Skip to content

इच्छा खूप असते, पण सभोतालची परिस्थिती आपल्याला कमजोर करते.

इच्छा खूप असते, पण सभोतालची परिस्थिती आपल्याला कमजोर करते.


सौ. मिनल वरपे


वेळ अशी येते की आपल्याला इच्छा तर खूप असते पण आपली मनस्थिती.. आजूबाजूची परिस्थिती.. आपल्याला अजून जास्त कमजोर बनवत असते..

नरेश नुकताच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता पण बरेच मुलाखती देऊन सुद्धा त्याची निवड होत नव्हती पण त्यामुळे तो कंटाळला नव्हता.. त्याने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले. पण आजूबाजूचे आणि काही मित्रमंडळी त्याला सारखं ऐकवत होते काय तू अजून नोकरी शोधतोय कधी मिळणार तुला नोकरी… अरे हल्ली नोकरी मिळणे म्हणजे सोप नाहीये..

अरे एकाने तर नोकरी मिळत नाही म्हणून जीव दिला.. अरे लग्न जमायला खूप कठीण आहे नोकरी नाही मिळाली तर आणि मिळाली तरी मिळणारा पगार, नोकरीच ठिकाण, पद या सगळ्याच बाबी महत्त्वाच्या नाहीतर नोकरी मिळून पण काही उपयोग नाही….

या सगळ्या शब्दांमुळे नरेशच्या मनात नोकरी विषयी भीती निर्माण झाली… त्याच टेन्शन अजून वाढल..जो आत्मविश्वास त्याच्याकडे पूर्वी होता तो कमी झाला.. त्याच्यातील आशावाद कमी कमी होत गेला..

असे एक ना अनेक प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडत असतात त्याच मूळ कारण म्हणजे आजूबाजूचे लोक आणि त्यांच्यामुळे बिघडलेली आपली मनस्थिती..

कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला धीर देण्याच सोडून तू कारे सारखा आजारी पडतोस.. किती तुझा दवाखाना.. तुझ आयुष्य म्हणजे नुसतं गोळ्या औषधांनी भरलं आहे.. बघावं तेव्हा तुझ दुखणं च ऐकू येते.. हे अस सगळ ऐकल्यावर कोणतीही आजारी व्यक्ती ताकदीने उभ राहण्याऐवजी अजून आतून खचून जाणार..

कधी कोणाचं लग्न जमत नसेल तर काय ग तुझ कधी होणार लग्न.. वय वाढत चाललंय.. तुझ्या वयाच्या आता दोन पोरांच्या आई झाल्या आहेत..वेळेत लग्न झालं तर ठीक नाहीतर नंतर खूप प्रॉब्लेम येतात.. हे सगळं ऐकल्यावर जी व्यक्ती होईल तेव्हा होईल लग्न या चांगल्या आशेवर राहून बिनधास्त जगणारे सुद्धा टेन्शन घेऊन मानसिक त्रासात अडकतात…

आपल्याला जे हवं ते करता येते.. एकदा आपण ठरवलं की अवघड अस काहीच नाही… मला फक्त प्रयत्न करायचे आहेत ते कधीच सोडायचे नाहीत.. मला माझं आयुष्य आनंदाने जगायचं आहे आणि मी जगणारच.. हा आपला जगण्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन कोणाच्या अशा सतत टोमणे मारण्याने, सतत ऐकवण्याने, नको असलेले शब्द सतत कानावर पडल्यामुळे कधी पुसट होत जातो हे आपल्यालाच कळत नाही.

मग अशावेळी आपण काय करू शकतो की ज्यामुळे आपण कमजोर पडणार नाहीत.. अशावेळी काही गोष्टी खासकरून लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे,

लोक तर बोलणारच.. जसे वाईट बोलणारे असतात त्यासोबतच असा एकतरी असतो जो चांगल बोलत असतो म्हणून आपण कोणाचं काय ऐकावं.. कोणती गोष्ट मनावर घ्यायची..हे आपल्याला जर कळलं तर नक्कीच आपल्यावर कोणत्याच गोष्टीचा वाईट परिणाम होणार नाही.

आपली मनस्थिती, आत्मस्थिती, आपला आत्मविश्वास इतका कमजोर नाहीच करायचा जो कोणाच्याही शब्दामुळे कोलमडून जाईल..

आपण जास्तीत जास्त सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करायचा.. नकारात्मक आणि चुकीच्या माणसांपासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करायचा… जरी कोणी संपर्कात येतच असेल, सतत बोलतच असेल तर त्यांना टाळायचा प्रयत्न करायचा.

आपण आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या, आपली ठरवलेली काम, ध्येय यावर इतकं एकाग्र राहायचं की कोणीही त्यामधे व्यत्यय आणू शकत नाही.

आजारपण, नोकरी न मिळणे, परिस्थिती, शिक्षणात अपयश, लग्न न जमणे अशा अनेक अडचणी येतात पण मला आयुष्यभर त्यामध्येच नाही अडकून राहायचं.. मला माझ्या अडचणी बाजूला सारून उभ राहायचं आहे.. माझ्या अडचणीवर जरी कोणी हसत असेल तरी त्या हसण्याकडे दुर्लक्ष करून मला यातून बाहेर पडता येईल हा सकारात्मक आशावाद नेहमीच सोबत ठेवायचा.. त्यामुळे कितीही आपल्याला कोणी कमजोर करण्याचा प्रयत्न केला तरी आपण कमजोर पडणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!