Skip to content

“इतरांना टेन्शनमध्ये पाहताना आपण काय काय करू शकतो??”

“इतरांना टेन्शनमध्ये पाहताना आपण काय काय करू शकतो??”


मधुश्री देशपांडे गानू


“मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया…”

सदाबहार देव आनंद वर चित्रीत झालेलं सुंदर गाणं. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना किती धीराने, सकारात्मकतेने सामोरं जायला हवं हे अगदी सहज या गाण्यात सांगितलं आहे. पण असं गाण्यात सांगणं वेगळं आणि वास्तव आयुष्यात कठीण प्रसंगांना तोंड देणं सर्वस्वी वेगळं. तरीही सकारात्मक विचारांनी, प्रयत्नांनी आपण रोजच्या जगण्यात येणाऱ्या टेन्शन्सवर मात करूच शकतो.

सध्या आपली जीवन पद्धती अत्यंत वेगवान घडामोडींची, अनेक ताणतणावांनी भरलेली अशी झाली आहे. अगदी जन्माला आल्यापासून प्रचंड स्पर्धा आहे. सातत्याने या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. सतत पुढे जायचं आहे. अशा परिस्थितीत शेकडो ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. अगदी साध्या साध्या दैनंदिन गोष्टींतही हे ताण दिसून येतात.

टेन्शन येणं ही एखाद्या कठीण प्रसंगाला दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अनेक छोटे-छोटे ताण आपण सहज हाताळू शकतो. उदाहरणार्थ, अचानक तुमची गृह मदतनीस आली नाही तर तुम्हाला क्षणिक ताण येतो. पण तुम्ही घरातील कामांची वाटणी करून त्यावर तोडगा काढू शकता. पण दीर्घ काळ येणाऱ्या ताण-तणावाच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर मात्र तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर त्याचा निश्चित विपरीत परिणाम होतो.

मुळात आधी आपण साधारण ताण-तणावासाठी कोणती कारणे असू शकतात ते पाहू.

१) नातेसंबंध– कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांमध्ये उद्भवणारे ताणतणाव. याला अनेक दृश्य-अदृश्य कारणे असतात.

२) वेळेचे बंधन– शाळा-कॉलेज, नोकरी-व्यवसायात ठराविक कालावधीत ठरावीक काम पूर्ण करण्याचा ताण.

३) तुम्हीं राहत असलेला परिसर आणि सामाजिक हितसंबंधांचा ताण.

४) आर्थिक ताण– आर्थिक पातळीवर दैनंदिन किंवा दूरगामी असणारे ताण.

५) आजारपण– गंभीर आजाराला तोंड द्यावं लागलं, तर माणसं प्रचंड तणावग्रस्त होतात. प्रेमाच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू हेही प्रचंड तणावाचं कारण असतं.

६) अवास्तव अपेक्षा– स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि समाजाबद्दल  अवास्तव अपेक्षा असतात. स्वतःच्या क्षमतांची जाणीव नसल्यामुळे निर्माण होणारे ताण.

७) एकाच वेळी अनेक डगरींवर पाय ठेवल्याने निर्माण होणारे ताण. एकाच वेळी अनेक गोष्टींत प्राविण्य मिळवण्याचा अट्टाहास. यातून फक्त शारीरिक, मानसिक थकवा आणि ताण निर्माण होतो.

८) स्वभाव– हट्टी, हेकेखोर, तापट, भांडखोर, संशयी, मत्सरी अशा नकारात्मक स्वभावाची माणसं स्वतःबरोबर, कुटुंबीयांना, इतर माणसांना ही प्रचंड तणावग्रस्त बनवतात.

अशी अनेक नेहमी दिसणारी ताणतणावाची कारणे आहेत. यापेक्षाही तीव्र स्वरूपाची कारणं असू शकतात. आपल्या आजूबाजूला घरात, कुटुंबात, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणींमध्ये आपल्याला कोणी ना कोणी कोणत्यातरी टेन्शनमध्ये दिसतंच. एवढंच कशाला! आपण स्वतःही सतत कोणत्या तरी टेन्शनला सामोरे जात असतो.

एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये दिसली तर आपण त्या व्यक्ती साठी काय करू शकतो? सर्वात प्रथम त्या व्यक्तीला आपण तिला मदत करणं मान्य असायला हवं. बरेचदा असा अनुभव येतो की माणसांना ते तणावग्रस्त आहेत हेच लक्षात येत नाही. आपण लक्षात आणून दिलं तरी ते मान्य करत नाहीत.

कधी भीडेपोटी, कधी कमीपणाची भावना म्हणून, कधी लोक काय म्हणतील? म्हणून माणसं स्वतःची टेन्शन्स सांगत नाहीत. तर काही माणसं अगदी कोरडं, तुटक वागतात. “आमचं आम्हीं बघून घेऊ. तुम्हाला काय करायचंय??” अशा विचारांचे असतात. समोरची व्यक्ती ऐकूनच घेत नसेल तर आपण इच्छा असूनही मदत करू शकत नाही.

आपली प्रामाणिक इच्छा आणि समोरच्या व्यक्तीची टेन्शन मधून बाहेर पडण्याची मनापासून तयारी असेल तर आपण नक्कीच त्याला काही उपाय सुचवू शकतो. आत्ता मी हे लिहीत असले तरीही या गोष्टी मलाही माझ्या आयुष्यात फायदेशीर ठरलेल्या आहेत. कशा ते पाहू..

१) सर्वात प्रथम तुमची परिचयाची, प्रेमाची, कुटुंबातील व्यक्ती तणावग्रस्त आहे, तिच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या. तुमच्या बोलण्याची पद्धत, आवाजाचा पोत हे सर्व त्या व्यक्तीला समजावून सांगणारं असावं. तुमची त्या व्यक्तीला मदत करायची इच्छा आहे हे योग्य पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवं.

२) तणावाची कारणे, त्यामागील प्रसंग समजून घ्या.

३) तणावग्रस्त व्यक्तीला पूर्णपणे मोकळेपणाने बोलण्याची संधी द्या. तुम्ही फक्त शांतपणे ऐकण्याचं काम करा. खुपदा माणसांना कोणताही न्यायनिवाडा न करता, कोणतंही लेबल न लावता कोणी तरी ऐकणारं हवं असतं. तो ऐकणाऱा कान व्हा. यानेही तणावग्रस्त व्यक्तीला शांत वाटू शकतं.

४) त्यांना या गोष्टीची खात्री पटवून द्या की कोणतीही अडचण, संकट तात्पुरतं असतं. हे अडचणींचे दिवस कायम राहणार नाहीत. त्यातूनही मार्ग निघू शकतो.

५)  तणावग्रस्त व्यक्तीला त्याचे “Triggers” ओळखायला मदत करा. त्याच्या स्वभावाचे, विचारसरणीचे “Patterns” समजून घ्या. काही वेळा अति विचार, नकारात्मक मानसिकता, चिंता अशा गोष्टींनी छोट्याशा टेन्शनचे मोठा टेन्शन मध्ये रूपांतर झालेले असते. अशावेळी तोच प्रसंग वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी त्यांना मदत करा. वास्तवाची जाणीव करून देणं आवश्यक असतं.

६) एकदा टेन्शनचं कारण समजून घेतलं की तुम्ही खरंच जी मदत करू शकता ती करा. जी तुम्हाला शक्य असेल ती. जर गंभीर कारणं असतील तर मग तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी शक्यतो सगळी मदत करा. उदाहरणार्थ, समुपदेशक, वकील, आर्थिक सल्लागार, डॉक्टर.

७) ध्यान आणि श्वासाचे व्यायाम प्रकार नक्की करण्याचा सल्ला तणावग्रस्त व्यक्तीला द्या. याने मन शांत व्हायला, विचार प्रक्रिया सुधारायला खूप मदत होते. हे मी स्वानुभवाने सांगत आहे.

८) तुम्ही त्यांच्याबाबत “non-judgmental” आहात आणि कायम त्यांच्याबरोबर आहात याबद्दल त्यांना खात्री, विश्वास वाटू द्या.

९) ज्या गोष्टींवर, माणसांवर आपलं नियंत्रण नाही त्याबद्दल चिंता करून, तणावग्रस्त होऊन काहीच उपयोग नसतो. याबद्दल विचार करणं सोडून द्यायला हवं हे त्या व्यक्तीला पटवून द्या.

वरील काही सकारात्मक विचार आणि कृतीतून तुम्हीं टेन्शन मध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करू शकता. त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रयत्न करू शकता. जेणेकरून त्या व्यक्तीचा ताण कमी व्हायला मदत होईल. ताणतणाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण शांत राहून, सकारात्मकतेने आपण त्यावर सहज विजय मिळवू शकतो. आपलं मौल्यवान आयुष्य सुंदर, आनंदी असण्यासाठी आपण तणावमुक्त असणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आनंदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायलाच हवेत. हो ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!