Skip to content

इतरांच्या चुकीच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ नये यासाठी या क्लृप्त्या फॉलो करून पहा.

इतरांच्या चुकीच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ नये यासाठी या क्लृप्त्या फॉलो करून पहा.


हर्षदा पिंपळे


मन ही अशी गोष्ट आहे जी म्हंटल तर फार नाजूक नाहीतर मग तितकीच कणखर आहे. सभोवतालच्या वातावरणाचा, परिस्थितीचा आपल्या या मनावर सहज परिणाम होत असतो.अगदी निसर्गातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळेही मनावर चांगला-वाईट परिणाम होत असतो.आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या मनावर चांगला परिणाम झाला तर निश्चितच ती चांगली गोष्ट आहे. परंतु कैकदा सभोवतालची परिस्थिती ही मुळातच नकारात्मक किंवा चुकीची असते.आणि या परिस्थितीचाही मनावर तसाच परिणाम होऊ शकतो.

घरात किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी वावरतो त्या त्या ठिकाणी आपल्याप्रमाणे इतरही माणसं असतात. आणि प्रत्येकाचा स्वभाव हा निरनिराळा असतो. इतकच नव्हे तर प्रत्येकाच वागणं-बोलणंही निरनिराळच असतं.आणि या सगळ्याचा परिणाम कळत नकळतपणे आपल्या मनावर होत असतो.

आपल्या प्रत्येकाकडूनच काही न काही चुकीचं बोललं जातं.आणि नाही म्हंटल तरी याचा परिणाम आजुबाजूच्या परिस्थितीवर होतो.
उदाहरण सांगायच झालं तर….अनेकदा कित्येकजण एखाद्या गोष्टीच समर्थन करताना चुकीच्या पद्धतीने करतात.इतरांशी बोलताना कोणत्याही प्रकारच तारतम्य न ठेवता मनाला वाटेल तसं चुकीचं वक्तव्य करतात.

अनेकदा अर्धवट ज्ञान हे धोकादायक स्वरुपाच असतं. तरीही काहीजण एखाद्या गोष्टीविषयी कोणतीही शहानिशा न करता तिच गोष्ट चुकीच्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवतात. एखाद्याला राजकारणातला र सुद्धा माहीत नसतो.तरीदेखील राजकारणाविषयी अत्यंत चुकीच वक्तव्य तेही स्पष्ट शब्दात मांडणारे काहीजण आपण पाहतोच.एखादी गोष्ट पसरायला फार वेळ लागत नाही.

आणि जे खरं नाही तेही लोकांना खरं वाटू लागतं.काय चूक आणि काय बरोबर आहे यातला फरक लोकांना कळेनासा होतो.आणि अनेकदा असही होतं की आपल्याला कळतं की समोरचा जे बोलतोय ते अत्यंत चुकीचे आहे. त्याच्या या बोलण्याचा इतरांवर नक्कीच वाईट परिणाम होऊ शकतो.आणि त्याच वेळी नेमकं आपल्याला काही करताही येत नसतं.आपली खूप कोंडी होऊन जाते. हात दगडाखाली अडकलेत की काय असं वाटू लागतं. आणि निश्चितच आपल्या स्वतःच्या मनावरही त्याचा परिणाम होत असतो.

तर अशा प्रसंगी आपण काही क्लृप्त्या नक्कीच फॉलो करायला हव्यात. (जेणेकरून त्या चुकीच्या बोलण्याचा आपल्या आणि इतरांच्या मनावरही (वाईट) परिणाम होणार नाही.) चला तर मग अशा काही थोड्या थोडक्या क्लृप्त्या आपण पाहूयात.(अमलात आणूयात.)

दुर्लक्ष करणे-सर्वप्रथम इतरांच्या चुकीच्या बोलण्याकडे शक्य होईल तितकं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करणे.कारण जितकं आपण दुर्लक्ष करू तितका आपल्या मनावर त्याचा कमी परिणाम होईल.

एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडून देणे.

स्वतःच्या कामात गर्क होऊन ते चुकीच बोलणं विसरायचा प्रयत्न करणे.

इतरांच्या चुकीच्या बोलण्याचा जास्त विचार करणे सोडून देणे. इतरांना त्यांची चुक दाखवून द्यायची असेल तर आपल्या स्वतःच्या कृतीतून त्यांना तशी जाणीव करून द्यावी.

जेव्हा वाटेल की या अशा बोलण्याचा खरच विचार करण्याची गरज आहे तरच विचार करा.

चुकीच्या गोष्टी मनावर घेऊन काहीच साध्य होत नसतं त्यामुळे शक्य होईल तितकं अशा बोलण्याचा विचार न करता दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.

अशावेळी आपले कान बंद करून घ्या.काही ऐकूच येत नाही असं समजून आपण आपलं काम सुरळीतपणे करत राहणे केव्हाही फायदेशीर असते.

आपण आपल्या मतावर , आपल्या बोलण्यावर ठाम राहणे.(अर्थातच योग्य असलेल्या)

मर्यादांचे धोरण-इतरांच बोलणं किती मनावर घ्यायच नी किती नाही याच्या मर्यादा ठरवून घेणे.अशा गोष्टींसाठी काही मर्यादांची धोरणं आपणच आपल्यासाठी आखणे गरजेचे आहे. कारण अनेकदा आपण एखाद्या गोष्टीचा इतका खोलवर जाऊन विचार करतो की त्याला काही मर्यादाच नसते.आणि मर्यादा ओलांडली गेली की निश्चितच त्याचा परिणाम होणं साहजिक आहे.

या झाल्या थोड्या थोडक्या क्लृप्त्या. जर तुमच्याकडे काही अजून अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या असतील तर नक्कीच त्याही इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका.आणि नक्कीच लोकांच्या चुकीच्या बोलण्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका.लोकं काहीही बोलत राहतात आपण ठरवायच किती लक्ष द्यायच आणि किती नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!