य वेळी, योग्य ठिकाणी ठामपणे “नाही” म्हणायला शिका. यामुळे स्वतःला दोषी समजू नका. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला प्राधान्य देणं, वेळ देणं हे महत्वाचं आहे.
तुम्ही स्वतःला शारीरिक, मानसिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण ठेवलेत, स्वतःकडे लक्ष दिलंत तर आणि तरच तुम्हांला तुमचं कुटुंब, नाती यशस्वीपणे सांभाळता येतील, हो ना!! तर इतरांना प्रेमाने, विश्वासाने जरूर सांभाळा पण स्वतःला हरवून बसू नका. स्वतःला प्रेमाने प्रथम सांभाळा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


