इतकं काय अवघड आहे जगण्यात… जगुया ना मस्त..!
हर्षदा पिंपळे
ती संध्याकाळ शुभ्राच्या कायम आठवणीत राहीली.अजूनही ती संध्याकाळ तशीच तिच्या मनात ताजीतवानी आहे.कायमस्वरूपी तिला ‘work from home’ असल्याने ती नेहमीप्रमाणे तिचं काम करत होती. ऑफीसचा सेटप तिने खिडकीच्या दिशेला अगदी मोकळ्या जागेत केला होता. त्या संध्याकाळी ती अशीच काम करत होती.
आणि काम करता करता तिचं लक्ष अचानक खिडकीबाहेर गेलं.सुर्य अस्तास चालला होता. लाटांची सळसळ चालू होती.किनाराही अगदी गर्दीने दाटला होता.ते सुर्याच प्रतिबिंब तर इतकं सुखावणारं होतं की त्याच्याकडे बघताना पापणीही लवत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि जगण्याच समाधान अगदी ओसंडून वाहत होतं.तिला असं मोकळं हसताना पाहून मलाही समाधान वाटलं . इतके दिवस हरवलेलं हसु आज तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा उमटलं होतं.इतरांना असं हसताना पाहण्यातही एक वेगळच समाधान असतं नं…!
पण मग तिला असं हसताना पाहून माझ्या मनात असंख्य प्रश्न घोळू लागले.आनंदात असणाऱ्या माणसाला त्याच्या आनंदाच कारण विचारू नये.पण राहून राहून मी तिला तिच्या आनंदाच , त्या विलक्षण असं हसण्याच कारण विचारलच. “काय गं…तुझ्या या हसण्याच कारण काय…? इतके दिवस मावळलेला तुझा चेहरा आज एकदम असा सूर्यफुलासारखा प्रफुल्लित कसा झाला…?
तर त्यावर ती म्हणाली ” अगं या सुर्याने मला पुन्हा एकदा जगण्याची जाणीव करून दिली. तो मनापासून दिवसभर त्याची ‘ड्युटी’ करतो. आपल्यासारखी कितीतरी लोकं त्याला तर नावच ठेवतात.त्याच्या नावाने शंख करतात. इतका तापलाय तो त्याला कळत नाही का काही…? किती त्रास होतो जीवाला…! अंगाची अगदी लाहीलाही होते त्या सुर्यामुळे….! असं काही बाही बरळत राहतात.
पण तरीही तो बघ त्याचं येणं थांबवत नाही. तो त्याच्या मतावर ठाम आहे. दिवसभर तो इतका त्रास सहन करतो आपला पण संध्याकाळी मात्र जाताना तो त्याचं आत्मसौंदर्य दाखवायला विसरत नाही. आणि पुन्हा सकाळी आशेचा किरण दाखवायला तो हजरच असतो.लोकांनी कितीही त्रास दिला तरी आपण त्यांना सुखावणं सोडायच नाही.
आणि आपलं आयुष्यही थांबवायच नाही.हे त्या सुर्याकडे पाहून जाणवलं.वाटलं जगणं किती सहज-सोपं आहे. आपणच त्याला अवघड करत असतो.खरचं जगण्यात अवघड असं काही नाही आपण एकदा जगायला हवं….” इतकं सारं काही ती बोलली.मला समजेना की आता काय बोलाव…? मी आपली अवाक् होऊन तिच्याकडे बघतच राहिले.
पण मग एक गोष्ट लक्षात आली ही साधी गोष्ट शुभ्राच्या लक्षात येऊ शकते तर आपल्या का नाही…?
वाचकहो , आपल्याला आयुष्य सुंदर आहे हे माहीत आहे. पण आपल्याला जगणं अवघड वाटतं.जगणं अवघड वाटतं त्यामुळे आपण जगायचच सोडून देतो.त्यामुळे एखादा आशेचा किरण जरी आपल्या अंतरंगात डोकावत असेल तरी आपण नकळतपणे त्यापासून अलिप्त राहतो. त्यामुळे एकदा जगून पाहुयात. कारण जगल्याशिवाय जगणं अवघड असतं की नसतं हे कळणार नाही.
त्यामुळे थोडं पडताना धडपडलो तर असुद्या , पायात काटा टोचला तर टोचूद्या.लागलं खरचटलं तर असूद्या.थोडा वेळ त्रास होईल नंतर मात्र बरच बरं वाटेल. आणि वाटलच त्रास होतोय तर एकदा पहा त्या लोकांकडे ज्यांच जगणं आपल्यापेक्षाही अवघड आहे. किंवा ज्यांना आयुष्यात जगायची संधीच मिळाली नाही. आपण त्यांच्यापेक्षा नक्कीच सुखी आहोत ही भावना सुखावणारी आणि निसर्गाचं ऋण व्यक्त करणारी आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिका जगणं नक्कीच सुंदर सहज वाटेल.जगणं खूप खाचखळग्यांनी वाहून चाललय असं तुम्हाला वाटणार नाही..
एक सुर्य आपल्याला जगणं किती सोप आहे हे सांगू शकतो तर मग जगायला काय हरकत आहे….? एकदा त्या सुर्यासारख वागून पाहुया जगण्यातील उमेद नक्कीच जागी होईल. कुणी कितीही काहीही बोललं तरी मनावर किती घ्यायच हे आपल्यावर असतं.हे तो मावळतीचा तांबूस-पिवळा गोळा सहज सांगतो.
आपणही असच इतरांकडे लक्ष न देता
आपलं आयुष्य प्रामाणिकपणे
जगायचा प्रयत्न करूयात नं….
आपलं आत्मसौंदर्य
आपणही जपूयात नं….
लागलं-खरचटलं तर
मलमपट्टी करूयात नं…
चुकलं तर पुन्हा नव्याने
सुरूवात करूयात नं…
कधी डोळ्यातलं पाणी,
मंजुळ गाणी अनुभवूयात नं…
कधी पिझ्झा, बर्गर
कधी भाकरीचा तुकडा
खाऊयात नं…
पडूयात , झडूयात
हिम्मत न हारता लढूयात नं…
तुटूयात, रडूयात
हसूयात नं…
आयुष्य सुंदर आहे
मोगरा होऊन दरवळूयात नं…
अहो….
इतकं काय अवघड आहे जगण्यात…?
मस्त जगूयात नं…!!
आयुष्य सुंदर आहे… जगायला शिका…जगण्यावर प्रेम करा…तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या…..Yes…(कुणीतरी सांगितलय)Live and Let live…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


